स्वयंचलित ठिबक सिंचनासह केळीची आधुनिक शेती

नायगाव (जि.जळगाव) येथील उच्चशिक्षित युवा शेतकरी विशाल किशोर महाजन यांनी आपल्या ४० एकरांतील केळीसाठी शंभर टक्के स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून काटेकोर पाणी व्यवस्थापन तंत्र अमलात आणले आहे. सोबतच विविध आधुनिक तंत्रांचा वापर करून एकरी उत्पादन व त्याचा दर्जा यात वाढ करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
Use of skirting bag in banana orchard
Use of skirting bag in banana orchard

नायगाव (जि.जळगाव) येथील उच्चशिक्षित युवा शेतकरी विशाल किशोर महाजन यांनी आपल्या ४० एकरांतील केळीसाठी शंभर टक्के स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून काटेकोर पाणी व्यवस्थापन तंत्र अमलात आणले आहे. सोबतच विविध आधुनिक तंत्रांचा वापर करून एकरी उत्पादन व त्याचा दर्जा यात वाढ करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यात नायगाव (ता.मुक्ताईनगर) हे तापी नदीकाठावरील गाव आहे. परिसरात हलकी व काळी कसदार जमीन आहे. केळीची शेती या भागात अधिक आहे. शिवाय कापूस, हळद आदी पिकेही शिवारात दिसतात. गावातील विशाल महाजन यांच्या घरची सुमारे ४० एकर शेती आहे. त्यासाठी शंभर टक्के ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. केळी हेच त्यांचे प्रमुख आहे. कृषी पदवीधर असलेल्या विशाल यांनी कृषी व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदविकाही घेतली आहे. शिक्षणाची तांत्रिक पार्श्‍वभूमी असल्याने अभ्यासूवृत्तीने शेतीत बदल करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. मागील तीन-चार वर्षात त्यादृष्टीने शेतीत आमूलाग्र बदल केले आहेत. केळी शेतीतील सुधारीत व्यवस्थापन

  • अलीकडील काळापासून ‘फ्रूटकेअर’ तंत्राचा वापर सुरू केला आहे. दरवर्षी १६ ते १७ एकरांत केळीची मे व जूनमध्ये लागवड असते. बाजारपेठेचा अंदाज घेऊन मार्च किंवा एप्रिलमध्येही काहीवेळेस लागवड असते. उर्वरित क्षेत्रात कापूस, हळद, तूर आदी पिके असतात. गादीवाफ्याचा अवलंब, प्लॅस्टिक मल्चिंग यांचा वापर तर होतोच. केळीचे शक्यतो एकच उत्पादन घेण्यात येते.
  • लागवडीच्या काळात खानदेशात तापमान ४० अंशाच्या पुढेही जाते. एवढ्या उष्णतेत रोपे जगविण्यासाठी त्याभोवती धैंचा पेरण्यात येतो. त्यामुळे रोपांना सावली मिळते. चांगली वाढ होते. पिकात तूट येत नाही. मेच्या अखेरीस धैंचा काढून तो रोपांनजीकच टाकला जातो. त्यामुळे हिरवळीचे खत पिकाला उपलब्ध होते.
  • केळीबागेचे उष्ण वाऱ्यांपासून संरक्षण होण्यासाठी शेवरी, हिरवी नेट यांचाही वापर होतो.
  • आंतरमशागतीसाठी मनुष्यचलित पॉवर टिलरही आहे. काढणीनंतर पिकाचे अवशेष बारीक करण्यासाठी ट्रॅक्‍टरचलित यंत्राचा वापर केला जातो. सुमारे १५ ते २० दिवस वाळवल्यानंतर पलटी नांगराने खोल मशागत करून हे अवशेष जमिनीत गाडण्यात येतात. काही दिवसानंतर रोटाव्हेटर फिरवून जमीन भुसभुशीत केली जाते. यामुळे केळी पिकाखालील जमिनीची सुपीकता टिकून राहत आहे.
  • स्वयंचलित ठिबक पध्दतीचा वापर

  • शेतीला लागणारे मनुष्यबळ, पाणी, खते यांचा वाढता खर्च लक्षात घेऊन विशाल यांनी शंभर टक्के स्वयंचलित ठिबक (ड्रीप ऑटोमेशन) यंत्रणा बसविली आहे. त्यासाठी पाच इंची पाईप, २० बाय १८ फुटाची खोली व ड्रीप युनिट असा मिळून सुमारे १५ लाख रुपये खर्च आला आहे.
  • तापी नदीवरून दोन जलवाहिन्या टाकून घेतल्या आहेत. पूर्वी त्यातून गाळ यायचा. त्यामुळे ठिबकची यंत्रणा सतत चोकअप व्हायची. स्वयंचलित पद्धतीत ही समस्या दूर झाली आहे. त्यास फिल्टर व बॅक वॉश यंत्रणा आहे. ‘सॉप्टवेअर प्रोग्रॅम’मध्ये वेळ दिल्यास हे काम आपोआप पूर्ण केले जाते.
  • रात्री शेतात जाण्याचे कष्ट वाचले स्वयंचलित यंत्रणेमुळे शेतात रात्री अपरात्री जाऊन व्हॉल्व बंद करण्याचे कष्टही वाचले आहेत. या पद्धतीत पाणी व खतांचा कार्यक्षम वापर होतो. पूर्वी केळीला उन्हाळ्यात दररोज चार तास पाणी दिले जायचे. नदीवरून पाणी विहिरीत व तेथून शेताला देणे या पद्धतीत पाच पंपांचा वापर व्हायचा. आता हेच काम केवळ तीन पंपांमध्ये होते. व्यवस्थापनासाठी दोन-तीन जणांची रोज नियुक्ती केलेली असायची. आता उन्हाळ्यात दररोज दोन तास पाणी देता येते. म्हणजे ही गरज ५० टक्के कमी झाली आहे. शिवाय मजुरांची गरजही कमी झाली. विजेचा वापर कमी होऊन आता फक्त १२ एचपी क्षमतेचा पंप विहिरीत वापरात ठेवला आहे. स्वयंचलित यंत्रणेवर अनावश्‍यक पाण्याचा ताण दूर करण्यासाठी प्रेशर रिलीज व्हॉल्वची व्यवस्थादेखील आहे.

    सुरू केला फ्रूटकेअर तंत्राचा वापर

  • विशाल यांनी केळी पिकात आता फ्रूटकेअर तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहेत. यात केळी निसवल्यानंतर केळफुलाला रसशोषक किडींपासून बचावासाठी इंजेक्‍शन दिले जाते. त्यानंतर कीटकनाशकाची फवारणी घेतली जाते. काही दिवसानंतर फ्लोरेट व केळफूल काढले जाते. नऊ फण्या एका घडाला ठेवण्यात येतात. यानंतर घडावर अखेरची फवारणी सल्ल्यानुसार होते.
  • किडींपासून संरक्षण म्हणून स्कर्टिंग बॅगेचाही वापर करण्यात येतो. या प्रयत्नांमधून निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणे शक्‍य होणार आहे. सुमारे ४५ कॅलीपर्स एवढ्या घेराची केळी व आठ ते नऊ इंचाचे केळ तयार करणे शक्य होणार आहे.
  • सध्या एकरी ३० टनांपर्यंत उत्पादन व रास सुमारे २२ किलोची मिळते. आता ती २५ किलोपर्यंतची मिळेल अशी अपेक्षा आहे. एका कंपनीच्या मदतीने परदेशात निर्यात करण्याचे प्रयत्न आहेत. मागील दोन वर्षे केळीला सरासरी १२ रुपये प्रति किलो दर जागेवर मिळाला आहे. एकरी खर्च सव्वालाख रुपयांपर्यंत होतो. 
  • संपर्क- विशाल महाजन-९२८४८४०४९९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com