जमीन सुपीकता, उत्पादकतावाढीसाठी उपाययोजना  

methods for increasing fertility and productivity of soil
methods for increasing fertility and productivity of soil

जमिनीतून एकापाठोपाठ विविध अन्नधान्ये पिके घेतल्यामुळे जमिनीचा कस कमी होत जातो. मातीची प्रत खालावते. जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढविण्यासाठी पुढील उपाययोजना कराव्यात.  माती परीक्षण

  • माती परीक्षणानुसार मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य वापर करावा. 
  • पीक फेरपालट  

  • दरवर्षी एकच पीक एकाच जमिनीवर घेतल्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण असंतुलित होते. जमिनीची उत्पादनक्षमता कमी होते.  
  • वर्षानुवर्ष एकाच प्रकारचे पीक एकाच जमिनीत घेतल्यामुळे ते जमिनीतील विशिष्ट एकाच थरातील अन्नद्रव्य शोषून घेतात.  त्या जमिनीत अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते. त्याचा विपरीत परिणाम पिकाच्या उत्पादकतेवर होतो. यासर्व गोष्टी टाळण्यासाठी यावरील योग्य उपाय म्हणजे पिकांची फेरपालट करणे होय.  
  • योग्य पीक फेरपालटीमुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण व जमिनीची सुपीकता राखण्यास मदत होते. पीक उत्पादनात वाढ होते. 
  • आंतरपीक पद्धती

  •  आंतरपिक व मिश्र पीक पद्धतीमध्ये घेतली जाणारी पिके ही एकमेकांच्या वाढीसाठी अनुकूल असावीत.  आंतरपीक पेरणीने जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते. काही पिकांच्या मुळ्या जमिनीत खोलवर जातात, तर काहीच्या अगदी थोड्याच खोलीवर पसरतात. जमिनीच्या वेगवेगळ्या खोलीवर उपलब्ध असलेली अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होतात. 
  • जैविक खताचा वापर

  • वातावरणामध्ये नत्र वायूचे प्रमाण ७८ टक्के आहे. मात्र, हा नत्र साठा पिकास उपलब्ध होत नाही. या नत्र साठ्याचा उपयोग पिकांना करून देण्यामध्ये जिवाणू मोलाची भूमिका निभावतात.  
  • पीक उत्पादनासाठी अशा उपयुक्त जिवाणूंचा वापर करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यासाठी रायझोबिअम, ॲझोटोबॅक्‍टर, ॲझोस्पिरीलम आणि ॲसिटोबॅक्‍टर इ. या नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंचा उपयोग होतो. हे जिवाणू वनस्पतीवर स्वत:ची उपजीविका न करता जमिनीतील सेंद्रिय पदार्थावर स्वत:ची उपजीविका व पोषण करतात. हे जिवाणू हवेतील नत्र जमिनीमध्ये स्थिर करून पिकांना उपलब्ध करून देतात. 
  • द्विदल वनस्पतींचा वापर

  •  मूग, चवळी, उडीद, सोयाबीन, मटकी, कुळीथ व गवार या पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर त्यांचे सर्व अवशेष जमिनीत गाडावेत.  
  • सर्वसाधारणपणे द्विदल वनस्पतींच्या पानामध्ये २.० ते ३.० टक्के नत्र असते. लवकर वाढ होणाऱ्या द्विदल वनस्पती जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी तिथेच वाढवून जमिनीत गाडाव्यात. 
  •   मृद व जलसंधारण

  • जमिनीची धूप नियंत्रीत करण्यासाठी तसेच जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी मृद व जलसंधारण करणे गरजेचे आहे. विशेषत: मूलस्थानी मृद व जलसंधारणाच्या समपातळीवरील वरंबे, ढाळीचे वरंबे, बंदिस्त वाफे, मोठ्या आकाराचे वाफे, समपातळीत मशागत, सरी वरंबा पद्धत, जैविक बांध, अर्धवर्तुळाकार वरंबा व आच्छादने या पद्धतीचा अवलंब करावा. यामुळे जमिनीची धूप कमी होते. जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते.  
  • जमिनीला विश्रांती देणे  

  • जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी जमीन नांगरून एक वा अधिक वर्ष तशीच पेरणीवाचून राहू द्यावी. या काळात या जमिनीवर मेंढ्या बसवण्या यासारखे उपाय अवलंबावेत. मात्र, अशा प्रकारे जमीन पडिक ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.  अत्यंत गरजेच्या वेळी हा उपाय वापरावा.
  • सेंद्रिय खतांचा वापर

  • जास्त पाऊस पडणाऱ्या व पाटपाण्याची व्यवस्था असणाऱ्या प्रदेशात सेंद्रिय खताचा वापर वाढवावा. योग्य प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीचा कस टिकून राहण्यास मदत होते.  
  • शेतातील काडी कचरा व ग्रामीण कंपोस्ट

  • शेतातील वाया जाणारी पिके, रोपे, त्यांच्या काड्या, पालापाचोळा इत्यादीचा वापर कंपोस्ट बनविण्यासाठी करावा. शेतातील पिके अवशेष, शेण, मूत्र याबरोबरच नत्र, स्फुरद देणारी रासायनिक खते, काही प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांची खते व सेंद्रिय पदार्थ कुजविणारे जीवाणू यांचा वापर करावा. शास्त्रीयदृष्ट्या योग्य पद्धतीचा वापर करून उत्कृष्ट कंपोस्ट तयार करावे. 
  • शहरात वाया जाणारे विविध टाकाऊ पदार्थ

  • शहरात वाया जाणारे विविध टाकाऊ सेंद्रिय पदार्थ भरपूर असतात. त्यांचा वापर करून कंपोष्ट तयार करावे. त्यातून शहरामध्ये हंगामी पिके किंवा भाजीपाला उत्पादन घेणे शक्य आहे.
  • शहरी घन कचरा

  • शहरामध्ये घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या जाणवत आहे. असा साठवलेला कचरा एकत्र करून त्यापासून कंपोस्ट बनवल्यास शेतीक्षेत्रासाठी उपयुक्त ठरू शकेल. अलीकडे अनेक नगरपालिका, पंचायती कचऱ्याची वर्गवारी करून घेतात. अशाप्रकारे गोळा केलेल्या कचऱ्यापासून कंपोस्ट करणे सोपे होते. 
  • सांडपाणी किंवा द्रवरूप कचरा

  •  शहरातील दररोज वाहून जलस्रोत प्रदूषित करणारे सांडपाणी, मैलामिश्रित पाणी यांचाही शेतीसाठी वापर होऊ शकतो. मात्र, यातील आरोग्याच्या समस्यांचा विचार करून त्यावर योग्य त्या प्रक्रिया करणे आवश्यक आहे. खेड्यामध्येही गोठ्यातील जनावरांच्या मलमूत्रयुक्त पाण्याचा वापर शेणखत कुजविण्यासाठी होऊ शकतो.
  • संवर्धन शेती

  • नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करून शेतीमधील वेगवेगळ्या निविष्ठांमध्ये बचत करता येते. यातून उत्पादनामध्ये भरीव वाढ साध्य करता येते.  
  • उदा. महाराष्ट्रात खरिपामध्ये भात घेतल्यानंतर रब्बीमध्ये जमिनीची मशागत न करता वाल घेतला जातो. अशा पद्धतीने उसाच्या शेतीमध्येही लागवडीच्या उसानंतर खोडवा ठेवताना शून्य मशागतीचा अवलंब करावा. यातील पाचटाचे आच्छादन करावे. शून्य मशागतीमुळे जमिनीची धूप कमी होते. त्याद्वारे वाहून जाणारी पोषक अन्नद्रव्ये वाचविता येतात. पुढील पिकाची लवकर पेरणी करता येते. पहिल्या पिकांच्या सेंद्रिय अवशेषाचा खत म्हणून पिकांस उपयोग करून घेता येतो.
  •   संपर्कः डॉ. आनंद गोरे, ९५८८६४८२४२   बाळू धारबळे, ९०९६९४४९२४  डॉ. सुनील जावळे, ९४२२१११०६१  (प्रमुख अन्वेषक, सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com