नगर जिल्ह्यात दूध संकलन बंद

दूध दरप्रश्नी आंदोलन
दूध दरप्रश्नी आंदोलन

नगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पुकारण्यात अालेल्या अांदोलनाला नगर जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरात असलेल्या सहकारी अाणि खासगी दूध संकलन केंद्रावर सोमवारी (ता. १६) दूध संकलन बंद होते. जिल्हाभरात दर दिवसाला साधारण २४ लाख लिटर दूध संकलन होते. सोमवारी मात्र सुमारे दोन लाख लिटरही दूध संकलन झाले नाही. दरम्यान, पोलिसांनी जिल्हाभरातील `स्वाभिमानी` सह विविध संघटनांच्या ३५ कार्यकर्त्यांना अटक केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान महासभेसह दूध आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या ३५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा दिल्या.

दुधाला २७ रुपये प्रतिलिटर दर मिळावा किंवा प्रतिलिटर पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून आंदोलन पुकारले आहे. त्याला जिल्हाभरातील शेतकरी, कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. जिल्ह्यामध्ये बारा सहकारी दूध संघाअंतर्गत ८७९ दूध संस्था अाहेत. शिवाय १४५ खासगी दूध संकलन केंद्रे आणि म.िल्टस्टेट दूध संघ अाहेत. या सर्वांमार्फत जिल्हाभरात २४ लाख लिटर दूध संकलन केले जाते. सोमवारी मात्र काही अपवाद वगळता सर्व ठिकाणी दूध संकलन बंद होते.

शेवगाव शहरात क्रांती चौकात ‘स्वाभिमानी’चे तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, दत्ता फुंदे, बाळासाहेब फटांगरे, भीमराज भडके, रमेश कुसळकर, मच्छिंद्र आरले यांनी मोफत दूध वाटले. तालुक्यातील निंबेनांदुर येथे सोमनाथ पावले, अजय बुधवंत, रमेश कुटे, भाऊसाहेब गर्जे, बाळासाहेब बडे यांनी रस्त्यावर दूध अोतून सरकारच्या भूमिकेचा निषेध केला.

राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी अाखाडा येथे ग्रामदैवत जगदंबा देवीला अभिषेक कररून मराठा महासंघाचे शिवाजीराव डौले, प्रकाश भुजाडी, रोहिदास धनवडे, दादा सरोदे, अादिनाथ गुंजाळ, राजेंद्र येवले यांच्यासह शेतकऱ्यांनी सुमारे सात हजार लिटर दूध मोफत वाटले. भाळवणी (ता. पारनेर) येथील शेतकरी संदीप व्यवहारे यांनी दूध अोतून सरकारचे निषेध केला. वडगाव अामली येथे कल्याणकारी दूध संघटनेचे गुलाबराव डेरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ग्रामदैवतेला अभिषेक केला. दूध उत्पादनात कायम अग्रेसर असलेल्या देहेरे (ता. नगर) येथे एक लिटरही दूध संकलन झाले नाही. मानोली (ता. संमगनेर) येथेही कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी ग्रामदेवतेला दुग्धाभिषेक केला. अनेक ठिकाणी लोकांना मोफत दूध वाटले गेले. जिल्ह्यामधील प्रमुख दूध संघांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला अाहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्रीच आंदोलनाला सुरवात केली. त्यानुसार जिल्हाध्यक्ष रवी मोरे, दिनेश वराळे, अरुण डौले, किशोर वराळे, गोविंद वारघुले अादींसह कार्यकर्त्यांनी शिर्डी येथे श्री साई बाबा मंदिरासमोर दुग्धाभिषेक करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना अटक करण्यात आली.

पाथर्डीचे तालुकाध्यक्ष शरद मरकड यांच्यासह अन्य दोन कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. जिल्हाभरात सुमारे ३५ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली अाहे. किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्यासह दूध आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या ‘स्वाभिमानी’, किसान सभेसह अन्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आंदोलन करण्यास प्रतिबंध करत असल्याबाबतच्या नोटिसा दिल्या अाहेत. जिल्हाभर दूध अांदोलन सुरू असून, दूध संकलन बंद अाहे. मात्र, जिल्ह्यामधील संगमनेर, नगर, पारनेर, नेवासे अादी भागांतील सुमारे २५ टॅंकर दूध पोलिस संरक्षणात मुंबई, पुण्याकडे नेल्याचा दावा पोलिस प्रशासनाने केला आहे. शेतकऱ्यांना गरज पडेल तेथे सक्षमपणे पोलिस संरक्षण दिले जाईल, असे प्रशासन अाणि पोलिस सांगत अाहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com