दूध खरेदीदर २८ रुपये

दूध दर
दूध दर

पुणे : राज्यातील खासगी व  सहकारी दूध संघांनी दुधाच्या खरेदी दरात वाढ केली असून, प्रतिलिटर २८ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या शनिवारी (ता. ३१) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कात्रज, चितळे, सोनई, पराग, प्रभात, स्वराज, रियल, उर्जा, नेचर डिलाईट, एस. आर. थोरात, राजहंस, शिवामृत, नंदन तसेच राज्यातील इतर नामांकित खासगी व सहकारी दूध संघांचे ६० प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. दुधाचे खरेदी दरपत्रक यापुढे संघटना तयार करेल. त्यावर सचिवांची स्वाक्षरी असेल. त्यात बदल करण्याचा अधिकार नसेल, असे संघाचे मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी वार्ताहरांना सांगितले. “दुष्काळ आणि महापूर अशा दुहेरी संकटाचा सामना राज्याच्या विविध भागातील पशुपालक शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक सप्टेंबरपासून सरसकट प्रतिलिटर २८ रुपये दर ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी दिला जाईल. शेतकऱ्यांचे दर वाढवून देताना आम्ही ग्राहकांवर कोणताही बोजा न टाकण्याचे ठरविले आहे. दुधाच्या कमाल किरकोळ विक्री (एमआरपी) कोणतीही वाढ केली जाणार नाही,” असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना यापूर्वी शासनाच्या अनुदानासह प्रतिलिटर २५ रुपये दिले जात होते. शासनाचे अनुदान बंद झाल्यामुळे दूध संघ अडचणीत आलेले आहेत. “शासनाचे अनुदान नसले तरी राज्यातील खासगी व सहकारी दूध डेअरीचालक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २८ रुपये दर देतील. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांचा कालावधी विचारात घेता डेअरी उद्योगाने शेतकऱ्यांच्या दरात एकूण प्रतिलिटर आठ रुपयांची वाढ केलेली आहे. शासनाने डेअरीचालकांना कबूल केलेले अनुदान अद्यापही दिलेले नाही. त्याचा पाठपुरावा चालू आहे, असे श्री. कुतवळ यांनी स्पष्ट केले.  डीलरचे मार्जिन कमी करणार बैठकीत दूध संघांच्या झालेल्या चर्चेत खरेदीदरात वारंवार होणारे बदल शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम करतात, असा मुद्दा मांडला गेला. त्यामुळे आता सर्वानुमते निश्चित केलेला २८ रुपये दर बदलू नये. बाहेरील राज्यातून येणारे दूध तसेच इतर राज्यात जाणारे दूध विचारात घेऊन खरेदी दर निश्चित केला गेला आहे. खरेदीदरावर सर्व डेअरीचालकांनी ठाम राहावे, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले. दुधाची एमआरपी ते डीलर रेट यात मोठी तफावत आहे. ग्राहकांवर बोजा न टाकता डीलरचे ‘मार्जिन’ कमी करून ही तफावत दूर करण्याचे डेअरी चालकांनी ठरविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com