दूध उत्पादकांना रोज १४ कोटींचा फटका 

लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत दूध संघांनी गेल्या सव्वा महिन्यापासून गाईच्या दुधाचे दर कमी केले. प्रति लिटर १० ते १२ रुपये दर कमी केल्याने राज्यातील दूध उत्पादकांना रोज १४ कोटी रुपयांपेक्षा अधिक फटका बसत आहेत.
milk
milk

नगर ः लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत दूध संघांनी गेल्या सव्वा महिन्यापासून गाईच्या दुधाचे दर कमी केले. प्रति लिटर १० ते १२ रुपये दर कमी केल्याने राज्यातील दूध उत्पादकांना रोज १४ कोटी रुपयांपेक्षा अधिक फटका बसत आहेत. दर कमी केल्यापासून आतापर्यंत साडेचारशे कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात पशुखाद्याच्या दरवाढीने नुकसानीत भर टाकली. त्यामुळे नफा तर सोडाच लिटरमागे पाच ते सहा रुपये तोटा होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

कोरोनामुळे राज्यात लॉकडाउन झाल्यानंतर दुधाला मागणी नसल्याचे सांगत अगदी पहिल्या आठ दिवसांतच गाईच्या दुधाचे दर आठ ते दहा रुपयांनी खाली आणले. साधारण दीड महिन्यापूर्वी ३१ ते ३२ रुपये प्रतिलिटर दर मिळत होता. सध्या २० ते २१ रुपये दर मिळत आहे. राज्यात संकलित होणाऱ्या १ कोटी ४० लाख लिटर दुधापैकी ७० ते ८० लाख लिटर दूध पिशवीतून विक्री होते. दहा ते पंधरा लाख लिटर दुधाचे उपपदार्थ होतात तर उर्वरित दुधाची भुकटी होते. 

दर पडूनही गेल्या दीड महिन्यात सरकारी पातळीवर दूध उत्पादकांचा अजिबात विचार झाला नाही. आता शेतकरी नेत्यांनी आंदोलन करण्याची तयारी सुरू केल्याचे दिसल्याने अतिरिक्त दूध खेरदी करणार असल्याचे सांगितले जाऊ लागले. मात्र दुधाचे दर पाडल्यामुळे सध्या राज्यातील दूध उत्पादकांना दररोज १४ कोटींपेक्षा अधिक फटका सोसावा लागत आहे. आतापर्यंत साडेचारशे कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.  पशुखाद्य दरवाढीने खर्चात वाढ  सध्या २० ते २१ रुपये दर मिळत आहे. चारा, पाणी, मजुरी, औषधी आणि त्यासाठी लागणाऱ्या कष्टाचा विचार केला तर २६ ते २७ रुपये खर्च येतो. म्हणजेच लिटरमागे तब्बल ६ रुपयांचा फटका बसत आहे. त्यातच गेल्या एक महिन्यापासून पशुखाद्याचे दर ३० टक्क्यांनी वाढल्याने उत्पादन खर्चात दोन रुपयांची आणखी भर पडली. म्हणजेच लिटरमागे एकूण आठ रुपये शेतकऱ्यांना तोटा होत आहे.  प्रतिक्रिया मजुरी, औषध, चारा व अन्य बाबी धरल्या तर साधारण २७ ते २८ रुपये प्रति लिटरला खर्च येतो. सध्या दुधाची विक्री तोट्यातच आहे. गेल्या दोन वर्षांपासून या व्यवसायावर संकट आहे. हे थांबण्यासाठी सरकारने कठोर कायदा केला पाहिजे आणि दुधाला किमान हमी दर द्यावा.  - नंदकुमार रोकडे, दूध उत्पादक, खडकी, जि. नगर 

दुधाला मागणी नाही, असे सांगून दर पाडण्यासाठी खासगी दूध संघ संधी साधत आहेत. गेल्या दीड महिन्यापासून दर कमी केल्याने दूध उत्पादकांना कोट्यवधींचा फटका बसला. शेतकऱ्यांकडून कमी दरात घेता आणि ग्राहकांना मात्र पूर्वीच्या दरात विकता, ही लूट थांबली पाहिजे. यासाठी आम्ही संघर्ष उभा करत आहोत.  - डॉ. अजित नवले, नेते, किसान सभा, महाराष्ट्र 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com