दूध चळवळीला उतरती कळा; संघ झाले राजकारणाचा अड्डा, एक ब्रॅंडचा अभाव

परराज्यांतील दूध संघांनी महाराष्ट्रात दूधसंकलनात मोठी आघाडी घेतली आहे. पिशवीबंद दुधाच्या बाजारपेठेचा किमान पन्नास टक्के वाटा परराज्यांतील संघांच्या ताब्यात गेला आहे.
दूध चळवळीला उतरती कळा; संघ झाले राजकारणाचा अड्डा
दूध चळवळीला उतरती कळा; संघ झाले राजकारणाचा अड्डा

पुणे : परराज्यांतील दूध संघांनी महाराष्ट्रात दूधसंकलनात मोठी आघाडी घेतली आहे. पिशवीबंद दुधाच्या बाजारपेठेचा किमान पन्नास टक्के वाटा परराज्यांतील संघांच्या ताब्यात गेला आहे. ‘अमूल’ने राज्याच्या दूध व्यवसायावर वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. त्यापाठोपाठ नंदिनी, पंचमहाल, तिरुमला, मदर डेअरी आदी दूध संघांचाही व्यवसाय विस्तार वाढत आहे. कोरोना महामारीच्या काळात राज्यातील सहकारी संघांची दूध विक्री घटली असताना ‘अमूल’ने मात्र व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून दूध विक्री वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले. परिणामी एकट्या मुंबईत ‘अमूल’च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत तब्बल १५ टक्के वाढ झाली, अशी माहिती इंडियन डेअरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी दिली. 

प्रचंड आर्थिक ताकद, देशभर असलेले विक्रीव्यवस्थेचे जाळे आणि संपूर्ण व्यावसायिक व्यवस्थापन याच्या जोरावर ‘अमूल’ने  महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली. राज्यातील स्थानिक सहकारी दूध संघ व्यावसायिक पद्धतीने न चालवता राजकारणाचे आखाडे झाल्यामुळे दूध चळवळीला उतरती कळा लागली. मोजके अपवाद वगळता राज्यातील दूध उद्योग अकार्यक्षमता आणि गैरव्यवहारांमुळे बदनाम झाला आहे. अनेक ठिकाणी कमी गुणवत्तेचे दूध स्वीकारणे, भेसळ करणे, शेतकऱ्यांना कमी दर देणे, डीलर कमिशन भरपूर ठेवणे या प्रकारांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मूल्यवर्धित उत्पादनांच्या क्षेत्रात उतरण्याची कल्पकता आणि पायाभूत सुविधांची उभारणी यामध्ये राज्यातील सहकारी दूध चळवळ कमी पडली. ‘अमूल’प्रमाणे राज्याचा एकच ब्रॅंड नसणे, मोडकळीस आलेला महानंद, दूध खरेदी दरात तफावत, केवळ पिशवीबंद दूध विकण्यावर भर, दूध संघांतील अंतर्गत स्पर्धा व लाथाळ्या यामुळे महाराष्ट्रातील दूध उद्योगाला घरघर लागली आहे.  दुधाच्या क्षेत्रात स्पर्धेचे वातावरण निर्माण झाल्यास शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांचा फायदा होणार आहे; परंतु विषम स्पर्धेमुळे सहकारी दूध चळवळ संपुष्टात आली, तर परराज्यांतील दूध संघांची मक्तेदारी निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा मक्तेदारीमुळे दीर्घकालीन विचार करता शेतकऱ्यांची नाडवणूक होण्याचा धोका आहे; तसेच त्याचे ग्रामीण महाराष्ट्रावर गंभीर आर्थिक व सामाजिक परिणाम होतील. त्यामुळे राज्यातील दूध संघांनी या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी एकजूट दाखवावी आणि राज्य सरकारने त्यांना भक्कम पाठबळ द्यावे, अशी भावना या क्षेत्रातील घटकांनी व्यक्त केली.

परराज्यांतील दूध संघांनी आक्रमक शिरकाव केल्यामुळे महाराष्ट्रातील सहकारी व खासगी दूध उद्योगापुढे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. राज्यातील जवळपास ५० टक्के दूध व्यवसाय अमूल, नंदिनी, पंचमहाल, मदर डेअरी आदी परराज्यांतील संघांनी ताब्यात घेतला आहे.

राज्याचा एकच ब्रॅंड नसणे, मोडकळीस आलेला महानंद, दूध खरेदी दरात तफावत, केवळ पिशवीबंद दूध विकण्यावर भर, दूध संघांतील अंतर्गत स्पर्धा व लाथाळ्या यामुळे महाराष्ट्रातील दूध उद्योगाला घरघर लागली आहे. मूल्यवर्धित उत्पादनांच्या क्षेत्रात उतरण्याची कल्पकता आणि पायाभूत सुविधांची उभारणी यामध्ये राज्यातील सहकारी दूध चळवळ कमी पडली. तसेच दूध संघ व्यावसायिक पध्दतीने न चालवता राजकारणाचा आखाडा झाल्यामुळे दूध चऴवळीला उतरती कळा लागली.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दूध चळवळ दुबळी होऊन परराज्यातील दूध संघांची मक्तेदारी निर्माण झाल्यास शेतकऱ्यांची नाडवणूक होण्याचा धोका आहे. तसेच त्याचे ग्रामीण महाराष्ट्रावर गंभीर आर्थिक व सामाजिक परिणाम होतील. त्यामुळे राज्यातील दूध संघांनी या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी एकजूट दाखवावी आणि राज्य सरकारने त्यांना भक्कम पाठबळ द्यावे, अशी भावना या क्षेत्रातील घटकांनी व्यक्त केली.

राज्यांचे पाठबळ

  • अमूल, नंदिनी, तिरूमला, पंचमहाल, मदर डेअरी आदी संघांनी उभे केले मोठे आव्हान.
  • गुजरात सरकारचे अमूल, पंचमहाल या संघांना भक्कम पाठबळ.
  • महाराष्ट्रात पंचमहाल संघाला दुग्धशाळा उभारणीसाठी अनुदान देण्यासाठी केंद्र सरकारचा दबाव.
  • कर्नाटक सरकारचे नंदिनी संघाला भक्कम साथ.
  • परराज्यातील संघांना त्यांच्या राज्य सरकारांकडून अनुदान, पॅकेजच्या माध्यमातून भरीव अर्थसाहाय्य.
  • महाराष्ट्रात महानंदकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष.
  • अमूलचे वर्चस्व

  • अमूलने २०१३ मध्ये ठाणे जिल्ह्यातील विक्रमगड भागात फक्त १६ शेतकऱ्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रात दूध व्यवसायाला सुरूवात केली.
  • आजमितीला अमूलकडून महाराष्ट्रात दररोज १८ लाख लिटर दूध संकलन.
  • अमूलकडून महाराष्ट्रातील दूध उत्पादकांच्या खात्यात वर्षाकाठी अंदाजे १८०० कोटी रूपयांचे पेमेंट जमा.
  • अमुलची राज्यात ९०० दूध संकलन केंद्रे.
  • कोकणात अमूलने पाय रोवले. मुंबई, प. महाराष्ट्रातही मोठी मजल.
  • संकलित दूध पिशवीबंद करून विकण्यासाठी मुंबईत सहा तर पुणे, औरंगाबाद व नागपूरला प्रत्येकी एक असे ९ प्रकल्प.
  • दुधाच्या खरेदीबरोबरच शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांचे प्रजोत्पादन, संगोपन यासाठी अमूलकडून प्रशिक्षण. पशुखाद्याचा पुरवठा.
  • १ ते १० तारखेपर्यंत संकलित केलेल्या दुधाचे पेमेंट १३ ते १५ तारखेला होते. ११ ते २० तारखेच्या संकलनाचे पेमेंट २३ ते २५ तारखेला. २१ ते ३० तारखेच्या संकलनाचे पेमेंट ३ ते ५ तारखेला. पेमेंट थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात.
  • अमूलकडून सध्या गाय दुधाला प्रति लिटर २५ रुपये ५० पैसे दर. (खासगी संघांकडून १८ ते २० रुपये दर.)
  • अमूलकडून म्हैस दुधाला प्रति लिटर ३९ रुपये ३७ पैसे दर. (खासगी संघांकडून ३६ रुपये दर.)
  • नंदिनीची वाटचाल

  • कर्नाटकने १४ जिल्हास्तरीय दूध संघांचा नंदिनी महासंघ तयार केला.
  • दररोज २४ लाख दुध उत्पादक शेतकऱ्यांकडून ७६ लाख लिटर दुध संकलन.
  • दोन हजार कोटींचे भांडवल उभारण्यास मान्यता. आठशे कोटींचे कर्ज काढण्याची तयारी सुरू.
  • मुंबईत ८५ हजार लिटर दूध विक्री. प्लॅन्ट उभारणीनंतर विक्री आणखी वाढणार.
  • परराज्यातील डेअरींचा विस्तार कशामुळे?

  • स्थानिक पिशवीबंद दुधाची गुणवत्ता चांगली नसल्याचा अपप्रचार
  • स्थानिक डेअरीचालकांमधील स्पर्धा
  • दूध भुकटी प्रकल्प व पिशवीबंद दूध निर्मिती प्रकल्प यांच्यात समन्वयाचा अभाव
  • परराज्यातील डेअरींकडून मोठया प्रमाणात जाहिरातबाजी व प्रसिध्दी तंत्राचा वापर
  •  बहुतांश सहकारी दुध संघांचा अवाजवी पसारा, अनावश्यक नोकरभरती, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात हयगय, भ्रष्ट व अकार्यक्षम कारभार यामुळे स्पर्धाक्षमता कमी.
  • कमी गुणवत्तेचे दूध स्वीकारणे, भेसळ करणे, शेतकऱ्यांना कमी दर देणे, डीलर कमिशन भरपूर ठेवणे या प्रकारांमुळे स्थानिक दूध संघांचा व्यवसाय प्रभावित.
  • अमुलच्या तुलनेत राज्यातील सहकारी दुधसंघांतील व्यवस्थापन, प्रक्रिया व मार्केटिंग खर्च खूप अधिक.
  • अमूलची ताकद

  • देशातील सर्वात मोठा सहकारी दूध संघ अशी अमूलची ओळख.
  • २०२१ पर्यंत एकूण उलाढाल ५० हजार कोटींवर नेण्याचे अमूलचे उद्दीष्ट.
  • २०१९ मध्ये अमूलची उलाढाल ३३ हजार १५० कोटी रूपये.
  • अमूलकडून दररोज देशभरातून २ कोटी ३० लाख लिटर दूध संकलन.
  • त्यातील सुमारे ३० लाख लिटर दुधाची गुजरातच्या बाहेरून खरेदी.
  • निर्यात वाढवण्यावरही अमूलचा भर. निर्यातीचे मूल्य एक हजार कोटी रूपयांच्या घरात.
  • ब्रिटानिया इंडस्ट्रीही महाराष्ट्रात

  • ब्रिटानिया इंडस्ट्री दोन ते तीन वर्षांत डेअरी उद्योगातील उलाढाल दुप्पट करण्याच्या विचारात.
  • महाराष्ट्रातून दररोज चार ते पाच लाख लिट दूध संकलित करण्याचे नियोजन.
  • मूल्यवर्धित दूध उत्पादनांवर अधिक लक्ष केंद्रीत करणार.
  • एकूण १० हजार कोटी रूपयांचे मूल्य असलेल्या ब्रिटानिया कंपनीसाठी डेअरी व्हर्टिकल नफ्यात आहे.
  • देशातील दुध उत्पादनाचे चित्र

  • भारत दुध उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर.
  • दुधाळ जनावराची उत्पादकता मात्र खूपच कमी.
  • भारतात उत्पादकता वार्षिक १८०६ किलोग्रॅम.
  • जागतिक स्तरावर उत्पादकता २३१० किलोग्रॅम आहे.
  • देशात दूध उत्पादनात गुंतलेल्या ग्रामीण कुटुंबाची संख्या सुमारे आठ कोटी.
  • भूमिहीन, लहान आणि सीमांत शेतकऱ्यांची संख्या मोठी.
  • मक्तेदारीचा धोका

  • सहकारी दूध चळवळ उध्वस्त झाल्यास परराज्यांतील संघांची मक्तेदारी निर्माण होण्याचा धोका.
  • मक्तेदारीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण होण्याची भीती.
  • दूध चळवळ निष्प्रभ झाल्यास शेतकऱ्याचा जोडधंद्याचा आधार हिसकावला जाऊन आत्महत्यांचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता.
  • हे टाळण्यासाठी सरकारचा निर्णायक हस्तक्षेप हवा.
  • राज्यातील दूध संकलन

  • राज्यात ६० टक्के दुध संकलन खासगी संघामार्फत.
  • ३९ टक्के दुध संकलन सहकारी संघांमार्फत.
  • १ टक्के दुध संकलन शासकीय संघाकडून.
  • राज्यातील दुग्ध व्यवसाय दृष्टीक्षेपात

  • सहकारी क्षेत्रात ३० हजार ७१४ प्राथमिक संस्था, ७१ तालुका संस्था आणि २९ जिल्हा संघ.
  • संघटित क्षेत्रातील दूध संकलन - १ कोटी ३० लाख लिटर
  • असंघटित क्षेत्रातील दूध संकलन - ३० लाख लिटर
  • परराज्यातून येणारे दूध – ४० लाख लिटर
  • दूध उद्योगाची उलाढालः प्रतिदिन सुमारे १०० कोटी रूपये.
  • द्रवरूपातील (लिक्विड) दुधावर अवलंबित्व

  • परदेशात द्रव स्वरूपातील दूध केवळ १०-१५ टक्के विकले जाते. तेथे प्रक्रियायुक्त पदार्थांचीच बाजारपेठ मोठी.
  • भारतात मात्र पिशवीबंद दुधाचा बाजारपेठेतील वाटा ४५ टक्के.
  • देशात पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे २० टक्क्यांहून कमी दुधावर प्रक्रिया.
  • द्रव स्वरूपातील दुध आणि भुकटी यांना सगळ्यात कमी मार्जिन. पण बहुतांश सहकारी व खासगी दुध संघांचा त्यावरच भर.
  • देशात द्रव स्वरूपातील दुधविक्री किफायतशीर ठरणार नाही, परंतु मूल्यवर्धित उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता ही उत्पादने बनविणाऱ्या कंपन्या मात्र चांगली कामगिरी करतील, असा रेटिंग एजन्सी `क्रिसिल`चा अहवाल.
  • मूल्यवर्धित दुग्धजन्य उत्पादनांना डोळ्यासमोर ठेऊन देशातील डेअरी क्षेत्रात पुढील तीन वर्षांत १३० ते १४० अब्ज रूपयांची गुंतवणूक होण्याचा `क्रिसिल`चा अंदाज.
  • मूल्यवर्धनात अमूलची आघाडी

  • अमूल दोन वर्षांत ४० ते ६० नवीन मूल्यवर्धित उत्पादने बाजारात आणण्याच्या विचारात.
  • पेढा, नानकटाई, उंटाच्या दुधापासून बनवलेले चॉकलेट यासारख्या उत्पादनांचाही समावेश.
  • अमूलकडून गेल्या चार वर्षांत १०० उत्पादने बाजारात.
  • अमूलच्या एकूण उलाढालीमध्ये पिशवीबंद दुध विक्रीचा वाटा केवळ ५० टक्के.
  • एकाच ब्रॅंडची गरज

  • राज्यात `अमूल`च्या धर्तीवर सर्व सहकारी संघांचा दुधाचा एकच ब्रॅंड तयार करण्याची नितांत आवश्यकता.
  • एकच ब्रॅंड झाल्यास दुधाच्या मार्केटिंग, कमिशनवरचा वारेमाप खर्च कमी होईल, दुधाला मोठी बाजारपेठ मिळेल, मार्केटिंग चॅनेलचा विस्तार होईल आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल.
  • तसेच सहकारी दूध संघांच्या व्यवस्थापन खर्चात कपात, कार्यक्षम कारभार, व्यावसायिक दृष्टिकोनाचा अंगीकार आदी सुधारणा आवश्यक.
  • सहकारी दूध संघांतील अनिष्ट राजकीय स्पर्धेला लगाम घालण्यासाठी एका गावात एकच सोसायटी, तालुका किंवा जिल्हा स्तरावर एकच संघ आणि राज्य पातळीवर एक शिखर संस्था हे मॉडेल स्वीकारण्याची गरज.
  • परराज्यांतील दूध संघांचे आव्हान

  • राज्यात ‘अमूल’पाठोपाठ कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेशातील दूध संघांचा शिरकाव.
  • अमूल, नंदिनी, तिरुमला, पंचमहाल, मदर डेअरी आदी संघांनी उभे केले मोठे आव्हान.
  • महाराष्ट्रात दहा वर्षांपूर्वी स्थानिक ९० लाख लिटर दूध होते. त्यात पिशवीबंद दूध ६५ लाख लिटर; तर सुटे २५ लाख लिटर अशी विभागणी होती. 
  • आता पिशवीबंद दुधाचा किमान ५० टक्के वाटा परराज्यांतील दूध संघांच्या ताब्यात.
  • स्पर्धेत टिकण्यासाठी हे आवश्यक

  • ‘अमूल़’च्या धर्तीवर राज्यातील सर्व सहकारी दूध संघांचा एकच ब्रॅन्ड तयार करणे.  
  • महानंदला पूर्ण व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून स्वातंत्र्य देणे.
  • एमआरपी (कमाल किरकोळ किंमत) आणि डीलर रेट (वितरक दर) यांच्यातील तफावत कमी करणे.
  • शासनाच्या सल्लागार समितीने प्रभावी काम करण्याची आवश्यकता. 
  • खासगी व सहकारी दूध संघांतील अनिष्ट स्पर्धेला पायबंद. 
  • राज्यातील सर्व जिल्ह्यांचे खरेदी दर एकसमान ठेवणे.
  • व्यवस्थापन खर्चात कपात. 
  • दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेवर भर.
  • प्रतिक्रिया... भाजप सरकारने अमूलसह परराज्यातील दूध संघाना महाराष्ट्रात खरेदी-विक्री करण्याची परवानगी दिली. यातच महाराष्ट्रातील दुध संघामध्ये एकी नसल्याने प्रत्येकाचा ब्रॅंड, किंमती वेगवेगळ्या आहेत. दूध भुकटीचे दर कोसळले की खासगी संघ कमी दराने दूध खरेदी करतात. मात्र सहकारी दूध संघांना सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी दर देता येत नाही. सरकारकडे सहकारी संघांचे पैसे थकल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. अमुल, नंदिनी आदी परराज्यातील संघांनी सीमावर्ती भागात दूध खरेदी करून बाजारपेठ काबीज केली. महानंद डळमळीत झाला आहे. मूल्यवर्धीत उत्पादनांमध्ये चांगला नफा मिळतो. कात्रज डेअरी त्यामुळेच सुरळीत सुरू आहे. गुजरात प्रमाणे राज्यात सर्वांनी एकच ब्रॅंड केला पाहिजे. - गोपाळराव मस्के, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया उद्योग कल्याणकारी संघ अमूल असो की नंदिनी, त्यांच्या राज्य सरकारांनी वेळोवेळी केलेल्या मदतीमुळे ते स्वयंपूर्ण झाले आहेत.'महानंद'ला राज्य सरकारची अशी कोणतीही थेट मदत नाही. मुंबईत 'महानंद'चे वितरण १२ लाख लिटर वरून २ लाखांवर आले आहे. मधल्या काळात सरकारकडून दुर्लक्ष झाले. त्यामुळे संघ स्वतःच्या ताकदीवर काम करतोय. नवीन सरकारचा महासंघाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे. अडचणी व प्रश्न समजून घेतले आहेत. सरकारकडून काही सकारात्मक निर्णय झाले. मात्र कोरोनामुळे कामकाज विस्कळीत झाले. राज्य सरकारच्या मदतीने विक्रीव्यवस्था वाढवून तसेच नवीन योजना राबवून कामकाज भक्कम करण्यावर भर देणार आहोत. - रणजितसिंह देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित (महानंद) राज्याचा स्थानिक दूध व्यवसाय भक्कमपणे वाढत असून तो देशात दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे परराज्यातील डेअरींचे आक्रमण असल्याची हाकाटी पिटणे चुकीचे आहे. मुळात आपले डेअरीचालक हैद्राबादपासून अहमदाबाद, दिल्ली, जम्मूपर्यंत महाराष्ट्राचे दूध विकत आहेत. अमुल, नंदिनी हे ब्रॅंड त्यांच्या राज्यातील अनुदानामुळे स्पर्धा करतात हे खरे आहे. मात्र, परराज्यातील दूध प्रकल्प पैसे मात्र महाराष्ट्राच्याच शेतकऱ्यांना देत आहेत. सोनाई, चितळे, राजहंस, गोकुळ, पराग, प्रभात, डायनामिक्स, वारणा हे ब्रॅंड महाराष्ट्राचे असून चांगली घौडदौड करीत आहेत. बटर आणि दूध भुकटी निर्यातीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्राच्या क्षमतेला कमी लेखू नका. - दशरथ माने, अध्यक्ष, सोनाई डेअरी राजकारणामुळे दूध नासले... कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील अनेक संघांची दुध विक्री मोठ्या प्रमाणात घटली. गोकुळच्या एकूण विक्रीत तीस टक्‍के घट आली. राज्यातील इतर दुध संघांची अवस्था यापेक्षा फारशी वेगळी नाही. पण अमूल ने मात्र मुंबईत १५ टक्के विक्री वाढवली. देशभरात प्राबल्य असणाऱ्या अमूलने वितरकांवर दबाव टाकत त्यांना जादा विक्रीचे टार्गेट दिले. विक्री वाढली नाही तर वितरण बंद करण्याचा इशारा दिला. एकीकडे गोकुळ सारख्या सहकारी संघाचे दुध मुंबईत जाणे दुरापास्त झालेले असताना अमूलने आपली व्यावसायिक दृष्टीकोन दाखवला.         राज्यातील दुध संघ अमूल सारखा करिश्‍मा करु शकले नाहीत. गोकुळ सारख्या अग्रगण्य दुध संघालाही ते शक्‍य झाले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे सहकारातील राजकारण हेच आहे. ज्यावेळी अमूल राज्यात आला त्यावेळी राज्य सरकारने त्यांना सहज परवानगी दिली. आम्ही आरडाओरडा केला. पण खुले मार्केट आहे, त्यांना आम्ही रोखू शकत नाही असे सांगत आम्हाला दर्जा सुधारण्याचा सल्ला दिला. पण शासनकर्ते हे विसरले की अमूल हा देशातील एक क्रमांकाचा दुध संघ आहे. त्याला टक्कर कशी देणार? केवळ दुध संघाना दर्जा सुधारण्याचे सांगून शासन मोकळे झाले. परंतू उपाय कोण देणार, सवलती कोण देणार? अमूलने पद्धतशीरपणे मार्केटिंग करीत हातपाय पसरायला सुरवात केली. दुधाबरोबर आपले सुमारे शेकडो पदार्थ उतरविले. वर्गीस कुरियन यांनी अमूलला जो ढाचा घालून दिला; त्याचे तंतोतंत पालन होत आहे. दर्जा, कर्मचाऱ्यांबाबत कुठेच सैलसर पणा नसतो. आमच्याकडे नातेवाईक, कर्मचारी दोषी आढळले तर त्याला वाचवायचा प्रयत्न केला जातो. पण तिकडे मात्र हे सहन केले जात नाही. हा फार मोठा फरक अमूल आणि आपल्या दुध संघात आहे.           राज्यात दुध संस्था, जिल्हा संस्था आणि शिखर संस्था अशी त्रिस्तरीय रचना असतानाही एका माजी मुख्यमंत्र्यांनी गाववार दुध संस्था काढण्यास लोकांना प्रवृत्त केले. या संस्था केवळ राजकारणासाठी काढल्या गेल्या. एकेका गावात चार पाच दुध संस्था असणे याला काही अर्थ नाही. एकेका दुध संस्थेचे२५-३० लिटर दूध संकलनही होत नाहीत. अशा अनेक अहितकारक निर्णयांचे परिणाम सहकारी दुध संघ भोगत आहेत. राज्यकर्त्यांनी या व्यवसायात लक्ष घातले ते राजकारणासाठी. व्यवसायिक वृत्ती जोपासण्याऐवजी इतर गोष्टींना थारा दिला गेला.        अमूलप्रमाणे महाराष्ट्रातही एकाच ब्रॅंडने दूध विकण्याबाबत चर्चा झाली. पण कुठेच एकवाक्‍यता नसल्याने हा प्रयत्नही यशस्वी झाला नाही. प्रभावी माकेटिंग व्यवस्था, नियोजनबद्ध प्रयत्न याच बाबी दुध संघांना परराज्यातील दुध संघाशी टक्कर देण्यासाठी महत्वाच्या ठरु शकतात. त्यासाठी शासनाचे माठे पाठबळ हवे. - अरुण नरके,  माजी अध्यक्ष इंडियन डेअरी असोसिएशन महाराष्ट्रातील जवळपास ५० टक्के दुग्धव्यवसाय परराज्यांतील डेअरी प्रकल्पांनी ताब्यात घेतला आहे. त्यामुळे आता स्थानिक सहकारी व खासगी दूध संघांनी गाफिल न राहता एकत्र येऊन संकटाचा सामना करावा लागेल; अन्यथा आपल्याला येत्या दहा वर्षांत गाशा गुंडाळावा लागेल. - प्रकाश कुतवळ,  सचिव, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ लॉकडाऊन असतानाही गुजरातमधील अमूल, पंचमहल २३ रुपये लिटर दराने दूध खरेदी करत आहेत. मात्र राज्यातील संघ कमी दर देत आहेत. गुजरातमधील संघांनी संकलनासाठी विस्तार करून दूध उत्पादकांना विश्वासात घेतले. मात्र राज्यातील दूध संघाची ही पध्दत नाही. सध्या राज्यात चार हप्ते पेमेंट उशिराने मिळतंय. त्यामुळे चारा, पशुखाद्य हा संगोपन आणि इतर खर्च आमच्या आवाक्याबाहेर गेलाय. सरकारचे पूर्ण दुर्लक्ष आहे. हे असंच चालू राहिलं तर बाहेरच्या राज्यांतल्या संघांचं जाळं वाढत जाईल. - कमलाकर दाभाडे, दूध उत्पादक,बोकटे,ता.येवला,जि.नाशिक. 

    आज इतर राज्यांतील, जिल्ह्यांतील डेअरी मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत. या डेअरींनी गावपातळीवर पाय रोवले आहेत. गावोगावी संकलन केंद्र सरू करण्यात आले. आपल्याकडे दूध संघ पूर्वीपासून कार्यरत असताना ही यंत्रणा मात्र वर्षानुवर्षे ढासळत गेली. अजूनही संधी आहे. जागेवरच दूधसंकलन, तपासणी करून उत्पादकाला वेळेत चुकारे मिळाले तर परिस्थिती सुधारू शकते. - मोहन देशमुख,  दूध उत्पादक,  पिंपळखुटा, ता. पातूर, जि. अकोला  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com