agriculture news in marathi Modern multilevel onion storage technology | Page 2 ||| Agrowon

आधुनिक बहुमजली कांदा साठवण तंत्रज्ञान

गणेश कोरे
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

राष्ट्रीय कांदा, लसूण संशोधन केंद्र आणि कला बायोटेक यांनी हवेच्या संतुलित पुरवठ्यावर तापमान नियंत्रण करणारे बहुमजली कांदा साठवणूक तंत्रज्ञान विकसित केले आहे.

चाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे कांद्याचे नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रीय कांदा, लसूण संशोधन केंद्र आणि कला बायोटेक यांनी हवेच्या संतुलित पुरवठ्यावर तापमान नियंत्रण करणारे बहुमजली कांदा साठवणूक तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याच्या विविध टप्प्यावर तीन वर्षे चाचण्या घेण्यात आल्या. १२० दिवसांच्या साठवणूक प्रयोगानंतर पारंपारिक कांदा साठवणुकीमध्ये कांद्याचे होणारे नुकसान १५ टक्क्यांनी कमी होत असल्याचे समोर आले. तसेच कांदा सडणे आणि कोंब फुटणे हे प्रकारही टळतात. हे तंत्रज्ञान वैयक्तिक शेतकऱ्यांसह, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, उद्योजक यांच्यासाठी उपयोगी ठरणार आहे.

कांद्याच्या मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनासाठी रब्बी हंगामातील साठवणूक केलेला कांदा महत्त्वाची भूमिका बजावतो. यासाठी अनेक शेतकरी व व्यापाऱ्यांनी स्वतःच्या कांदा चाळी उभ्या केल्या आहेत. मात्र, नैसर्गिक आपत्ती, वादळ आणि जास्त पर्जन्यमान यामुळे पारंपारिक कांदा चाळीमध्ये कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. कांदा साठवणुकीतील नुकसान कमी करण्यासाठी राजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संस्थेतील डॉ. कल्याणी गौरीपट्टी, डॉ. राजीव काळे, डॉ. मेजर सिंग यांनी कला बायोटेक प्रा. लि. यांच्यासह नियंत्रित वातावरणात कांदा साठवणुकीचे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे.

नैसर्गिक हवा खेळती राहणाऱ्या कांदाचाळीमध्ये साठवणुकीसाठी पोषक वातावरण नियंत्रण राहण्यात अनेक अडचणी येतात. या नवीन तंत्रज्ञानावर आधारित साठवणगृहात बंदिस्त आणि नियंत्रित वातावरण ठेवले जाते. त्यात २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान, ६० ते ६५ टक्के आर्द्रता आणि हवा खेळती राहण्यासाठी रचना केली आहे. यामुळे कांदा साठवणुकीमध्ये कांद्याचे कोंब येणे, सडणे व वजनातील घट याचे प्रमाण अत्यल्प राहत असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे.

दृष्टीक्षेपात कांदा पीक
भारतात सुमारे १३ लाख हेक्टरवर २२८ लाख टन कांद्याचे उत्पादन होते. वार्षिक उत्पादनात, ऑक्‍टोबर - नोव्हेंबर महिन्यात येणारे खरीप कांद्याचे उत्पादन १५ ते २० टक्के, जानेवारी- फेब्रुवारी मध्ये येणारे रांगडा कांद्याचे उत्पादन २० टक्के व एप्रिल मे महिन्यात रब्बी कांद्याचे उत्पादन ६०-६५ टक्के असते. मे महिन्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत कुठलाही कांदा काढला जात नाही. त्यामुळे जून ते ऑक्टोबरपर्यंत कांद्याची मागणी ही साठवलेल्या कांद्यातून पुरवली जाते. कांदा साठवणूक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने उन्हाळ्यात कांद्याच्या किमती कमी होतात. बऱ्याचदा सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान कांद्याच्या किमती वाढल्याचे दिसून येते.

अशी आहे अत्याधुनिक कांदा चाळ

 • व्यावसायिक कारणासाठी बहुमजली कांदा चाळ
 •  वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी एकमजली कांदा चाळ
 • कांदाचाळीत बहुमजली रॅक असून, एका रॅकची क्षमता २० टन.
 • २० टनांच्या रॅकमध्ये एक मीटरचे २-२ टनांचे १० रॅक असतात.
 • गरजेनुसार २-२ टनांच्या रॅकमधून कांदा काढणी सोपी जाते.
 • रॅकच्या मध्यावर खेळत्या हवेसाठी सछिद्र पाइप उभारला आहे. त्यातून नियमित हवा सोडली जाते.
 • हवा खेळती राहून तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत नियंत्रित राहते. कांद्याचा दर्जा कायम राहतो.

५० टनांच्या चाळीसाठी ३५ लाखांचा खर्च

५० टन क्षमतेच्या कांदाचाळीसाठी ३५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च पाच वर्षात वसूल होऊ शकतो असा दावा संशोधकांनी केला.यात कांद्याबरोबर लसूण देखील साठवणे शक्य. सध्या प्रयोग सुरु आहेत. विविध फळे, भाजीपाल्यासाठीही या साठवणगृहाचा उपयोग शक्य असून, त्यावर संशोधन सुरु आहे.

असा आहे साठवणूक आणि हाताळणी खर्च
एक किलो कांदा एका महिन्यासाठी साठविण्यास ६० पैसे खर्च येतो. म्हणजेच सहा महिन्यांसाठी प्रति किलो ३ रुपये ६० पैसे एवढा खर्च येतो. साधारण ७ ते १२ रुपये प्रति किलोचा कांदा सहा महिने साठवून योग्य दर येताच शेतकरी विकू शकतो.

वैशिष्ट्ये

 • नवीन तंत्रज्ञानाच्या साठवण गृहात चार महिन्यांपर्यंत कांदा नुकसानीचे प्रमाण १५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी.
 •  पारंपरिक साठवणुकीपेक्षा नवीन तंत्रज्ञानामुळे कांद्याची गुणवत्ता टिकून राहते.
 • साठवणगृहाची साठवण व हाताळणी खर्च शीतगृहापेक्षा कमी आहे.
 • कांदा साठवण गृहातून बाहेर काढल्यानंतर कोंब येत नाहीत.
 •  तापमान, आर्द्रता आणि हवा नियंत्रित करणे शक्य असल्याने साठवणगृहात देखील कांदा सुकवण करता येते.
 • सेंन्सॉरच्या साह्याने कुठूनही साठवणगृहातील वातावरणाची पाहणी व नियंत्रण रिमोट कंट्रोलद्वारे शक्य होते.
 • साठवण गृहात कांदा नसताना अन्य भाजीपाला व फळांची साठवण आवश्यकतेनुसार (१३ ते ३० अंश सेल्सिअस) योग्य तापमानात करता येते.
 • फळे पिकवण्यासाठीही याचा वापर होऊ शकतो.
 • साठवणुकीत कमी कार्बन उत्सर्जन व कमीत कमी नुकसान होते.
 • बिघाड झाल्यास अलार्म व दुरुस्तीच्या उपायासंदर्भात माहिती मिळते.
 •  कांद्याची हाताळणी व प्रतवारी यंत्रणेद्वारे निवड व साठवणूक.
 • कांदा साठवणूक केंद्रात टाकण्यासाठी स्वयंचलित वाहतूक पट्ट्याची सुविधा.
 • पिशव्या भरणे, वजन करणे यासाठी यांत्रिक सुविधा.

विविध यंत्रणांकडून तंत्रज्ञानाचे कौतुक

 • व्यक्तीगत शेतकऱ्यांना सोयीचे असे ५० आणि १०० मेट्रिक टन क्षमतेची साठवण गृह.
 • व्यावसायिक पातळीवर ८०० आणि १२०० मेट्रिक टन क्षमतेचे साठवणुकीची रचना तयार केली आहे.
 • कांदा लसूण संशोधन संचालनालयाच्या ‘ॲग्री बिझनेस इनक्युबेटर युनिट’ द्वारे या नवीन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक नाबार्ड, कृषी विभाग, पणन मंडळ, नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, महाएफपीसी, शेतकरी उत्पादक कंपन्या यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थित करण्यात आले.

शासनाच्या अनुदानाची गरज
पारंपारिक कांदाचाळींप्रमाणे नवीन तंत्रज्ञानावर आधारित बहुमजली कांदाचाळीसाठी शासकीय अनुदान योजनेची गरज आहे. यामध्ये कृषी, पणन, नाबार्ड अशा विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने योजना आखल्यास आधुनिक कांदा चाळ तंत्रज्ञान शेतकऱ्यांमध्ये रुजण्यास मदत होईल, असे मत संशोधकांनी व्यक्त केले.

२००५-०६ मध्ये कांदा साठवणुकीसाठी विविध साठवणूक क्षमतेच्या कांदाचाळी उभारण्यात आल्या होत्या. कांदा चाळींची कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने कांदा लसूण संशोधन संस्थेने संशोधन केले आहे. पारंपारिक कांदा चाळ आणि शीतगृह या दोन्हींमधील साधे सोपे आणि परवडणारे तंत्रज्ञान ठरू शकते. याचा लाभ व्यक्तिगत शेतकरी व शेतकरी कंपन्यांना नक्कीच होईल.
- सुनील पवार (कार्यकारी संचालक, राज्य कृषी पणन मंडळ, पुणे.)

संपर्क : (०२१३५) २२२०२६
डॉ. राजीव काळे, ९५२१६७८५८७.
(कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे.)


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...
खासगीकरणाचा वारू किती उधळणार?सरकारने उद्योगधंद्यात सामील असता कामा नये, अशी...
खानदेशात पपई दराचा पुन्हा तिढाजळगाव : खानदेशात पपईचे पीक बऱ्यापैकी काढणीवर आले...
आंदोलक शेतकऱ्यांचा दिल्लीत तळनवी दिल्ली  : दिल्ली पोलिसांनी परवानगी...
राज्यातील आठ जिल्ह्यांत बिबट्याची दहशतनगर : कोरोनामुळे, त्यानंतर पावसाने अडचणीत आलेल्या...
आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास ३० टक्के...नगर ः आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद...
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...
सोयाबीनचे ३६ लाख क्विंटल बियाणे...पुणे : राज्यातील शेतकरी बाजारातून दहा लाख क्विंटल...
काही ठिकाणी हलक्या सरी पुणे : निवार चक्रिवादळ निवळत असताना जमिनीवरून...
सामाजिक दायीत्वातून जीवनात फुलले ‘...आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि...
सोयाबीन दरात मंदीची शक्यता नाही पुणे ः केंद्र सरकारने गुरुवारी (ता.२७) कच्च्या...
राज्यात १०९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत १४९...
शेतकरी मोर्चावर केंद्राकडून दडपशाही :...नगर : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या...
सव्वा दोन हजार कोटी रब्बीसाठी कर्जवाटप पुणे : रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना १६...
हिंद महासागरात कमी दाबाचे क्षेत्र पुणे:  ‘निवार’ चक्रीवादळ निवळत नाही तोच...
ऐंशी प्रकारचा प्रक्रियायुक्त कोकणमेवासिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहिबाव (ता.देवगड) येथील...
मार्केटिंग, ब्रॅंडिंगद्वारे अळिंबी...बेलखेड (जि. अकोला) येथील विलास व छायाताई या कुयटे...
‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी...औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन...
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढपुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या...