कोल्हापूर जिल्ह्यात नदीकाठच्या गावांत स्थलांतरास प्रारंभ
कोल्हापूर जिल्ह्यात नदीकाठच्या गावांत स्थलांतरास प्रारंभ

कोल्हापूर जिल्ह्यात नदीकाठच्या गावांत स्थलांतरास प्रारंभ

कोल्हापूर : धरणक्षेत्रात पाऊस कायम असल्याने धरणांतून होणारा विसर्गही कायम आहे. यामुळे नद्यांचे पाणी रविवारी (ता. ८) दुपारपर्यंत झपाट्याने शिवारात पसरले. वाढत्या विसर्गामुळे पाणी नागरी वस्तीत शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावातील लोकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन रविवारी प्रशासनाने केले. काही कुटुंबांनी स्थलांतरही सुरू केले आहे. सायंकाळपर्यंत राधानगरी धरणाच्या ४ स्वयंचलित दरवाजांमधून ७,११२ तर कोयनेतून ६९,७३९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. अालमट्टीमधून २,३०,००० पाण्याचा विसर्ग सुरू होता.   शनिवारी सायंकाळी जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी पुन्हा पावसाचा जोर कायम राहिल्याने रविवार सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा अस्वस्थता पसरली. प्रमुख नद्यांवरील धरणांच्या पाण्याच्या विसर्गात पंचवीस टक्क्‍यांपर्यंत वाढ झाल्याने पाणी ओसरण्याची आशा पुन्हा मावळली. प्रशासनाने रविवार व सोमवारी दिलेला पावसाचा इशारा पाहता प्रशासनाने पावले उचलण्यास सुरवात केली आहेत. करवीर तालुक्‍यातील नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरात पूर्ण फटका बसलेल्या आंबेवाडी व चिखली गावांमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आवाहन करण्यात आले. ज्यांना ज्यांना शक्‍य आहे. त्यांनी तातडीने जनावरांसहित सुरक्षित ठिकाणी जावे अशा सूचना तलाठी व अन्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना दिल्या.  एक-दोन तास जोरदार पाऊस व पुन्हा दोन-तीन तासांचा खंड असे प्रमाण पावसाचे राहात आहे. यामुळे धरणांच्या पाणी सोडण्याच्या प्रमाणातही कमी जास्त पणा येत आहे. परिणामी पाणी संथ गतीने वाढत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. कृष्णेचे पाणी कमी होत असल्याने कृष्णाकाठी काहीसा दिलासा मिळाला असला तरी, कोयना धरणांतून सातत्याने विसर्ग सुरू असल्याने पाऊस थांबला तरी, धीम्या गतीने पाणी ओसरण्याची शक्यता असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. ग्रामस्थांमध्ये भीती केवळ महिन्याभरात दुसऱ्यांदा पुराची शक्‍यता निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पंधरवड्यापूर्वीच राहायला आलेल्या घरात पुन्हा सामान उचलण्याची वेळ आल्याने ग्रामस्थ अस्वस्थ झाले. अनेकांनी तळमजल्यावरील सामान दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पंचगंगेची पातळी ३८.११ फुटांवर  रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पातळी ३८.११ फूट होती. जिल्ह्यातील ७१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अतिवृष्टीमुळे ४ राज्यमार्ग व १८ प्रमुख जिल्हा मार्गांवरील वाहतूक बंद आहे. हातकणंगले तालुक्‍यातील पन्हाळा, वाघबीळ, इचलकरंजी, शिरदवाड राज्य मार्ग क्र. १९२ या मार्गावरील इचलकरंजी मोठा जुना पूल पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने पूल जुना असल्याने खबरदारीसाठी वाहतूक बंद केली आहे.  राज्यातील प्रमुख धरणातून होणारा विसर्ग 

कोयना   ६९ हजार ७३९ कृष्णा 
उजनी ३० हजार भीमा 
खडकवासला   १८ हजार ४९१   मुठा 
मुळशी   १५ हजार ४०० मुळा 
वीर  १३ हजार ९६१  नीरा 
दूधगंगा १३ हजार २००  दूधगंगा 
राधानगरी  ७ हजार ११२ भोगावती 
वारणा   ३ हजार ६२० वारणा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com