राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग पुनरुज्जीवित करणार ः मंत्री अस्लम शेख

Machine tracking industry
Machine tracking industry

कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग पुनरुज्जीवित करण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी दिली. 

येथे सागरेश्वर सूतगिरणी कार्यस्थळावर मंगळवारी (ता. १८) आयोजित यंत्रमाग उद्योजकांच्या बैठकीत मंत्री अस्लम शेख बोलत होते. या वेळी वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते. 

मंत्री शेख म्हणाले, ‘‘कडेगावसह जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी यंत्रमाग उद्योग उभारणी करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी राज्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनी येथे व्हीव्हर्स पार्क उभारला. परंतु या उद्योगाला मिळणाऱ्या सवलती बंद झाल्याने येथील पार्कमधील यंत्रमाग उद्योगांना घरघर लागली आहे. शेकडो तरुण बेरोजगार झाले. तेव्हा कडेगावसह राज्यातील यंत्रमाग उद्योगांना पुनर्जीवित करण्यासाठी राज्यातील संपूर्ण यंत्रमाग उद्योगाचा आढावा घेऊन लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. तसेच या उद्योगांना सवलतीच्या दरात वीज देणे, अभय योजना व ३५ टक्के सबसिडी देण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल. 

मंत्री डॉ. कदम म्हणाले, की सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी येथे व्हीव्हर्स पार्क स्थापन केल्यामुळे येथील तरुणांनी यंत्रमाग उद्योग सुरू केले. परंतु शासनाने सवलती व जादा दराने वीजपुरवठा व अन्य कारणाने येथील १४० यंत्रमाग उद्योगांपैकी केवळ २० ते २५ यंत्रमाग उद्योग सुरू आहेत. तर बाकीचे सर्व बंद पडले आहेत. त्यामुळे येथील उद्योजकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. तर कर्जाचे हप्ते बॅंकांना न गेल्याने बॅंकांनी येथील यंत्रमागांचे लिलाव सुरू केले आहेत. त्याला स्थगिती द्यावी. तसेच येथील आजारी यंत्रमाग उद्योग पुनरुज्जीवित करण्यासाठी राज्य शासनाकडून ठोस उपाय योजना होणे गरजेचे आहे. त्यासाठी वस्त्रोद्योग मंत्री या नात्याने अस्लम शेख व राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सकारात्मक व ठोस निर्णय घ्यावा. या बाबत २४ तारखेपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात घोषणा करावी. 

उद्योजक सुनील पाटील, जिल्हा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष भिमराव मोहिते, अजय भस्मे, विनय भंडारी आदींनी यंत्रमाग उद्योगातील विविध अडचणी वस्त्रोद्योग मंत्र्यासमोर मांडल्या. या वेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, जितेश कदम, सुरेश देशमुख, संताजी यादव, असिफ तांबोळी, साजीद पाटील, हैदर मुल्ला आदी मान्यवर व मोठ्या संख्येने यंत्रमाग उद्योजक उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com