पंढरीत विठ्ठलाला दुग्धाभिषेक करुन आंदोलनाला प्रारंभ

गनिमी काव्याने मिळणार दूध आंदोलनाला धार
गनिमी काव्याने मिळणार दूध आंदोलनाला धार

अकोला : कर्नाटक व केरळच्या धर्तीवर राज्यातही दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून (ता. १६) अांदोलनाचा इशारा दिला आहे. अांदोलनात सहभागी शेतकरी दूध घालणार नाहीत. मुंबई, पुण्याकडे जाणारे टँकर पुढे जाऊ दिले जाणार नाहीत. पुरुष कार्यकर्त्यांसोबत महिलांची अाघाडीसुद्धा अांदोलनात सहभागी होत अाहे. आंदोलन दडपण्याची शक्यता लक्षात घेऊन स्वाभिमानीने ए, बी, सी, डी अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आंदोलकांची फौज तयार करून गनिमी काव्याने लढण्याची तयारी केली. आज (ता. १५) मध्यरात्रीला पंढरपुरात विठ्ठलाला दुधाचा अभिषेक करून हे अांदोलन होणार अाहे.   

विठ्ठलाला दुधाचा अभिषेकावेळी खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर, प्रकाश पोफळे व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, सरकार काही स्थानिक नेत्यांना हाताशी धरून जबरदस्तीने दूध घेऊ शकते. सरकारने पोलिस बळाचा वापर शेतकऱ्यांना दूध घेतल्यास संघर्ष होऊ शकतो. अांदोलन थांबवण्यासाठी सरकारच्या पातळीवरून प्रयत्न सुरू असले तरी मागणी मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे स्वाभिमानीच्या नेत्यांनी ठाम सांगत मुंबईसह मोठ्या शहरांचा दूधपुरवठा कुठल्याही परिस्थितीत बंद करण्याचा निर्धारही व्यक्त केला अाहे.  दूध अांदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस खासदार राजू शेट्टी व स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे विशेष करून दूध उत्पादन अधिक असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जागोजागी सभा घेत अाहेत. प्रत्येक ठिकाणच्या सभांना दूध उत्पादकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने हे अांदोलन राज्यात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात अधिक तीव्रतेने होण्याची शक्यता अाहे. 

खा. शेट्टींनी कोल्हापूर, इस्लामपूर, शिराळा, सांगली, पुणे, सोलापूर, सातारा, नगर जिल्‍ह्यात ठिकठिकाणी सभा घेऊन वातावरण तापवले. तर रविकांत तुपकरांनी औरंगाबाद, बीड, भूम, उस्मानाबाद, परंडा, बार्शी, सोलापूर, जामखेड, नगर, मंगळवेढा, सांगोला या भागांचा दौरा पूर्ण केला असून त्यांनीही दूध पट्टा पिंजून काढला. या दोघांनी त्या-त्या भागात जाऊन आंदोलनाची रणनिती तयार केली अाहे. राज्यात उत्पादित होणारे दूध मुंबई व मोठ्या शहरात जाऊ दिले जाणार नाही. तसेच, परराज्यातून दररोज येणारे साधारणतः दीड लाख लिटर दुधाचाही पुरवठा होणार नाही. यासाठी गुजरातमधून हार्दीक पटेलने या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे स्वाभिमानीचे नेते सांगत अाहेत. अशीच रणनीती कर्नाटक, मध्य प्रदेशातूनही अाखण्यात अाली अाहे. अांदोलनाची सुरवात पश्चिम महाराष्ट्रातून होत असली तरी याच्या सोबतीला विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातही दुधाचे हे आंदोलन पेटविण्याची रणनीती तयार करण्यात अाली अाहे. 

अांदोलनाच्या अनुषंगाने झालेल्या सभांमधून खा. शेट्टी यांनी अर्थशास्त्रीय मांडणीतून दुधाची आकडेवारी शेतकऱ्यांना समजावून सांगितली. तर तुपकरांनी नेहमीच्या अाक्रमक शैलीने शेतकऱ्यांना पेटवण्याचे काम चालविले आहे. सरकारने दूध पावडर निर्यातीवर ५० रुपये प्रतिकिलो तर दूध निर्यातीवर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले. मात्र, सरकारची ही घोषणा कशी फसवी आहे. याचा फायदा काही दूध संघानाच होणार असे स्वाभिमानीचे नेते शेतकऱ्यांना पटवून सांगत अाहेत. स्वाभिमानीने पुकारलेले हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकारच्या पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहे. मंत्री महादेव जानकर हे राजू शेट्टींचे मित्र असल्याने सरकार त्यांच्याच माध्यमातून मध्यस्थीसाठी प्रयत्न करीत अाहे. परंतु, अद्याप याला कुठलेही यश अालेले नाही.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com