तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार : दूध संघ

तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार : दूध संघ
तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार : दूध संघ

पुणे : दूध भुकटीला प्रतिलिटर तीन रुपये अनुदान ही अगदी तुटपुंजी मदत आहे. दूध भुकटीत प्रतिकिलो ८० रुपयांचा फटका बसलेला असताना अनुदानातून केवळ ३० रुपयांची मदत होणार असल्याने तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार हा आहे. या मदतीमुळे संघांचे व शेतकऱ्याचे नुकसान भरून निघेल अशी अजिबातच शक्‍यता नाही, अशा प्रतिक्रिया दूध संघांकडून व्यक्त झाल्या आहेत. 

राज्य शासनाने दुधाच्या प्रश्नावर तीन रुपये प्रतिलिटर अनुदानाचा काढलेला तोडगा कुचकामी आहे. दुधापासून भुकटी तयार करणारे सर्व खासगी व सहकारी युनिट तोट्यात आहेत. दूध भुकटीत प्रतिकिलो ८० रुपयांचा फटका बसलेला असताना अनुदानातून केवळ ३० रुपयांची मदत होणार असल्याने तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार हा आहे. मुळात दुधाचा प्रश्न चिघळण्यास गेल्या दोन वर्षांपासून तयार झालेली स्थिती जबाबदार आहे. मी अडीच वर्षांपूर्वीच या स्थितीची कल्पना दिली होती. अनुदान दिले जात असले तरी यापूर्वी दोन वर्षांत झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. आमची मूळ मागणी भुकटी खरेदीची होती. तुटपुंजे अनुदान दिल्याने राज्यातील भुकटीचे साठे पडून राहणार आहेत. त्यासाठी गोदाम भाडे, विमा असे खर्च संघांना सहन करावेच लागतील. भुकटी खराब झाल्यास जबर तोटा सहन करावा लागणार. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे लागलेल्या दुष्टचक्रातून अजूनही सुटका झालेली नाही, अशी प्रतिक्रिया इंडियन डेअरी असोसिएशनचे मार्गदर्शक व गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी व्यक्त केले. फारसा फरक नाही तीन रुपये अनुदान ही अगदी तुटपुंजी मदत आहे. या मदतीमुळे संघांचे व शेतकऱ्याचे नुकसान भरून निघेल अशी अजिबातच शक्‍यता नाही. येथून पुढे जे संघ भुकटी तयार करतील त्यांना हे अनुदान मिळणार आहे. याचाच अर्थ अगोदर ज्या संघांनी भुकटी तयार करून ठेवली आहे, त्या संघांना नेमका काय फायदा होणार हे निश्‍चित नाही. यामुळे या अनुदानामुळे सध्याच्या स्थितीत काहीच फरक पडणार नाही हे मात्र नक्की. या निर्णयाबाबत विचारविनिमय करण्यासाठी गुरुवारी (ता.१०) कात्रज येथे राज्यातील सर्व दूध संघ, खासगी दूध संघ यांची बैठक घेणार आहे.  - विनायक पाटील,  अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व वितरक कृती समिती अनुदान मिळविणे हा आणखी तोट्याचाच खेळ सध्या दूध भुकटी तयार करताना लिटरला आठ रुपयांचा तोटा होत आहे. जर तीन रुपये यातून कमी केले तर हा तोटा पाच रुपये इतका होईल. यामुळे मदतीमुळे तोटा होणार नाही हा समज खोटा आहे. अगोदरच जुनी पावडर शिल्लक आहे. जर आणखी वीस टक्के जादा करून अनुदान मिळविणे हा आणखी तोट्याचाच खेळ आहे. - विश्‍वास पाटील, अध्यक्ष,  कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)

अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करावे... भुकटीला प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देण्याचा निर्णय चांगला आहे. भुकटीला दिले जाणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करावे किंवा शासनाने जाहीर केलेल्या दराने दूध खरेदी करावी. - सत्यजितसिंह पाटणकर,  अध्यक्ष, ग्रीन व्हॅली फूड प्रो. प्रा. लिमिटेड, पाटण, जि. सातारा.

तोटा भरुन निघेल अशी शक्‍यता वाटत नाही... अगदी काही नसल्यापेक्षा काही तरी निर्णय झाला हे दिलासायदायक आहे. खरं तर दुधाची खरेदी किंमत व त्याआधारे तयार होणारी पावडर याचा दर निश्‍चित करणे गरजेचे आहे. दूध व त्यापासून तयार होणाऱ्या भुकटीची अंदाजे किंमत पाहिली तर ती किलोस १७५ ते १८० रुपये इतकी होते. पण या किंमतीत भुकटीची विक्री होत नाही. मागणी नसल्याने व अतिरिक्त दुधामुळे भुकटी तयार करण्याची प्रक्रिया तोट्यात जात आहे. पहिल्यांदा भुकटीचा दर किती असावा, याबाबत ठोस धोरण हवे आणि दुसरे म्हणजे शालेय पोषण आहारात दूध भुकटीचा वापर करणे गरजेचे आहे. शासनाच्या निर्णयामुळे दूध संघांना होणारा तोटा भरुन निघेल अशी शक्‍यता वाटत नाही. - विनय कोरे, अध्यक्ष,  वारणा दूध संघ, वारणानगर, जि. कोल्हापूर 

थेट दूध दरवाढ करणे हाच पर्याय आहे...   अनुदानामुळे जुनी भुकटी विकू शकते व दर कमी होणार नाहीत. परंतु अंमलबजावणी तातडीने झाली नाही, तर नवीन भुकटी पुन्हा साठवू शकते. या अनुवादाचा प्रकल्पधारकाला फायदा होणार असला तरी ते अल्प आहे. त्यामुळे फार दरवाढीवर फरक होईल, असे आजिबात नाही. थेट दूध दरवाढ करून ती २७ रुपये करणे हाच पर्याय आहे.   - विजय लांडगे, अध्यक्ष,  दूध शीतकरण केंद्र, देहरे, जी. नगर एक ते दोन रुपयांनी दर वाढतील राज्य मंत्रिमंडळाने सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पधारकांना प्रतिलिटर तीन रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या निर्णयाने दूधदरात फारसा फरक पडणार नाही. फार तर एक ते दोन रुपयांनी दर वाढतील. सात ते दहा रुपये अनुदान मिळायला हवे होते.  - संदीप रोहकले, अध्यक्ष, वैभव दूध शीतकरण केंद्र, भाळवणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com