भविष्यात मोबाईल बनतील ‘शेतीचे डॉक्टर’ 

crop checking through mobile
crop checking through mobile

पुणेः शेतातील कीड-रोग-हवामान-माती यातील बदलत्या परिस्थितीचा तात्काळ अभ्यास करून दोष आणि उपाय सांगण्याची क्षमता मोबाईलमध्ये निर्माण केली जात आहे. त्यामुळे भविष्यात मोबाईल हेच शेतीचे डॉक्टर बनतील, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली.  कृषी क्षेत्रात जगप्रसिद्ध कंपन्या संयुक्तपणे डिजिटल फार्मिंगवर काम करीत आहेत. भारतातही त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात शेतकऱ्याला मोबाईलकडून तण निदान, रोग निदान, पानांची अवस्था तसेच वाढ याचे विश्‍लेषण करून मिळते. मोबाईलचा कॅमेरा केवळ पानावर धरताच पानावर कोणते रोग आलेले आहेत, त्यासाठी कोणते रसायन किती प्रमाणात कसे फवारावे याची माहिती तत्काळ मिळू लागली आहे.  ग्रामीण भागात बॅंकिंग व्यवस्था हळूहळू मोबाईलच्या ताब्यात जात आहे. शेतकरी आता मोबाईलवरून पेमेंट, कर भरणे, सातबारा काढणे अशी कामे चांगल्या पद्धतीने करतात. तथापि, शेतातील सर्व नियोजन एक दिवस मोबाईलच्या ताब्यात जाण्याची चिन्हे आहेत, असे काही कृषी शास्त्रज्ञानांनी व्यक्त केले.  ‘‘आमच्या मते भारतातील शेती पुढील दशकात ‘डिजिटल फार्मिंग सोल्युशन’च्या वाट्याला गेलेली असेल. शेतकरी सध्या मोबाईलच्या माध्यमातून विहिरीवरील पंप चालू-बंद करणे, सिंचन व्यवस्था, खत नियोजन, हवामानाचा अंदाज घेणे व त्यानुसार पाणी-खतांचे डोस ठरविणे अशी कामे करीत आहेतच; मात्र मोबाईलच्या माध्यमातून कोणत्याही सामान्य शेतकऱ्याला शेतातील कोणत्याही स्थितीला तोंड देता यावे यासाठी आमच्या चाचण्या सुरू आहेत,” असे एका शास्त्रज्ञाने सांगितले.  शहरातील कोणत्याही उच्चशिक्षित नागरिकापेक्षाही ग्रामीण भागातील शेतकरी मोबाईल चांगला हाताळतात, असे डिजिटल फार्मिंगवर काम करणाऱ्या तंत्रज्ञांचे म्हणणे आहे. “लहान मुले जशी मोबाईल लिलया हाताळतात तसेच सामान्य शेतकरीदेखील एकदा स्टेप्स कळल्यानंतर कोणतेही मोबाईल ॲप्लिकेशन व्यवस्थित हातळत असल्याचे आमच्या लक्षात आलेले आहे. शेतकऱ्यांना सध्या केवळ तीन समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात प्रादेशिक भाषा, मोबाईलचा स्क्रिन व रेंज असे मुद्दे आहेत. मात्र या समस्यादेखील भविष्यात निकालात निघतील,” असे तंत्रज्ञांचे म्हणणे आहे.  भारतातील ३० पिकांवरील १०० किडी व तितकेच रोग यांची अवस्था ओळखून उपाय सूचविण्याची क्षमता कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी आणली आहे. याशिवाय कंपनीचे शास्त्रज्ञ आता ‘फिल्ड मॅनेजर’ नावाच्या एका भन्नाट ‘डिजिटल फार्मिंग सोल्युशन’वर काम करीत आहेत. यात मोबाईलकडून कीड, रोग, पाणी, माती, हवामान, पाने या सर्वांचा अभ्यास केला जाईल.   “शेतात कोणती कीड किंवा रोग आहे, फवारणी कशी करावी, पाणी किती कमी पडते आहे, पाऊस येणार की नाही, येणार असल्यास फवारणी कशी टाळावी, मातीची आणि पिकाची अवस्था काय आहे असे सर्व विश्लेषण मोबाईल प्रणाली करीत राहील. त्यातून उपायदेखील शेतकऱ्यांना सूचविले जाते. या नव्या प्रणालीचे बीटा टेस्टिंग सध्या कर्नाटक व आंध्र प्रदेशातील ५५ शेतकऱ्यांकडे आम्ही करीत आहोत. आमच्या मते नोव्हेंबर २०२० मध्ये ही प्रणाली भारतात अवतरलेली असेल, अशी माहिती या कंपन्यांच्या गोटातून देण्यात आली.  भविष्यात स्मार्ट मोबाईलच्या किमती अजून कमी होतील. मोठे स्क्रिन असलेले मोबाईल तसेच डेटा लोडिंगमध्ये असलेला रेंजची समस्याही मिटलेली असेल. अशा वेळी जर प्रादेशिक भाषांमधून मोबाईलने थेट शेतात शेतकऱ्याला माहिती दिल्यास त्याला कोणत्याही व्यक्तीची गरज भासणार नाही. आमचा कोणताही शास्त्रज्ञ, प्रतिनिधी हा शेतकऱ्याच्या शेतात जाणार नाही. त्याऐवजी मोबाईलकडून सूचविल्या जाणाऱ्या उत्पादनाला शेतकऱ्याच्या हातात कसे पोचवावे ही समस्या कृषी कंपन्यांना हाताळावी लागेल, असा तर्क ‘डिजिटल फार्मिंग’वर काम करणारे तंत्रज्ञ काढत आहेत.  ...हे चित्र रंजक वाटते, पण खरे होणार  एक शेतकरी सकाळी उठून आपल्या शेतात जातो. तेथे पानांवर मोबाईल धरतो. मोबाईल पानाचे फोटो काढून पानावरचा कीड-रोग ओळखतो. कोणते कीडनाशक किती फवारावे हे मोबाईलच सांगतो. त्यासाठी कोणत्या कंपनीचे कीडनाशक विकत घ्यायचे हे शेतकरी एका क्लिकवर ठरवून र्ई-पेमेंट करून ऑर्डर बुक करतो. ही ऑर्डर कंपनीला मिळून कंपनीकडून थेट ड्रोनच्या साहाय्याने त्याच दिवशी कीडनाशक थेट शेतकऱ्याच्या शेतात येते. “हे चित्र तुम्हाला ऐकायला रंजक वाटते असले तरी २०३० च्या आधी प्रत्यक्षात उतरेल,” असा दावा डिजिटल फार्मिंगवर काम करणारे तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ करीत आहेत. 

९५ टक्के सेवा मोबाईलकडून मिळतील  “आमच्या मते शेतात सिंचन, पोषण किंवा कीड-रोग व्यवस्थापन या श्रेणीत कोणतीही समस्या असल्यास शेतकरी जास्त संभ्रमात सापडतो. अशा वेळी सध्या तो सहा घटकांची मदत घेतो. यात शेतकरी सहकारी, निविष्ठा दुकानदार, खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ, कृषी खात्याचे कर्मचारी आणि प्रिंट-डिजिटल माध्यमांचा समावेश होतो. भविष्यात शेतकरी जवळपास ९५ टक्के सल्ला किंवा सेवा केवळ डिजिटल घटकाकडून येईल. त्याचे माध्यम मोबाईल हेच असेल. इतकेच नव्हे तर ट्रॅक्टरचलित कामेदेखील मोबाईल ‘कमांड’द्वारे होतील. यामुळे भविष्यात मोबाईल शेतकऱ्यांचे खरे डॉक्टर बनतील,” असे विश्‍लेषण या प्रकल्पावर कार्यरत असलेल्या तंत्रज्ञाने केले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com