नगर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही दूध संकलन बंद

दूध दरप्रश्नी आंदोलन
दूध दरप्रश्नी आंदोलन

नगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारपासून (ता.१६) पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला नगर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशीही (मंगळवारी) चांगला प्रतिसाद मिळाला. मंगळवारी जवळपास सगळ्याच ठिकाणी दूध संकलन बंद होते. मात्र जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात मंगळवारी तीन लाख लिटर दुधाचे संकलन झाले आहे.

दुधाला २७ रुपये प्रतिलिटर दर मिळावा किंवा प्रतिलिटर पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून आंदोलन पुकारले आहे. त्याला जिल्हाभरातील शेतकरी,कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. शिवसेना व अन्य पक्ष, संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

जिल्ह्यामध्ये बारा सहकारी दूध संघाअंतर्गत ८७९ दूध संस्था, १४५ खासगी दूध संकलन केंद्रे आणि मल्टिस्टेट दूध संघामार्फत जिल्हाभरात दर दिवसाला साधारण २४ लाख लिटर दूध संकलन केले जाते. मंगळवारी एखादा अपवाद वगळता सर्वच ठिकाणी दूध संकलन बंद होते.

मंगळवारी सकाळी संकलन केलेले दूध घेऊन वाहन जात असल्याची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नगर- औरंगाबाद रस्त्यावरील इमामपुर घाटात ते वाहन अडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतून दिले आणि कार्यकर्ते पसार झाले. श्रीगोंदा येथे काँग्रेस पक्षातर्फे दूध दरासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

नगर तालुक्‍यातील देहेरे हे दूध उत्पादनात आघाडीवर असलेले गाव आहे. या गावांत दर दिवसाला साधारण बारा हजार लिटर दूध संकलित केले जाते. मात्र, दुधाला दर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे साऱ्या गावानेच आंदोलनात सहभाग घेतला. दूध संकलन केंद्र चालकांनीही त्याला पाठिंबा दिला. त्यामुळे मंगळवारीदेखील देहऱ्यात दूध संकलन बंद होते, असे संकलन केंद्र चालक विजय लांडगे यांनी सांगितले.

सरकारमध्ये मागच्या दाराने आलेल्या दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत शेतकरी आणि आंदोलकावर दडपशाही करत आहेत. पोलिस आमच्या पाळतीवर असून फोनवरील बोलणे टॅप करत आहेत. कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन कुटुंबाला त्रास देण्याचेही काम चालू आहे. आम्ही हक्क मागत असताना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देत असून आंदोलन मोडण्यासाठी बळाचा वापर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केला. काही झाले तरी मागण्या मान्य होईपर्यंत दूध जाऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.  

स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाला नगर जिल्ह्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाचा नाईलाज झाला आहे. ‘स्वाभिमानी’सह आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांची पोलिस वेगवेगळ्या कारणाने धरपकड करत आहेत. मात्र अटकेची तसेच अन्य माहिती दिली जात नाही.

जिल्हा दुग्ध विकास अधिकारी व्ही. एन. नारखेडे म्हणाले, की मंगळवारी अनेक भागात दूध संकलन सुरू झाले आहे. सोमवारी सकाळी जेथे केंद्रे सुरू झाली नाही ती संध्याकाळी सुरू होती. आजपर्यंत (बुधवार) अनेक भागातील संकलन केंद्रे सुरू होतील. मंगळवारी दिवसभरात २४ लाखांपैकी तीन लाख लिटरच्या जवळपास दूध संकलन झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com