म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची २ कोटी ६० लाख रुपयांची वसुली 

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची २ कोटी ६० लाख रुपयांची वसुली 
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची २ कोटी ६० लाख रुपयांची वसुली 

सांगली ः  म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे १३० दिवसांपासून सुरू असलेले हिवाळी आवर्तन आता उन्हाळा अर्ध्यावर आल्यावर काही दिवस बंद होण्याची शक्यता आहे. अपुरी मागणी आणि वाढत चाललेले वीजबिल यामुळे चार आठ दिवसांत आवर्तन केव्हाही बंद होण्याची शक्यता आहे. चार महिन्यांत पावणे पाच टीएमसी पाणी सिंचनासाठी आणि सव्वा दोन टीएमसी पाणी पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. आवर्तनादरम्यान २ कोटी ६० लाख रुपयांची वसुली दिली आहे. आता ४ कोटी ९० लाख रुपये थकबाकी झाली आहे.

जिल्ह्यातील मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, तासगाव आणि जत या चार तालुक्यांतील दुष्काळी भागाला म्हैसाळ योजनेच्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या आवर्तनातून सुमारे ७ टीएमसी पाण्याचा लाभ झाला. त्यामुळे या भागातील दुष्काळ थोडा सुसह्य बनला आहे. पुन्हा एकदा म्हैसाळ योजना या लाभक्षेत्राची संजीवनी ठरली आहे.

या पाण्याचे वीजबिल सुमारे साडेआठ कोटी रुपये होते. शेतकऱ्यांनी आवर्तनादरम्यान २ कोटी ६० लाख रुपयांची वसुली दिली आहे. आता ४ कोटी ९० लाख रुपये थकबाकी झाली आहे. सव्वा दोन टीएमसी पाण्याचे सुमारे साडेतीन कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दुष्काळ आणि टंचाई निधीतून भरले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

सिंचनासाठीच्या पावणे पाच टीएमसी पाण्याचे १९ टक्के शेतकरी वाट्याचे बीजबिल साडेआठ कोटी आहे. उन्हाळी आवर्तनावेळी त्यापैकी पाच कोटी रुपये भरावे लागणार आहेत.

१८५ तलावात म्हैसाळचे पाणी आवर्तनात काही पाणी तलावात सोडले आहे. काही ठिकाणी सिंचन आणि पिण्यासाठी या दोन्ही उद्देशाने मूल्यांकन करून तलावात पाणी सोडण्यात आले आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ ते कवठेमहांकाळपर्यंत १२४ तलावांत आणि जत तालुक्यातील ६१ तलावांत पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. 

आठ दिवसांत आवर्तन होणार बंद सध्या म्हैसाळ योजनेचे शाखा कालवे पाण्याची मागणी नसल्याने बंद आहेत. पंप संख्या कमी केली आहे. तूर्त फक्त जत तालुक्यात पाणी सुरू आहे. अपुरी मागणी आणि वाढते बीजबिल लक्षात घेता म्हैसाळ योजना चार ते आठ दिवसांत बंद होण्याची शक्यता आहे.

सहा पंपगृहातील पंप संख्या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ११, दुसऱ्या १३, तिसऱ्या ९, चौथ्या ९, पाचव्या ६, बनेवाडी २,  गव्हाण ३, नव्याने सुरू केलेल्या आगळगाव अ आणि ब मध्ये ६ पंप सुरू आहेत. डोंगरवाडी आणि विस्तारित गव्हाण योजना तूर्त बंद केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com