agriculture news in marathi, milk agitation in state, Maharashtra | Agrowon

दुधाचा भडका; सरकारची कोंडी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 जुलै 2018

पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत थेट प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला पहिल्याच दिवशी दणदणीत प्रतिसाद मिळाला. 'दूध आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे,’ अशा घोषणा देत अनेक जिल्ह्यांमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी टॅंकर अडवून दूध ओतले. काही ठिकाणी टॅंकर पेटवण्याचे व दगडफेकीचे प्रकार झाले. दुधाच्या टंचाईचे सावट असलेल्या मुंबईसाठी पोलिस बंदोबदस्तात दूध पाठविले गेले. राज्यभर शेकडो कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे. 

पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत थेट प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला पहिल्याच दिवशी दणदणीत प्रतिसाद मिळाला. 'दूध आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे,’ अशा घोषणा देत अनेक जिल्ह्यांमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी टॅंकर अडवून दूध ओतले. काही ठिकाणी टॅंकर पेटवण्याचे व दगडफेकीचे प्रकार झाले. दुधाच्या टंचाईचे सावट असलेल्या मुंबईसाठी पोलिस बंदोबदस्तात दूध पाठविले गेले. राज्यभर शेकडो कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे. 

दरम्यान, सरकारशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे; मात्र बनवाबनवी करण्याचा प्रयत्न केल्यास संघर्ष करू, असा इशारा स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.  
स्वाभिमानीच्या आंदोलनाचे विधिमंडळाच्या अधिवेशनातही जोरदार पडसाद उमटले. दूध दरप्रश्नी विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले होते. राज्यात पुकारलेल्या बेमुदत दूध संकलन बंद आंदोलनाला पहिल्या दिवशीच १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा स्वाभिमानीने केला आहे. ठिकठिकाणी एकूण १०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ‘‘आम्ही सरकारशी चर्चेला तयार आहोत. अजूनही चर्चेचे आमंत्रण मिळालेले नाही. मुख्यमंत्र्यांनी जबाबदार प्रतिनिधी नेमल्यास आम्ही चर्चा करू. मात्र, कार्यकर्त्यांना हात लावाल तर आंदोलन अजून चिघळेल, असा इशाराही स्वाभिमानीने दिला आहे. 

राज्याच्या विविध भागांमध्ये रात्री बारा वाजता ग्रामदैवतांना अभिषेक घालून गावागावात आंदोलनला सुरवात झाली होती. दूध उत्पादनात आघाडीवर असलेल्या जिल्ह्यांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आलेला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांची धरपकड करूनदेखील मुंबई तसेच मुख्य शहरांच्या दिशेने टॅंकर पोचू न देण्यासाठी पोलिसांना चकवा दिला जात होता. रात्रभर गनिमी काव्याने टँकर अडविले जात होते. कोल्हापूरच्या गोकुळने तसेच दूध उत्पादनात आघाडीवर असलेल्या अहमदनगरमधील थोरात, प्रभात, राजहंस अशा प्रमुख दूध संघांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे आंदोलक व दूध संघांमध्ये संघर्ष टळला.

विदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी नागपूरकडे जाणाऱ्या टॅंकरला वरूड येथे आग लावण्याचा प्रयत्न केला. वाशीमच्या मालेगाव भागात राजहंचा ट्रक पेटविण्यात आला. नांदेड भागात टॅंकरचालक स्वतःच आंदोलनात सहभागी झाले होते. तेथे रस्त्यावर दूध ओतण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी कार्यकर्ते दिसेल त्या दूध गाडीच्या चाकाची हवा काढत होते. तसेच, काही भागांत कुत्र्याला दूध पाजून सरकारचा निषेध केला जात होता.

मराठवाड्यात नांदेडच्या निळा भागात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी राजहंसची दुधाची गाडी अडवून हवा सोडली आणि रस्त्यावर दूध ओतले. शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळालेच पाहिजे, भाजप सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी पोलिसांना पळता भुई थोडी केली होती. पश्चिम महाराष्ट्रातदेखील काही भागांत स्वाभिमानीने हिंसक आंदोलन केले. पुणे-बंगळूर महामार्गावरून मुंबईकडे दूध घेऊन निघालेल्या टॅंकरवर कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करीत दूध रस्त्यावर ओतले. वारणाचा टॅंकरदेखील अडवून टॅंकरचा कॉक सोडून देण्यात आला. सातारा-पंढरपूर हायवेवर शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतले. तेथे दुग्धविकासमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहनदेखील करण्यात आले. 

जानकरांना प्रतिआव्हान
राज्याचे पशुसंवर्धन आणि दुगधविकासमंत्री महादेव जानकर यांनी स्वाभिमानीची मागणी फेटाळून लावली. "कायदा हातात घेणाऱ्या आंदोलकांवर कारवाई करू. आमचेही कार्यकर्ते रस्त्यावर उतरवू. मुंबईला दूध कमी पडू दिले जाणार नाही, असे आव्हान श्री. जानकर यांनी दिले आहे. तसेच, दुधाला २० तारखेपासून तीन रुपये दरवाढ मिळणार आहे. जीएसटी कमी होताच आणखी दोन रुपये वाढवून एकूण पाच रुपये दरवाढ मिळणार आहे. त्यामुळे जनतेला वेठीस धरू नये, असे आवाहन श्री. जानकर यांनी केले. खासदार शेट्टी यांनी मात्र जानकरांना प्रतिआव्हान दिले. 

‘‘राज्यातील दूध डेअरीचालकांना सरकारी अनुदानाचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे दुधाला बारा रुपयांपर्यंत लाभ पदरात पाडून घेतले जाणार असताना, शेतकऱ्यांना मात्र तीन रुपये वाढ दिली जात आहे. सरकारची ही भूमिका फसवी आहे. जानकारांकडे किती कार्यकर्ते आहे हे आम्हाला मोजायचे आहेत,’’ अशा शब्दांत खासदार शेट्टी यांनी प्रतिआव्हान दिले आहे. 

चर्चेस तयार : शेट्टी 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी सोमवारी सायंकाळपर्यंत राज्य सरकारने कोणतीही चर्चा केली नव्हती. मात्र, सरकारने चर्चेसाठी बोलावल्यास राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात प्रतिलिटर पाच रुपये जमा करा किंवा दुधाच्या दरात पाच रुपये वाढ करा, असे दोन पर्याय आम्ही सरकारपुढे ठेवू. आम्ही चर्चेला तयार आहोत,’’ अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. ‘‘आज रात्री किंवा सकाळी जे टॅंकर विविध भागांत अडविले जात होते ते सर्व दूध रविवारी संकलित झालेले होते. मात्र, सोमवारी दिवसभरात कुठेही दूध संकलित झालेले नाही. त्यामुळे आम्ही तीव्रपणे आंदोलन पुढे नेवू. मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करावी. कारण, चर्चेला बोलावूनदेखील कोणी आलेले नाही, असे खोटेच ते बोलत आहेत. मुळात आम्हाला चर्चेचे अजूनही निमंत्रण आलेले नाही,’’ असे खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले. 

शेट्टींना अटक करून दाखवा : तुपकर
आमच्यावर पाळत ठेवण्यासाठी पोलिसांची मदत घेणाऱ्या सरकारने हिम्मत असेल तर खा. राजू शेट्टी यांना अटक करून दाखवावी, मग शेतकरी कशा पद्धतीने मैदानात उतरतील ते सरकारला दिसेल, असे आव्हान स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिले आहे. ‘‘दरवाढीच्या आंदोलनाबाबत आम्ही सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी तयार आहोत. मात्र, काही अधिकार असलेल्या प्रतिनिधीबरोबरच आम्ही चर्चा करू. बिगर अधिकाराचे लुडबूड करणाऱ्यांबरोबर आम्ही चर्चा करणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या भोवती सध्या अशीच माणसे गोळा झाली आहेत,’’ असे तुपकर म्हणाले.

स्वाभिमानीची चूक नाही : नरके
इंडियन डेअरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष व गोकुळचे संचालक अरुण नरके म्हणाले की, या आंदोलनाला स्वाभिमानी नव्हे, तर सरकारच जबाबदार आहे. गेल्या दोन वर्षांपासून सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, हेच सरकारने शेतकऱ्यांना शिकवले आहे.

आंदोलनाला पाठिंबा : गिड्डे
राष्ठ्रीय किसान महासंघ कोअर कमिटी सदस्य संदीपआबा गिड्डे पाटील म्हणाले, गेली दहा महिने आम्ही दुधासाठी संघर्ष करीत असताना राजू शेट्टी गप्प होते. आता ते राजकीय करियरसाठी आंदोलन करीत असले तरी ते शेतकऱ्यासाठी असल्यामुळे आमचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. 

शिवसेनेसह विरोधकांचा पाठिंबा
दुसऱ्या बाजूला मुंबईची दूध कोंडी करण्यासाठी खासदार शेट्टी यांनी हितेंद्र ठाकूर यांचीही मदत घेतली. बहुजन विकास आघाडीचे आमदार असलेले श्री. ठाकूर तसेच शिक्षक आमदार कपील पाटील, माजी खासदार बळिराम जाधव, विरारचे महापौर रमेश जाधव, मुंबई ऑटोरिक्षा व कामगार संघटनेचे शशांक राव यांची मदत घेत स्वाभिमानीकडून रणनीती आखली जात होती. विरोधकांसह शिवसेनेनेदेखील राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे फडणवीस सरकारची कोंडी करण्यात पहिल्या दिवशी खासदार शेट्टी काही प्रमाणात यशस्वी झाले. 

मुंबईत उद्यापासून टंचाई
मुंबईला रोज ५५ लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो. आज किमान २० ते ३० लाख लिटर पुरवठा होऊ शकलेला नाही. आगोदरचा साठा विचारात घेता आंदोलन सुरू राहिल्यास बुधवारपासून मुंबईत दुधाची टंचाई निर्माण होऊ शकते," अशी माहिती सूत्रांनी दिली. मुंबईला सोमवारी मात्र गुजरात, पश्चिम महाराष्ट्र व नाशिक भागातून पोलिस बंदोबस्तात दूधपुरवठा झाल्याचे सांगण्यात आले. विरारमधील अमूलचे संकलन केंद्र मात्र बंद ठेवण्यात आले होते.

आंदोलनातील घडामोडी

 •  राज्यभरात आंदोलनाला प्रतिसाद
 •  गावागावात ग्रामदैवतांना अभिषेक करून आंदोलनास प्रारंभ
 •  अनेक दूध संघांकडून संकलन बंद
 •  ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा रास्ता रोको
 •  अनेक ठिकाणी दूधगाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड
 •  शेकडो कार्यकर्त्यांना अटक
 •  विधानसभा, विधान परिषदेत पडसाद
 •  विरोधकांचे विधान भवनासमोर घंटानाद आंदोलन
 •  शिवसेनेसह विरोधकांचा आंदोलनाला पाठिंबा
 •  हरिभाऊ बागडे यांचे मुख्यमंत्र्यांना बैठक घेऊन तोडगा काढण्याचे निर्देश देण्याचे आश्वासन
 •  राजू शेट्टी चर्चेत सरकारसमोर दोन पर्याय ठेवणार 

इतर अॅग्रो विशेष
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...
नदी संवर्धनाचा केरळचा आदर्शकेरळ हे भारताच्या दक्षिण टोकाचे एक राज्य. अरबी...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सेंद्रिय धान्य महोत्सवातून हक्काची...तीन-चार वर्षांपासून कृषी विभागातर्फे पुणे येथे...
प्रयोगशीलतेने घडविली समृद्धी..अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील पाटेगाव (जि. नगर)...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शिवरायांची भविष्यवेधी ध्येयधोरणेछत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेचा राजा...
आपणच आपला करावा उद्धारशेती फायद्याची करायची असेल, तर शेतकऱ्यांनी एकत्र...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाची...औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर...
कापूस उद्योगाचे चीनमध्ये पाच हजार कोटी...जळगाव ः देशातील सूत व कापूस गाठींचा मोठा खरेदीदार...
हमीदराने खरेदीसाठी तुरीचे संपूर्ण...वाशीम ः तुरीचे स्वतंत्रपणे पीक घेण्याची पद्धत...
पंधरा लाख कापूस गाठींची खानदेशातील...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...