'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार गावांमध्ये अभियान

फरदड कपाशी
फरदड कपाशी

पुणे : राज्यात कपाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार गावांमध्ये ''फरदड''मुक्तीसाठी कृषी विभागाने अभियान सुरू केले आहे. दुष्काळाशी सामना करण्याचे आव्हान एका बाजूला असले तरी पुढील हंगामात बोंड अळीचा धोका रोखण्यासाठी या अभियानाला चालना देण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत.   ‘‘राज्याच्या बहुतेक भागातील कपाशी आता निघाली आहे. तथापि, १८ टक्के बागायती भागात कपाशीचे दुसरे पीक (फरदड) घेण्याचा प्रयत्न शेतकरी करू शकतात. मात्र, फरदड घेतल्यास कीडीचे संक्रमण होऊन पुढील हंगामात बोंड अळीचा धोका तयार होऊ शकतो. त्यामुळे आम्ही एकाही गावाने फरदड घेण्याचा प्रयत्न न करण्याच्या सूचना दिल्या आहेत,’’ अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  राज्यात यंदा परतीचा मान्सून झालेला नाही. जमिनीतील ओलावादेखील संपलेला आहे. त्यामुळे फरदड घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अनेक गावांमध्ये फुले, बोंडे गळून पडलेली आहेत. त्यामुळे निसर्गाकडून एकप्रकारे फरदड नियंत्रण होते आहे. "राज्यात किमान सहा लाख हेक्टरवर शेतकरी कपाशीचे दुसरे पीक घेतो. फरदडपासून कमी उत्पादन मिळत असले तरी मशागतीचा खर्च न करता विहिरीच्या पाण्यावर उत्पादन घेतले जाते. यंदा फरदड न घेता ऊलट पहिल्या पिकाचे अवशेष (पऱ्हाट्या) नष्ट करा, असे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे,’’ असेही सूत्रांनी स्पष्ट केले.  फरदड न घेता कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना पऱ्हाट्यांचे तुकडे करण्यासाठी श्रेडर मशिनचा वापर करावा, असेही सुचविले जात आहे. त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमातून श्रेडर वाटप वाढविता येईल का, अशीदेखील चाचपणी सुरू आहे. दरम्यान, जिनिंग मिलच्या पातळीवर बोंड अळी नष्ट करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. जिनिंगची पाहणी करून कामगंध सापळ्यांच्या माध्यमातून बोंड अळी नियंत्रण करावे. त्यासाठी राज्यातील ८०० ते १००० जिनिंगच्या परिसरावर लक्ष ठेवावे, अशा सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत.  बोंड अळी नियंत्रणासाठी अशी राबविली यंत्रणा

  •  सहा लाख कामगंध सापळ्यांचा वापर
  •  एक लाख लिटर्स कीटकनाशकाचे अनुदानावर वाटप
  •  बोंड अळीची माहिती देण्यासाठी ५५० शेती शाळा
  •  कृषी विभाग व कृषी विद्यापीठांची संयुक्त पथके 
  •  कृषी आयुक्त व कुलगुरूंकडून देखील व्यक्तिशः संनियंत्रण
  •  एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजेच आयपीएम तंत्राचा वापर 
  •  बोंड अळी नियंत्रण अभियानात बियाणे कंपन्यांचा चांगला सहभाग
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com