कोल्हापुरात दुसऱ्या दिवशी दूध संकलनात व्यत्यय

कोल्हापुरात दुसऱ्या दिवशी दूध संकलनात व्यत्यय
कोल्हापुरात दुसऱ्या दिवशी दूध संकलनात व्यत्यय

कोल्हापूर : दूध आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आज (मंगळवारी) दुधाच्या संकलनात जिल्ह्यात व्यत्यय आला. गोकुळ, वारणासह अन्य दूध संघाचे संकलन पंधरा ते वीस टक्के इतके झाले. विशेष करून हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यातील अनेक गावांतील दूध संस्थांनी मंगळवारी सकाळपासूनच दूध संकलन बंद केल्याने शेतकऱ्यांनी दूध घरातच ठेवणे पसंत केले. शाहूवाडी सरुड (ता. शाहूवाडी) मुडशिंगी (ता. करवीर) येथे टॅंकर अडवून दूध रस्त्यावर ओतण्याचे प्रयत्न झाले. ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांकडून दूध घेऊन त्याचे मोफत वाटप विविध ठिकाणी केले.

विविध वृद्धाश्रम, शाळा आदींसह इचलकरंजीतील पैलवान, गरजू नागरिकांना दूधाचे वाटप करण्यात आले. शाहूवाडी तालुक्‍यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन तीव्र केले. सरुड येथे तीन टॅंकर अडवून एक हजाराहून अधिक लिटर दूध रस्त्यावर ओतून देण्यात आले. संघटनेच्या वतीने सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. कोल्हापूर जिल्हा दूध संघांच्या (गोकुळ) संघाने करवीर तालुक्‍यातील बहुतांशी गावातून दुधाचा संकलन केल्याचा दावा केला आहे. हातकणंगले, शिरोळ, कागल, राधानगरी तालुक्‍यांतील संकलनात मात्र घट झाली आहे.

दूध आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शिरोळ तालुक्‍यात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. स्वाभिमानीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पकडून त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक मिळत असल्याचा आरोप स्वाभिमानीच्या वतीने करण्यात आला आहे. अनेक दूध संघांनी आवाहन करूनही शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दूध संस्थेला दूध घातले नाही. यामुळे दुग्ध संस्थांचे संकलन बंद राहिले. विशेष ज्या भागात संघटनेचे प्राबल्य आहे. त्या गावांमध्ये संकलन बंद राहिले. दूध संघांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी प्रत्येक संघांचे वीस ते पंचवीस टक्केच दूध सकाळच्या सत्रात संकलित करण्यात आले. काही वाहने पोलिस बंदोबस्तात मुंबईकडे रवाना केली असली, तरी ते प्रमाण खूपच कमी असल्याने मुंबईत दुधाची चणचण निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com