‘भारत बंद’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद

केंद्र सरकारने लागू केलेले तीनही कृषी व पणन कायदे मागे घेण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने पुकारलेल्या देशव्यापी बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
‘भारत बंद’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद Mixed response to 'Bharat Bandh' in the state
‘भारत बंद’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद Mixed response to 'Bharat Bandh' in the state

पुणे : केंद्र सरकारने लागू केलेले तीनही कृषी व पणन कायदे मागे घेण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने पुकारलेल्या देशव्यापी बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी कृषी कायद्यांची होळी, रास्ता रोको आणि निदर्शने करण्यात आली. भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता.  संयुक्त किसान मोर्चाने कृषी कायदे रद्द होण्याबरोबरच एमएसपी कायदा करावा, वीज कायदा रद्द व्हावा, इंधन व स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती ५० टक्के कमी कराव्यात, अशा मागण्या केल्या होत्या. मात्र महाराष्ट्रात उत्तर भारतासारखा या बंदला प्रतिसाद मिळाला नाही. 

काही बाजार समित्यांवर परिणाम शेतकरी वर्गाने केलेल्या मागण्यांच्या मुद्यांवर पुकारलेल्या बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व डाव्या पक्षांचा समावेश होता. माथाडी कामगार तसेच व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा दिल्यामुळे मुंबईसह राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये व्यवहारांवर परिणाम झाला. कोरोना परिस्थितीमुळे सरकारी व खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांची संख्या आधीपासूनच कमी आहे. रस्ते वाहतूक देखील मंदावलेली होती. कोरोनामुळे राज्यभर आठवडी बाजार, सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रम बंद असल्यामुळे एरवी बंद काळात पोलिसांवर असलेला ताण आजच्या ‘भारत बंद’ दरम्यान दिसून आला नाही.

कॉँग्रेसच्या मंत्र्यांचे उपोषण बंदच्या निमित्ताने राज्यातील सत्ताधारी कॉँग्रेसचे मंत्रीच उपोषण करताना दिसत होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबईत उपोषणाला बसले होते. काँग्रेस विधिमंडळ नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रीरामपूरमध्ये उपोषण केले. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर कॉँग्रेस भवनात तर कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सांगलीमध्ये उपोषण केले.  

‘स्वाभिमानी’चा सहभाग नाही सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कारखान्याच्या विरोधात एफआरपीच्या मुद्द्यावर आंदोलन करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना कराड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात बंद दरम्यान स्वाभिमानीने कोणतेही आंदोलन केले नाही, अशी माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. 

ढोंगी कॉँग्रेसमुळे सहभाग नाही ः रघुनाथदादा  शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांचाही बंदमध्ये सहभाग नव्हता. “बाजार समित्यांमध्ये लुटणारे, वीज कनेक्शन कापणारे आणि शेतकऱ्यांची एफआरपी बुडवणाऱ्या कॉँग्रेसने शेतकऱ्यांसाठी आंदोलनाचे ढोंग केले होते. त्यामुळे आम्ही या बंदला पाठिंबा दिला नाही.” असे पाटील यांनी सांगितले.     नाशिकमध्ये कृषी कायद्यांची होळी  बंदच्या निमित्ताने बहुजन शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये कृषी कायद्यांची होळी केली. नगरमध्ये शेतकरी व कामगार संयुक्त समितीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने केली.

पुण्यात अल्प प्रतिसाद ‘भारत बंद’ला अल्प प्रतिसाद मिळाला. पुणे बाजार समितीसह जिल्ह्यातील बाजार समित्यांचे व्यवहार सुरळीत होते. भारत बंदच्या पार्श्‍वभूमीवर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता.२६) राज्यासह परराज्यांतून फळे, भाजीपाला, कांदा बटाट्याची लहान मोठ्या सुमारे ९४२ वाहनांमधून सुमारे २१ हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक झाल्याचे फळे भाजीपाला विभाग प्रमुख बाळासाहेब बिबवे यांनी सांगितले. तर भाजीपाल्याची मागणी आणि पुरवठा सुरळीत राहिल्याने भाजीपाल्याचे दर स्थिर होते, असे आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीच्या वतीने केंद्र सरकारच्या कृषी धोरणे आणि कायद्यांच्या विरोधात शहरात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com