पाच दिवसांचा आठवडा तरी कर्मचारी बेपत्ता !

पाच दिवसांचा आठवडा तरी कर्मचारी बेपत्ता
पाच दिवसांचा आठवडा तरी कर्मचारी बेपत्ता

अमरावती  ः पाच दिवसांचा आठवडा झाल्यानंतरही शासकीय कर्मचाऱ्यांची लेटलतिफी कमी झाली नाही. त्याची दखल घेत कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिले आहेत.  राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा लागू केला. रोजच्या कामात पाऊणतासाची वाढ करण्यात आली. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना आता सकाळी ९.४५ वाजता कार्यालयात पोचणे अनिवार्य आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी अंजनगावसूर्जी पंचायत समितीला ९.४५ वाजता आकस्मिक भेट दिली. या वेळी तब्बल २६ कर्मचारी नियोजित वेळेत कार्यालयात पोचले नव्हते. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पथ्रोट आरोग्य केंद्राकडे वळविला. त्या ठिकाणी १३ कर्मचारी नियोजित वेळेनंतरही कार्यालयात पोचले नसल्याचा खुलासा झाला. या सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचे आदेश प्रशासन प्रमुखांना त्यांनी दिले. पथ्रोट आरोग्य केंद्रातील कर्मचारी तर मुख्यालयी राहत नसल्याचेही आढळून आले. शासन निर्देशानुसार, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्‍ती आहे. त्यामुळे मुख्यालयी न राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांवरदेखील प्रशासकीय कारवाई करण्याच्या सूचना बबलू देशमुख यांनी दिल्या. अंजनगावसूर्जी पंचायत समिती व त्या अंतर्गत कार्यालयांना भेट दिली असता सहायक लेखा अधिकारी, स्थापत्य अभियंता, पशू पर्यवेक्षक, वरिष्ठ आणि कनिष्ठ सहायक, परिचर, कंत्राटी रोहयो कर्मचारी, एनआरएलएम, एसबीएम, वाहनचालक, डेटा एन्ट्री ऑपरेटर असे २६ कर्मचारी कार्यालयाची नियोजित वेळ टळूनही हजर नव्हते. कार्यालयीन वेळ, गणवेश, ओळखपत्र, स्वच्छता याबाबत सूचना देऊन संबंधितांना ताकीद द्यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल अध्यक्षांना सादर करण्याचे निर्देश उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांना देण्यात आले. अध्यक्षांनी या भेटीत कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेत त्यांना वेळ पाळण्याचे आदेश दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com