दुसऱ्या मोदीपर्वाला प्रारंभ
दुसऱ्या मोदीपर्वाला प्रारंभ

दुसऱ्या मोदीपर्वाला प्रारंभ

नवी दिल्ली ः भारताच्या राजकारणात गुरुवारी दुसरे ‘मोदी पर्व’ सुरू झाले. देशोदेशींचे प्रमुख आणि चाहत्यांच्या अलोट गर्दीच्या साक्षीने नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता.३१) दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी यांना त्यांना पद आणि गुप्ततेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झालेल्या या भव्य सोहळ्यात मोदींसह ५८ मंत्र्यांनीही शपथ घेतली.  लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) दणदणीत बहुमत मिळविले आहे. या विजयात सिंहाचा वाटा असणारे मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार, हे तेव्हाच स्पष्ट झाले. आज त्यांचा शपथविधी झाला. मोदींबरोबर भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राजनाथसिंह, नितीन गडकरी, डी. व्ही. सदानंद गौडा, निर्मला सीतारामन आणि रामविलास पासवान या ज्येष्ठ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. गडकरी यांच्याव्यतरिक्त महाराष्ट्रातील प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, अरविंद सावंत, संजय धोत्रे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचाही समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला आहे.  मोदी, शहा, राजनाथ सिंह, गडकरी आणि पासवान यांनी हिंदीतून, तर सदानंद गौडा आणि निर्मला सीतारामन यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळातील अरुण जेटली, सुषमा स्वराज, राज्यवर्धनसिंह राठोड आणि मेनका गांधी यांना यंदा वगळण्यात आले आहे.  ५४३ सदस्यांच्या लोकसभेतील ८० जणांचा मंत्रिमंडळात समावेश करता येऊ शकतो. आज पंतप्रधानांसह ५८ सदस्यांनी शपथ घेतली. त्यामुळे विस्तारात अजून २२ जणांचा समावेश मंत्रिमंडळात करता येऊ शकतो. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, ‘यूपीए’च्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गज या सोहळ्यास उपस्थित होते. शपथविधीस ‘बिम्स्टेक’ संघटनेच्या प्रमुखांची उपस्थिती महत्त्वाची ठरली. सुमारे आठ हजार पाहुणे या सोहळ्यास उपस्थित होते. २०१४ मध्ये मोदींनी प्रथम पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती तेव्हा ‘सार्क’च्या नेत्यांसह ३,५०० पाहुणे उपस्थित होते. १९९० मध्ये चंद्रशेखर यांचा आणि १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचा शपथविधी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झाला होता.  ‘बिम्स्टेक’ नेत्यांची उपस्थिती  ‘बिम्स्टेक’ संघटनेतील बांगलादेशाचे अध्यक्ष अब्दुल हमीद, श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, म्यानमारचे अध्यक्ष ऊ विन माईंट, भूतानचे पंतप्रधान लोत्से शेरिंग हे नेते सोहळ्यास उपस्थित होते. थायलंडचे विशेष दूत गिरिसादा बुनार्च हे उपस्थित होते. ‘बिम्स्टेक’मध्ये बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ व भूतान या देशांचा समावेश आहे. किर्गिझस्तानचे अध्यक्ष आणि ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’चे (एससीओ) विद्यमान अध्यक्ष सोरोनबे जिनबेकोव्ह आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण कुमार जगन्नाथही या सोहळ्यास उपस्थित होते. मंत्रिमंडळात ‘जेडीयू’ नाही नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय संयुक्त जनता दलाने (जेडीयू) केला आहे. पक्षाचे प्रवक्ते पवन वर्मा यांनी ही माहिती दिली. मंत्रिपदाच्या संख्येवरून मतभेद झाल्यामुळे ‘जेडीयू’ने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. भाजपने या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद देऊ केल्यावरून आणि मिळणाऱ्या खात्यावरून ‘जेडीयू’ नाराज असल्याचे कळते. ‘जेडीयू’च्या निर्णयावर भाजपने प्रतिक्रिया दिली नाही. नवे केंद्रीय मंत्रिमंडळ १)    नरेंद्र मोदी - पंतप्रधान कॅबिनेट मंत्री २)    राजनाथ सिंह ३)    अमित शहा ४)    नितीन गडकरी ५)    डी. व्ही. सदानंद गौडा ६)    निर्मला सीतारामन ७)    रामविलास पासवान ८)    नरेंद्रसिंह तोमर ९)    रविशंकर प्रसाद १०)    हरसिमरतकौर बादल ११)    थावरचंद गेहलोत १२)    एस. जयशंकर १३)    डॉ. रमेश पोखरियाल निशंक १४)    अर्जुन मुंडा १५)    स्मृती इराणी १६)    डॉ. हर्षवर्धन १७)    प्रकाश जावडेकर १८)    पीयूष गोयल १९)    धर्मेंद्र प्रधान २०)    मुख्तार अब्बास नक्वी २१)    प्रल्हाद जोशी २२)    डॉ. महेंद्रनाथ पांडे २३)    अरविंद सावंत २४)    गिरिराज सिंह २५)    गजेंद्रसिंह शेखावत राज्यमंत्री  (स्वतंत्र कार्यभार) २६)    संतोषकुमार गंगवार २७)    राव इंद्रजितसिंह २८)    श्रीपाद यसो नाईक २९)    जितेंद्र सिंह ३०)    किरण रिजीजू ३१)    प्रल्हाद पटेल ३२)    आर. के. सिंह  ३३)    हरदीपसिंग पुरी ३४)    मनसुख मांडविया राज्यमंत्री ३५)    फग्गनसिंह कुलस्ते ३६)    अश्‍विनीकुमार चौबे ३७)    अर्जुनराम मेघवाल ३८)    जन. (निवृत्त) व्ही. के. सिंह ३९)    कृष्णपाल गुर्जर ४०)    रावसाहेब दानवे ४१)    जी. किशन रेड्डी ४२)    पुरुषोत्तम रूपाला ४३)    रामदास आठवले ४४)    साध्वी निरंजन ज्योती ४५)    बाबुल सुप्रियो ४६)    डॉ. संजीव बालियान ४७)    संजय धोत्रे ४८)    अनुराग ठाकूर ४९)    सुरेशचंद्र बसप्पा अंगडी ५०)    नित्यानंद राय ५१)    रतनलाल कटारिया ५२)    व्ही. मुरलीधरन ५३)    रेणुकासिंह सरुता ५४)    सोम प्रकाश ५५)    रामेश्‍वर तेली ५६)    प्रताप सारंगी ५७)    कैलास चौधरी ५८)    देवश्री चौधरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com