कांद्यावरील ‘एमईपी'ने निर्यातीत खोडा

कांद्यावरील ‘एमईपी'ने निर्यातीत खोडा
कांद्यावरील ‘एमईपी'ने निर्यातीत खोडा

नाशिक : किमान निर्यात मूल्य हटविल्यानंतर गतवर्षी ३५ लाख टनांपर्यंत निर्यात झाली आहे. त्यानंतर लादलेली ८५० डॉलर ही कांदा निर्यातीत अडथळा ठरत आहे. बाजारभाव आणि एमईपी यांत सद्यःस्थितीत मोठी तफावत आहे. देशांतर्गत गरजेपेक्षा यंदाही अधिक उत्पादन येण्याचे संकेत आहेत. गुजरात, राजस्थान राज्यातील आवक सुरू झाली आहे. या स्थितीत कांद्यावरील ‘किमान निर्यात मूल्य’ (एमईपी)चे बंधन तातडीने हटवावे, अशीच मागणी या क्षेत्रातून होत आहे. देशातील कांदा शेती यंदा नैसर्गिक आपत्तीच्या कचाट्यात सापडली. खरीप व लेट खरीप कांद्याचे अतोनात नुकसान झाले. उत्पादनात निम्म्याने घट झाली. याच काळात तुटवडा निर्माण झाल्याने मागणी व दरात वाढ झाली. तब्बल दोन वर्षे तोट्यात कांदा विकल्यानंतर कांदा उत्पादकांना ऑक्‍टोबर महिन्यापासून खर्च निघेल असे दर मिळू लागले. या स्थितीत यंदा उन्हाळ कांद्याची मोठी लागवड झाली आहे. पुणे जिल्ह्यात हा कांदा बाजारात येण्यास सुरवात झाली आहे. राजस्थान व गुजरात राज्यातील उन्हाळ कांदाही बाजारात येण्यास प्रारंभ झाला आहे. याचा परिणाम येत्या काळात कांदा बाजारावर होईल. उत्पादन कमी असल्याने दर वाढले आहेत. ‘एमईपी’ वाढवूनही दरात फरक पडला नाही. येत्या काळात मात्र आवक वाढणार आहे. देशांतर्गत गरज जास्तीत जास्त १५० लाख टनांची असताना यंदाही त्यापेक्षा अधिक उत्पादन होईल अशी स्थिती आहे. या स्थितीत केंद्राने सध्याची ८५० डॉलरची एमईपी तातडीने हटवावी, अशी मागणी होत आहे.      वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, डॉ. सुभाष भामरेंना पत्र       शेतमाल बाजाराचे अभ्यासक दीपक चव्हाण यांनी कांद्यावरील ‘एमईपी’ पूर्णपणे हटवावी, या मागणीचे पत्र केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना दिले आहे. ते म्हणाले, की सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला ३००० रुपये क्विंटलचा दर मिळत असताना आपल्या ८५० डॉलर ‘एमईपी’ दराने कांद्याचा दर ५००० रुपयांचा पडत आहे. या दराने कांदा विक्री होणे अशक्‍य बाब ठरत आहे. यंदाही कांद्याचे विक्रमी उत्पादन होण्याची स्थिती आहे. या स्थितीत कांद्यावरील निर्यातीची बंधने पूर्णपणे काढून टाकावीत. सद्यःस्थितीत ‘एमईपी’ काढून टाकणे हेच सरकार व शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२० पर्यंत दुप्पट करण्याचे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे. कांद्याला चांगले दर मिळाले तरच हे शक्‍य आहे. ते दर मिळण्यात अडथळा आणून ते साध्य होणार नाही. खरीप व लेट खरीप कांद्याचे उत्पादन निम्म्याने कमी झाले आहे. जोरदार पावसाचा मोठा फटका या पिकाला बसला. उन्हाळ कांद्याचे क्षेत्र वाढल्याची माहिती आहे. सध्याची ‘एमईपी’ पूर्णपणे हटवणे गरजेचे आहे. - नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड शेतमालाच्या आयातीवर कोणतेच बंधन नाही. मग, निर्यातीवरच बंधने का? कांदा हे भाजीपाला वर्गातील पीक आहे. इतर भाज्यांच्या निर्यातीवर बंधने नाहीत. कांद्यावरील बंधन अनाठायी आहे. ते शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे. कांदा उत्पादक अनेक वर्षांपासून तोट्यात शेती करीत आहेत. या शेतीला सरकार हमीभाव देऊ शकत नाही. मात्र, किमान त्याच्यावरील बंधने तरी हटवली पाहिजेत. कांद्यावरील ‘एमईपी’ सरकारने पूर्णपणे काढावी. - चांगदेव होळकर, माजी वरिष्ठ संचालक - नाफेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com