दूध उद्योगाने विक्रीदर दोन रुपयाने वाढविले

दूध दर
दूध दर

पुणे : शेतकऱ्यांना प्रतिलिटर किमान २५ रुपये खरेदीदर देण्यासाठी ग्राहकांसाठीच्या दूध विक्रीदरात शनिवारपासून (ता. ८) दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय दूध उद्योगाने घेतला आहे.  महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने विक्रीतील दरवाढीचा निर्णय एकमताने घेतला आहे. सहकारी व खासगी दूध डेअरीचालकांची सध्याची प्रभावी संघटना समजली जाते. राज्यात सध्या २५० डेअरी प्रकल्प आहेत. त्यातील १७३ प्रकल्पांनी कल्याणकारी संघाचे सभासदत्व स्वीकारले आहे. “शेतकऱ्यांना चार पैसे जादा मिळण्यासाठी दूध खरेदीच्या किमती वाढविणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी विक्रीदर वाढविणे आवश्यक असते. मात्र गाय दुधाचे विक्रीदर प्रतिलिटर ४४ रुपयांपेक्षा न वाढविण्याचा निर्णय सर्वांनी घेतला आहे,” असे संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.  दूध प्रकल्पांनी आता दूध उत्पादकांना वाढीव एसएनएफ देणे सुरू केले आहे. यापूर्वी दुधाचा सरकार निश्चित दर २५ रुपये असला तरी एसएनएफ कपात एक रुपया पॉइंट होती. म्हणजेच दोन पॉइंट कमी एसएनएफ लागल्यास ८.३ च्या दुधाचे हाती २३ रुपये मिळत होते. आता एसएनएफ कपात फक्त ४० पैसे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे दोन रुपयांची कपात आता फक्त ८० पैशांवर आली आहे.  फॅटमधील वाढ आधी ३.५ साठी दहा पैसे होती. ती आता २० पैसे करण्यात आलेली आहे. त्यामुळे एसएनएफ आणि फॅटमधील सुधारित दराप्रमाणे शेतकऱ्यांकडे किमान ७० पैसे जादा जात असल्याचा दावा डेअरीचालकांचा आहे. दुष्काळामुळे राज्यातील पशुधनाला चारा व पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. त्यामुळे डेअरीप्रकल्पांचा दूधपुरवठा  सध्या २० ते ३० टक्क्यांनी घटल्याचे दिसत आहे. ही स्थिती पुढील किमान दोन महिन्यांपर्यंत कायम राहील, असा अंदाज डेअरी उद्योगातून व्यक्त केला जात आहे. “दुष्काळाच्या स्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांची घडी विस्कटणार नाही याची दखल दूध प्रकल्पांनी घेतली पाहिजे. त्यामुळेच शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपयांपर्यंत दर देण्याची भूमिका सर्व प्रकल्पांनी घेतली आहे,” असे संघाचे म्हणणे आहे.  सोनाईने दिला ४ लाख शेतकऱ्यांना दिलासा दुष्काळात अडचणीत आलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सोनाई दूध उद्योग समुहाने एक जूनपासूनच प्रतिलिटर २५ रुपये केला आहे. त्याचा लाभ चार लाख शेतकऱ्यांना होईल, अशी माहिती सोनाईचे डेअरी उद्योग समूहाचे अध्यक्ष दशरथदादा माने यांनी दिली. राज्यात आता दुधाची आवक कमी झाली आहे. मात्र पुरवठा आणि मागणी याचे प्रमाण स्थिर आहे. त्यामुळे दुधाचे भाव टिकून राहण्यास मदत होऊ शकते. सरकारने अनुदानाचा टप्पा पुढे चालू ठेवल्यास शेतकऱ्यांना आणखी दिलासा मिळू शकतो, असेही श्री. माने यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com