जुन्नरच्या बिबट्या सफारीसाठी लवकरच बैठक

जुन्नरच्या प्रस्तावित बिबट्या सफारीसाठी लवकरच मंत्रालयात मुख्यमंत्री आणि वनमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे.
Meeting soon for Junnar's leopard safari
Meeting soon for Junnar's leopard safari

पुणे ः जुन्नरच्या प्रस्तावित बिबट्या सफारीसाठी लवकरच मंत्रालयात मुख्यमंत्री आणि वनमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली. 

आमदार बेनके म्हणाले, ‘‘२०१६ पासून बिबट्या सफारी जुन्नरमध्ये प्रस्तावित आहे. मात्र अचानक अर्थसंकल्पात पुणे वनविभागामधील बिबट्या सफारीसाठी ६० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. यामुळे जुन्नर तालुक्यातील नागरिकांनी नाराजी वक्त केली. ही नाराजी आणि नागरिकांच्या भावना मी विधानसभा अधिवेशनादरम्यान सभागृहात आक्रमकपणे मांडल्या. तसे पत्रदेखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे.’’ या पत्रावर अजित पवार यांनी अधिवेशन संपल्यावर उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले आहे, असेही बेनके म्हणाले. 

काय आहे पत्रात?  ‘‘बिबट्या सफारीचा मुद्दा घेऊनच आम्ही निवडणुका लढलो. अर्थसंकल्पात बारामतीच्या बिबट्या सफारीसाठी ६० कोटींची तरतूद केल्याने, जुन्नरची सफारी बारामतीला होणार या घोषणेमुळे जुन्नरची जनता व्यथित झाली आहे. २०१६ मध्ये हा प्रकल्प जुन्नरला व्हावा, यासाठी तत्कालीन वनमंत्री यांच्या दालनात बैठक झाली होती. त्यास शासनाने अनुकूलता दाखवून संबधित विभागाचे सचिव, वास्तुविशारद यांनी आंबेगव्हाण येथील जागेची पाहणी करून, डीपीआरसाठी दीड कोटी रुपये मंजूर केले. त्यातील ६५ लाख अदा करणार होते. मात्र ते झाले नाहीत. हा प्रकल्प पुढे गेला नाही. हा प्रकल्प जुन्नरलाच व्हावा, अशी माझ्यासह सर्वपक्षीय मागणी आहे. त्याचा सकारात्मक विचार व्हावा.’’ 

मुनगंटीवार, अहिर रिंगणात  बिबट्या सफारीसाठी माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिरदेखील रिंगणात उतरले आहेत. मुनगंटीवार यांनी बिबट्या सफारी बारामतीला नेण्यास विरोध करून, बारामतीत हत्ती, अस्वल सफारी सुरू करावी, असे सांगितले. तर सचिन अहिर यांनी जुन्नरमध्ये गेली अनेक वर्षे बिबट्या समस्या असल्यामुळे त्यावरील उपायासाठी बिबटे सफारीमध्ये बंदिस्त करून, मानवावरील हल्ले रोखता येतील, अशी भूमिका घेतली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com