व्यापारी, अडत्यांकडून शेतकऱ्यांची कोंडी

दादर ज्वारीची मळणी पूर्ण झाली आहे. पण आवक वाढताच दादर ज्वारीचे दर व्यापारी, अडतदारांनी पाडले आहेत. या बाबत शेतकऱ्यांनी चोपडा, अमळनेर, जळगाव बाजार समितीत नाराजी व्यक्त केली आहे.
व्यापारी, अडत्यांकडून शेतकऱ्यांची कोंडी Merchants, farmers' dilemmas
व्यापारी, अडत्यांकडून शेतकऱ्यांची कोंडी Merchants, farmers' dilemmas

जळगाव : खानदेशात दादर ज्वारीची मळणी पूर्ण झाली आहे. पण आवक वाढताच दादर ज्वारीचे दर व्यापारी, अडतदारांनी पाडले आहेत. या बाबत शेतकऱ्यांनी चोपडा, अमळनेर, जळगाव बाजार समितीत नाराजी व्यक्त केली आहे. बाजार समित्यांमध्ये प्रशासन लक्ष देत नाही, व्यापारी मनमानी करतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे  आहे. 

दादरची पेरणी खानदेशात यंदा वाढली आहे. सकस चारा व दर्जेदार धान्य मिळत असल्याने दादर ज्वारीचे पेरणी वाढली आहे. मका, संकरित ज्वारी ऐवजी दादर ज्वारीच्या विद्यापीठातर्फे संशोधित वाणांची पेरणी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. 

दादर ज्वारीचे दर मार्च महिन्याच्या सुरवातीला २४०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल होते. सुरुवातीला जळगाव बाजार समितीत प्रतिदिन ५०० ते ६०० क्विंटल आवक सुरू होती. परंतु या आठवड्यात आवक प्रतिदिन १५०० क्विंटलवर पोचली आहे. चोपडा, अमळेरातही आवक वाढली आहे.  आवक वाढताच किमान दर १८०० व कमाल दर २५०० एवढा झाला. फक्त काही शेतकऱ्यांच्या दादर ज्वारीला ३३०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. सरासरी दर २२०० रुपये प्रति क्विंटल झाला. मध्यंतरी या प्रकाराबाबत जळगाव बाजार समितीमध्ये काही शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली होती. परंतु प्रशासनाने शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली  नाही. 

चोपडा, जळगाव बाजार समितीत काही अडतदार एकी करून एकच दर लिलावात जाहीर करीत आहेत. तर काही अडतदार लिलावात सहभागीच होत नाहीत. आम्हाला लिलावात येण्याची गरज नाही, अशी अरेरावी देखील अडतदार, खरेदीदार करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. आवक वाढत आहे. कोरोनाचे संकटही आहे, अशा स्थितीत शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. यावर जिल्हा उपनिबंधक, प्रशासनाने अडतदार, शेतकरी यांची बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. अन्यथा या मुद्द्यावरून चोपडा, अमळनेर व जळगावात संतप्त शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com