बाजरीचे पीक जोमात, आंतरमशागतीसह खते देण्यास वेग 

खानदेशात बाजरी पीक यंदा जोमात आहे. पिकाला खते देण्यासह आंतरमशागतीचे काम वेगात सुरू आहे. पिकाला अनुकूल वातावरण तयार झाल्याने पिकाची चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
 बाजरीचे पीक जोमात,  आंतरमशागतीसह खते देण्यास वेग Millet crop in full swing, Speed of application of fertilizers with intercropping
बाजरीचे पीक जोमात,  आंतरमशागतीसह खते देण्यास वेग Millet crop in full swing, Speed of application of fertilizers with intercropping

जळगाव : खानदेशात बाजरी पीक यंदा जोमात आहे. पिकाला खते देण्यासह आंतरमशागतीचे काम वेगात सुरू आहे. पिकाला अनुकूल वातावरण तयार झाल्याने पिकाची चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

बाजरी पिकाची पेरणी खानदेशात यंदा सुमारे ६०० हेक्टरने वाढली आहे. पेरणी सुमारे सात हजार हेक्टरवर झाली आहे. पेरणी कमी होईल, असे संकेत होते. परंतु पेरणी अपेक्षेपेक्षा अधिक झाली आहे. कारण मका, गहू पीक अधिक पाणी, खते आदी खर्चामुळे परवडत नसल्याने बाजरी पिकाकडे शेतकरी पुन्हा वळले आहेत. शिवाय सकस चाराही उपलब्ध होत असल्याने बाजरीची पेरणी बऱ्यापैकी झाली आहे.

अनेक शेतकऱ्यांनी पेरणी डिसेंबरच्या अखेरीस देखील केली. काही शेतकऱ्यांनी जानेवारीच्या मध्यात पेरणी केली आहे. पीक काही भागात पुढील आठवड्यात निसवणीवर येईल. पिकात तण नियंत्रणाचे काम आटोपले आहे, तर अनेक शेतकरी आंतरमशागत करून खते देत आहेत. युरिया व इतर रासायनिक खतांचा नियंत्रित स्वरूपात उपयोग शेतकरी करीत आहेत. 

धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, साक्री, धुळे या सर्वच तालुक्यांत पेरणी झाली आहे. सुमारे तीन हजार हेक्टरवर धुळ्यात पेरणी झाली आहे. नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात मिळून साडेतीन हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. नंदुरबारात तळोदा, नवापूर, नंदुरबार, जळगावमधील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर या भागात पेरणी अधिक आहे.

मध्यंतरी विषम वातावरण होते. कमीअधिक थंडी व ढगाळ वातावरणामुळे पिकाची हवी तशी वाढ दिसत नव्हती. पण, या आठवड्यात वातावरण कोरडे असून, थंडी कमी झाली आहे. उष्णता वाढत आहे, त्यामुळे काळ्या कसदार जमिनीत बाजरी पीक जोमात वाढेल, अशी स्थिती आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com