रेशनिंग दुकानांतही मिळणार दूध, बियाणे, भाजीपाला

vegetable
vegetable

कऱ्हाड, जि. सातारा (प्रतिनिधी) ः रेशनिंग दुकानदारांचे उत्पन्न वाढावे आणि लोकांनाही एकाच ठिकाणी विविध प्रकारचे साहित्य मिळावे यासाठी परवानाधारक रेशनिंग दुकानात आता किराणा माल, स्टेशनरी साहित्य, बी-बियाणे, दूध, दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला, खादी ग्रामोद्योगमार्फत तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तूंसह अन्य साहित्य ठेवण्यास शासनाने परवानगी दिली आहे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे रेशनिंग दुकानदारांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. यामुळे त्यांना जादा उत्पन्न आणि लाभार्थ्यांना एका ठिकाणी अनेक वस्तू मिळणार आहेत. शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना शासकीय धान्य अल्प दरात देण्यासाठी शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत काही दुकानदारांना परवाने देण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फत शासकीय दरात संबंधित लाभार्थींना गहू, तांदूळ, साखर, डाळी, तेल हे साहित्य वर्षानुवर्षे दिले जात आहे. त्याचे कमीशन संबंधित दुकानदारांना मिळते. तेही अत्यल्प असते. त्यातच अनेकदा पोती फाटकी असतात, काही वेळा पोती उचलताना, टाकताना धान्य सांडून वजनात घट येते. त्याचबरोबर संबंधित माल वाहतुकीचाही खर्च त्यांनाच करावा लागतो, यासह अन्य कारणांमुळे दुकानदारांना काहीवेळा पदरमोडही करावी लागते. त्यातच संबंधित मालाच्या विक्रीपोटी मिळणारे कमिशनही कमी असल्याने दिवसभर बसूनही त्यांना संबंधित व्यवसाय परवडत नाही.  मध्यंतरी सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने परवाने परत घ्यावे, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेऊन शासनाने दुकानदारांचे उत्पन्न वाढावे आणि शासकीय धान्याबरोबरच त्यांना इतरही माल विकता यावा यासाठी महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुकानदारांसाठी दिलासादायक असलेल्या य निर्णयामुळे संबंधित परवानाधारक दुकान आता विविध प्रकारचे साहित्य मिळण्याचे केंद्र होणार आहे. ग्रामीण भागातील लाभार्थींची मोठी अडचण त्यामुळे दूर होणार आहे.  रेशनिंग दुकानात मिळणार हे साहित्य  शासनाने परवानाधारक रेशनिंग दुकानदारांना शासकीय धान्याबरोबरच मध्य प्रदेश सिहोर, गुजरात सिहोर, खांडवा आणि लोकवन या चार प्रकारचे गहू, तांदळाच्या बासमती तुकडा, मोगरा, कोलम, गुजरात मसुरी, आंध्र प्रदेश कोलम, उकडा, आंबेमोहर आदी ११ प्रकारचे तांदूळ, खाद्यतेल, पामतेल, कडधान्ये, डाळी, गुळ, शेंगदाणे, रवा, मैदा, चनापीठ, भाजीपाला, शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली प्रमाणीत केलेली बियाणे, आरे व महानंद दूध संस्थांचे दूध व दुग्ध उत्पादने, महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाच्या उत्पादने, खादी ग्रामोद्योगमार्फत तयार करण्यात येणारे सर्व प्रकारच्या वस्तू, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडून तयार करण्यात येणाऱ्या वस्तू, स्टेशनरी आणि शाळेय साहित्य विक्रीस शासनाने परवानगी दिली आहे. बॅंकिंगचे व्यवहारही करता येणार  ज्यांना बॅंकेतून पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी बॅंकाच्या दरात जावे लागते, त्यांच्यासाठी शासनाने बॅंकिंग व्यवहाराचीही सोय रेशनिंगच्या दुकानात करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. संबंधित दुकानदारांकडे त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आणि अॅप देण्यात आले आहे. त्याद्वारे आधार लिंकिंग करून बॅंकेशी कनेक्ट करून बॅंकिंग व्यवहाराचीही सोय संबंधित दुकानात सुरू झाली आहे. त्यामुळे लोकांची चांगली सोय झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com