विरोधातील शक्तीला दहशतवादी ठरविण्याची मोदी नीती : पवार

विरोधातील शक्तीला दहशतवादी ठरविण्याची मोदी नीती : पवार
विरोधातील शक्तीला दहशतवादी ठरविण्याची मोदी नीती : पवार

मुंबई ः ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने असलेली शक्ती जेव्हा विरोधात जाते त्या वेळी त्या शक्तीला आतंकवादी ठरविण्याची आणि त्याच्यावर तुटून पडण्याची नीती मोदी वापरत आहेत, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केली. मी विरोधात भूमिका घेतल्याने मोदी माझ्यावर टीका करत आहेत’’, असेही पवार म्हणाले.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या खेतवाडी येथील निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन शरद पवार यांनी केले. या वेळी झालेल्या सभेत बोलताना पवार यांनी मोदींवर कडाडून हल्ला चढवला. गेल्या पाच वर्षांच्या भाजपच्या सत्ताकाळात मोदींची हुकूमशाही पाहायला मिळाल्याचा आरोपही पवार यांनी केला. विकास हेच लक्ष्य सांगणारे मोदी आज हिंदू धोक्यात असल्याचे बोलू लागले आहेत. काँग्रेसने कधीच धर्माच्या नावाखाली हिंदू धर्मावर अन्याय केला नाही. मात्र, आज मोदी ओमर अब्दुल्लांनाही आतंकवादी म्हणत आहेत. एकेकाळी जम्मू-काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्लांच्या पक्षासोबत भाजपची युती होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी यांच्या मंत्रिमंडळात फारुख अब्दुल्ला होते, याची आठवण पवार यांनी करून दिली.

नरेंद्र मोदी सातत्याने नेहरू-गांधी घराण्यांवर हल्ला करत आहेत. त्यांनी देशासाठी काय केले, असे विचारत आहेत. जवाहरलाल नेहरू ११ वर्षे तुरुंगात राहिले. भारतात हुकूमशाही आली नाही; कारण नेहरूंनी दाखवलेला रस्ता चांगला होता. इंदिरा गांधींनी इतिहासच नाही तर भूगोलसुद्धा बदलता येतो हे जगाला दाखवून दिले. राजीव गांधी यांनी संगणक, मोबाईल क्रांती केली, तरीही मोदी नेहरू-गांधी घराण्यांनी काय केले, असे विचारत आहेत. गांधी परिवाराचा आपला देश उत्तरदायित्व आहे, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले. 

मिलिंद देवरा यांनी मुंबईच्या समस्या सोडविण्यासाठी काम केले आहे. त्यांचे मुंबईकरांशी घट्ट नाते जुळलेले आहे. त्यामुळे मतदारांना येथे परिवर्तन घडवून आणण्याची संधी आहे. ही संधी तुम्ही घालवू नका, असे आवाहनही पवार यांनी केले. या वेळी राज्यसभा सदस्य माजीद मेनन, आमदार नसीम खान, अमीन पटेल, राष्ट्रवादीचे मुंबई विभागीय अध्यक्ष सचिन अहिर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com