सरकी ढेपेचे दर कडाडल्याने दूध उत्पादक अडचणीत

सरकी, सरकी ढेप तसेच सुग्रासच्या दरात सतत होत असलेल्या दरवाढीमुळे दूध उत्पादकांना प्रचंड झळ पोचत आहे. साधारणतः दीड महिन्यात हे दर दुप्पट-तिप्पट बनले आहेत. अशा स्थितीत जनावरांना पौष्टिक खाद्य देणे सामान्य दूध उत्पादकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. याचा परिणाम दूध उत्पादनावर होण्याची चिन्हे वाढली आहेत. - अमोल खर्चे, दूध उत्पादक, आडविहीर, जि. बुलडाणा
सरकी ढेप
सरकी ढेप

अकोला : दुधाळ जनावरांना पोषक खाद्य म्हणून खाऊ घातली जाणारी सरकी ढेप आता दूध उत्पादकांच्या आवाक्याबाहेर पोचू लागली आहे. गेल्या काही दिवसांत सरकी ढेपीचे भाव अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. सरकी ढेप ४१०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल विकल्या जात आहे. ढेपेची साठेबाजी केल्याने ही दरवाढ झाल्याची चर्चा आहे. पशुखाद्याच्या दरातही १०० ते १५० रुपयांची वाढ झाल्याने दूध उत्पादकांचे नियोजनच कोलमडत आहे.   सरकीपासून तयार केल्या जाणाऱ्या ढेपीचे दर मागीलवर्षात २२०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान होते. आता हाच दर ४००० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचला आहे. दुधाळ जनावरांसाठी आवश्यक मानले जाणारे हे सरकी ढेपीचे पोषक खाद्य कडाडल्याने दुधाचा व्यवसाय करणारे सर्वसामान्य पशुपालक आर्थिक डबघाईस आले आहेत. दुधाचा व्यवसाय करणे परवडणारे राहिलेले नाही.  वऱ्हाडात बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने खामगाव, मलकापूर तसेच अकोला शहरांमध्ये असलेल्या ऑईल मिलमधून सरकीपासून तेल काढल्यानंतर ढेप तयार होते. ही ढेप सर्वत्र विक्रीला जाते. गेल्या काही वर्षांपासून कापसाच्या उत्पादनात घट झाल्याने ऑईल कंपन्यांना पुरेशा प्रमाणात सरकी मिळणे दुरापास्त झाले. त्याचा थेट परिणाम ढेपेच्या दरवाढीवर झाल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे काही विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात साठेबाजीसुद्धा केली आहे. यामुळे सरकी ढेपीचे दर झपाट्याने वाढले आहेत. साध्या सरकीचा दर १४०० वरून थेट ४१०० झाल्याचे दूध विक्रेत्यांनी सांगितले. या वाढलेल्या दरांच्या तुलनेत दुधाचे दर मात्र होते तेवढेच कायम आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com