मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने घट 

यंदा घरचा चाराच नाही. सारं इकत घ्यावं लागतंय. त्यामुळं सहा म्हशींचं निघणारं दूध, त्याला मिळणारे दर, पशुखाद्याचे वाढलेले दर याचं गणित जुळवताना सामना बराबरीत सुटतोय. सरकार आम्हाला उत्पादन खर्चही जास्त लागणार नाही हे पाहत नाही. एकीकडं दुष्काळ त्यात हा तोटा फार काळ सहन करता येणे नाही. - गणेश गर्जे, रामगव्हाण जि. जालना.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर लागली आहे. एप्रिलअखेरच्या तुलनेत मेअखेर आठही जिल्ह्यांतील प्रतिदिन दूध संकलनात जवळपास ९८ हजार लिटरची घट नोंदली गेली आहे. सकस खाद्याच्या अभावामुळे दुधाला अपेक्षित फॅट व एसएनएफ लागत नाही. त्यामुळे दुधाला न मिळणारे दर, यामुळे दुष्काळाशी दोन हात करून उभे राहू पाहणाऱ्या दूध उत्पादकांचा आधारवडच कोसळल्याची स्थिती आहे. 

मराठवाड्यात एप्रिल २०१७ ते मार्च १८ या अखेर आठही जिल्ह्यांत प्रतिदिन सरासरी ९ लाख २६ हजार लिटर दूध संकलन होत होते. २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये हा आकडा सरासरी १० लाख २४ हजार लिटर प्रतिदिनावर पोचला होता. गेल्या आर्थिक वर्षात मेअखेर मराठवाड्यात प्रतिदिन ९ लाख ७९ हजार लिटर दूध संकलन केले जात होते. चालू आर्थिक वर्षात मेअखेर त्यामध्ये घट नोंदली गेली असून, मराठवाड्यात सरासरी जवळपास ९ लाख ६२ हजार लिटरच दूध संकलन केले जात आहे. एप्रिल २०१९ अखेर मराठवाड्यात प्रतिदिन १० लाख ६० लिटर दूध संकलन केले जात होते. त्याचा विचार करता एका महिन्यात मराठवाड्यातील दूध संकलन प्रतिदिन ९८ हजार लिटरने घटून ९ लाख ६२ हजार लिटरवर आले आहे. 

सकस आहाराचा अभाव, उष्णता, मोठ्या प्रमाणात घटलेली दुधाळ जनावरांची संख्या, चारा, पाणी प्रश्न, यामुळे दुग्धोत्पादन घटले आहे. दुसरीकडे पशुखाद्याचे वाढत चाललेला दर, दुधाचे तीस ते चाळीस टक्‍क्‍यांपर्यंत घटलेले उत्पादन, अपेक्षित दर मिळण्यासाठी दुधाला लागत नसलेला फॅट- एसएनएफ, यामुळे मिळत नसलेले दर या सर्व कारणांमुळे दुग्ध व्यवसाय आतबट्ट्याचा ठरतो आहे. शासनाने यावर उपाय म्हणून राबविलेली अनुदान योजना मेपासून बंद आहे. त्यातही आधीच्या अनुदानाचे प्रश्न कायम आहेत. 

कडब्याची एक पेंडी काही ठिकाणी ३६ रुपयांपर्यंत गेली. उसाचा दर चार ते साडेचार हजार रुपये टनावर जाऊन पोचला. पैसे खर्चण्याची तयारी असूनही चारा मिळेनासा झालाय. पशुखाद्यात सरकी पेंडीचे दर प्रतिक्‍विंटल १७०० पासून १८०० रुपयांपर्यंत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.   ...तर दूध व्यवसाय बंद करावा लागेल  दुग्ध व्यवसायाची बिकट स्थिती शेतकरी नेते धनंजय धोर्डे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. चारा दुपटीने महाग झाला, पशुखाद्य दीडपट महागले, जनावरांना वेळेवर औषधोपचार व लसीकरण केले जात नाही, औषधांच्या किमतीही वाढल्या, या सर्वाचा परिणाम दूध उत्पादनावर होउन ते घटले शिवाय शेतकऱ्यांना १७ ते २२ रुपयांपर्यंतच दर मिळतात. दुग्ध व्यवसाय व त्याच्याशी संबंधित शेतकऱ्याला सावरण्यासाठी शासनाने पावले उचलण्याची मागणी श्री. धोर्डे यांनी केली. असे न केल्यास दूध उत्पादकांना नाइलाजाने हा धंदा बंद करण्याची वेळ येईल, असेही श्री. धोर्डे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे. 

शेतकरी प्रतिक्रिया

चार गायींपासून दररोज ३० लिटर दूध निघते. २२ ते २३ रुपये दराने दिवसाला ६५० रुपये दूध विक्रीतून मिळतात. ४०० चा ऊस, २०० चा सुका चारा व ३०० रुपयांचे पशुखाद्य मिळून खर्च ९०० रुपयांवर गेला. तीन महिन्यांपासून हे सुरू आहे. जनावर विकावं तर ६० हजाराची गाय २० हजाराला मागतात. काय करावं सारं अवघड होऊन बसलं.  - दीपक लकडे, दूध उत्पादक, मोहा, जि. उस्मानाबाद 

उत्पादन घटलं अन्‌ खर्च दुप्पट वाढला. उसाशिवाय दुसरा चारा नाही. तो पण दूरवरून इकत आणावा लागतो. फॅट-एसएनएफ अपेक्षित लागत नसल्याने दर १७ ते २२ च्या दरम्यान राहतात. सुरू असलेलं अनुदान बंद केलंय. सरकार काही लक्ष देईना. गायी इकावं त त्या बी कमी दरातच इकण्याची वेळ.  - राजेंद्र तुरकने, लाखेगाव, जि. औरंगाबाद 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com