दूध व्यवसाय झाला आतबट्ट्याचा; शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत

खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाई आणि म्हशीच्या दरात १० ते १५ रुपयांची कपात केली आहे. त्यातच पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने दूध उत्पादकांना पदरमोड करून खर्च भागवावा लागत आहे.
milk collection
milk collection

पुणेः मागील काही वर्षांपासून संकटात असलेल्या दूध व्यवसाय लॉकडाउमुळे कोलमडण्याची वेळ आली आहे. लग्ने, समारंभ, सामाजिक कार्यक्रम, उत्सव, हॉटेल्स, मॉल्स, स्वीटमार्ट बंद असल्याने मागणी घटल्याचे कारण देऊन खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाई आणि म्हशीच्या दरात १० ते १५ रुपयांची कपात केली आहे. त्यातच पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने दूध उत्पादकांना पदरमोड करून खर्च भागवावा लागत आहे.    

शेतीला जोड धंदा म्हणून राज्यातील बहुतांश शेतकरी दूध व्यवसाय करतात. अनेक शेतकरी, सुशिक्षित तरुणांनी कर्ज काढून आधुनिक पद्धतीने व्यवसाय सुरु केला. अनेक शेतकऱ्यांना या व्यवसायाने उभारी मिळाली. मात्र, अलीकडच्या काही वर्षांपासून दूध व्यवसायामागील शुक्लकाष्ठ संपता संपेना. त्यातच कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउमुळे हा व्यवसाय डबघाईला आला. लॉकडाउनमुळे, लग्ने, समारंभ, सामाजिक कार्यक्रम, उत्सव, हॉटेल्स, मॉल्स, स्वीटमार्ट बंद असल्याने दुधाला मागणी घटल्याचे कारण पुढे करून सहकारी तसेच खासगी दूध संघांनी दरात मोठी कपात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अधिच संकटात असलेल्या दूध उत्पादकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. 

दूध संघांनी दुधाचे दर कमी केले असतानाच बाजारात मात्र पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कडब्याचे दरही वाढले आहेत. सरकी पेंडीचे दर प्रतिक्विंटल २ हजार ३०० रुपयांवरून २ हजार ६०० रुपये पर्यंत वाढले. कडब्याचे दर अडीच ते तीन हजार रुपये शेकड्यापर्यंत पोचले आहेत. त्यामुळे एकीकडे पडलेले दर आणि दुसरीकडे पशुखाद्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे दूध व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी आता हा व्यवसाय बंद करत आहेत. 

सोलापूर जिल्ह्यात पूर्वी गाईच्या दुधाचा ३० ते ३२ रुपयांपर्यंत असणारा दर आता १८ ते २० रुपयांवर खाली आला आहे. तर, म्हशीच्या दुधासाठी ३२ रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनपूर्वी दूध संघातर्फे म्हशीच्या दुधाला फॅटनुसार कमाल ५० रुपये प्रतिलीटरपर्यंत दर मिळत होता. तर गायीच्या दुधालाही ३० रुपयांपर्यंतचा दर मिळत होता. आता म्हशीच्या दुधाला कमाल ४५ रुपये प्रतिलीटरचा दर मिळत आहे. तर गायीच्या दुधाला २७ रुपये प्रतिलीटरचा दर मिळत आहे. खासगी डेअऱ्या तर गायीचे दूध २० ते २१ रुपये आणि म्हशीचे दूधही ३८ ते ४० रुपये प्रतिलीटर या दरात घेत आहेत. 

अकोला जिल्हा दूध संघाकडून गायीच्या दुधाला ३.५ साठी २५ रुपये तर म्हशीच्या ६.० साठी ३४ रुपये दर दिला जातो. बुलाडाणा जिल्ह्यात दूध उत्पादकांची संपूर्ण मदार ही खासगी डेअरींवरच आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत गाईच्या दुधाला २२ ते ३४ रुपये आणि म्हशीच्या दुधाला २५ रुपयांपर्यंत दर दिला जात आहे. मराठवाड्यात गायीच्या दुधाला प्रतिलीटर १५ ते २३ रुपये पर्यंतचे दर मिळत असल्याची माहिती दूध उत्पादकांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या म्हशीच्या दुधाला सरासरी ४० ते ४२, तर गायीच्या दुधाला २५ रूपये दर दिला जातो. 

पुणे जिल्ह्यात पूर्वी गाईच्या दुधाचा २८ ते ३० रूपये असणार दर आता १८ ते २० रुपयांपर्यंत आला आहे. तर म्हशीच्या दुधाचे दरही ३० ते ३५ रुपयांवरून कमी झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात म्हशीच्या दुधाला ६ ते ६.५ च्या फॅटसाठी साधारणत: प्रति लिटर चाळीस ते एकेचाळीस रुपये दर मिळतो. गायीच्या दुधाला ३.० फॅटला २५.५० रुपये दर दिला जात आहे. नाशिक जिल्ह्यातही दुधाच्या दरात घट झाल्याने उत्पादक चिंतेत आले आहेत. नगर जिल्ह्यात खासगी दूध संघ सध्या प्रती लिटर दुधाला सरासरी १५ ते १८ रुपये देत आहे. सांगली जिल्ह्यात गाईच्या दुधाला १९ ते २५ रुपये रुपये दर मिळतो आहे. म्हशीच्या दुधाला ३७ रुपये असा दर मिळतो आहे. परभणीत गायीच्या दुधाचे दर प्रतिलिटर २५ ते २७ रुपये, तर म्हशीच्या दुधाचे दर ३४ रुपये आहेत. खासगी डेअरीकडून गायीच्या दुधाला प्रतिलिटर २१ रुपये मिळत आहेत. त्यातच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आठमुठ्या भूमिकेमुळे चांगल्या प्रतीचे दूध देखील नाकारले जात आहे.  प्रतिक्रिया दर दिवशी शेकडो लिटर दूध घालतो. पण, दर १६ ते १९ रुपये प्रति लिटर पेक्षा जास्त मिळत नाहीत. पशुखाद्याचे दर आणि दुधाला मिळणारे दर याचा ताळमेळ बसेना. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आहे.  - गणेश जगदाळे, दूध उत्पादक, महाजनवाडी, जि. बीड 

अकोला येथील संघाचा प्लँट बंद पडल्याने येथील संकलित दूध अमरावतीला नेले जाते. स्थानिक दूध पुरेशा प्रमाणात आले तर संघाकडून स्वीकारले जाते. सोमवारी (ता. १३) सकाळी मी दूध घेऊन गेलो. परंतु इतरांचे दूध न आल्याने मला परत न्यावे लागले. जर दूध आले तर आपणास संपर्क साधून दूध आणण्याबाबत सांगितले जाईल, असे कळविण्यात आले.  - मोहन देशमुख, दूध उत्पादक, पिंपळखुटा, ता. पातूर जि. अकोला  पशुखाद्याचे दर पुढीलप्रमाणे (५० किलो/रुपये) 

सरकी पेंड २६०० 
पशुखाद्य १३५० 
कांडी पेंड १२५०
सुग्रास पोते १४०० 
खापरी पेंड २४०० 
मका भरडा ९०० 
ओला चारा (प्रतिकिलो) ३ ते ४ 
वाळलेला चारा (प्रतिकिलो) ७ 

मजुरीही निघत नाही २० म्हशी व २५ गायींच्या गोठ्यासाठी मजुरी आणि इतर सर्व खर्चासह महिन्याकाठी एक लाखांपर्यंत खर्च येतो. तर त्यात एकूण उत्पादन एक लाख १० हजारांपर्यंत आहे. म्हणजेच लाखभर रुपयाच्या खर्चातून १० हजार रुपये एवढा तुटपुंजा नफा मिळत आहे. तर, एका गाईचा एका दिवसासाठी दोन्ही वेळेचा ओला, सुका चारा आणि पशुखाद्याचा खर्च किमान १०० ते १५० रुपये इतका होतो. त्यात गाईचे दिव लिटर दूध गृहीत धरले, तर १८ रुपये प्रतिलीटरचा दर विचारात घेता १८० रुपये मिळतात.  त्यात गोठामालक, पशुधनपालकांची मजुरीही मिळत नसल्याची स्थिती आहे.

दूध व्यवसायातील अडचणी

  • राज्यात गाईच्या दुधाला १५ ते २७ रुपये दर
  • म्हशीच्या दुधाला १८ ते ३७ रुपये दर
  • दुधाच्या पेमेंटलाही अनेक ठिकाणी उशीर
  • विदर्भ, मराठवाड्यात खासगी दूध संघांचे खरेदीत वर्चस्व
  • पश्‍चिम महाराष्ट्रात दूध दरात अधिक घट
  • पशुखाद्याच्या दरातील वाढीमुळे तोटा वाढला
  • अनेक शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय बंद केला
  • शासकीय दूध खरेदीत ठिकठिकाणी अधिकाऱ्यांचा आडमुठेपणा साचे सरासरी दहा प्रतिक्रिया... माझ्याकडे ७० गाई आहेत. त्यातील २५ दुधाच्या आहेत. रोज २०० लिटर दूध संकलन होते. एवढ्या जनावरांचे संगोपन करणे खरोखरच जिकिरीचे झाले आहे. दुधाला मागणीच नसल्याने दर मिळत नसल्याचे सांगितले जाते. पूर्वीचा धंदा आहे. लगेच मोडणे शक्य नाही, म्हणून करतो आहोत. करणार काय?  - पद्माकर भोसले, दूध उत्पादक, पापरी, ता.मोहोळ, जि. सोलापूर   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com