‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्र

‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्र
‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्र

पुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’ चक्रीवादळाने बुधवारी (ता.२३) सकाळी साडेआठ वाजता तीव्र रूप धारण केले आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळपर्यंत हे वादळ अतितीव्र होणार असून, ओमान आणि येमेनच्या किनाऱ्याजवळच्या ताशी १६० ते १८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. ही वादळी प्रणाली भारतापासून दूर असल्याने पश्‍चिम किनारपट्टीवर व लक्षद्वीप बेटांवर त्याचा विपरीत परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

बुधवारी सकाळी नैऋत्य अरबी समुद्रात असलेले वादळ ताशी १२ किलोमीटर वेगाने ओमान आणि येमेनच्या किनाऱ्याकडे झेपावत आहे. सकाळी साडेआठ वाजता हे वादळ सोकोट्रा बेटापासून २७० किलोमीटर अग्नेयेकडे, तर ओमानच्या सलालाहपासून ६७० किलोमीटर दक्षिणकडे समुद्रात थैमान घालत होते. गुरुवारी सकाळपर्यंत त्याचे अतितीव्र वादळात रूपांतर होणार आहे. या वेळी वारे ताशी १५० ते १६० किलोमीटर वेगाने फिरणार असून, ताशी १८० किलोमीटर वेगाने झोत वाहणार अाहेत. शनिवारी हे वादळ सलालाहजवळ किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. या वादळाने अरबी समुद्रावरील बाष्प ओढून घेतल्याने येमनच्या किनाऱ्यालगत दाट ढग गोळा झाले आहेत. गुरुवारी अरबी समुद्रातही १४५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्र खवळून उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे अंतर्गत अरबी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मॉन्सून लवकरच अंदमानात नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून) प्रगतीस पोषक हवामान तयार होत आहे. शनिवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या ७२ तासांमध्ये माॅन्सून दक्षिण अंदमानात दाखल होणार अाहे. तर, माॅन्सूनचे आगमन होताच अंदमानात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, शनिवारी अग्नेय अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि केरळच्या किनाऱ्यालगत वेगवान वारे वाहणार आहे. साेमवारपासून (ता.२८) केरळसह पश्‍चिम किनाऱ्यावर मुसळधार पावसाची शक्यता अाहे. मासेमारीसाठी किनाऱ्यालगतच्या समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com