आता संकल्प फेरमांडणीचा : मोहम्मद युनूस

"कोरोना'ने आपल्याला नव्याने सर्व काही सुरू करण्याची सुवर्णसंधी दिली आहे. "कोरोना'नंतरच्या जगाची मांडणी सामाजिक आणि पर्यावरणीय विवेकावर आधारित होणे आवश्‍यक आहे. सध्याची व्यवस्था सुरळीत करण्याच्या नावावर पुन्हा तीच वाट चोखाळणे आपल्याला परवडणार नाही. आता पुनर्स्थापना नको, तर फेरमांडणी हवी आहे. - मोहम्मद युनूस
आता संकल्प फेरमांडणीचा
आता संकल्प फेरमांडणीचा

"कोरोना'ने आपल्याला नव्याने सर्व काही सुरू करण्याची सुवर्णसंधी दिली आहे. "कोरोना'नंतरच्या जगाची मांडणी सामाजिक आणि पर्यावरणीय विवेकावर आधारित होणे आवश्‍यक आहे. सध्याची व्यवस्था सुरळीत करण्याच्या नावावर पुन्हा तीच वाट चोखाळणे आपल्याला परवडणार नाही. आता पुनर्स्थापना नको, तर फेरमांडणी हवी आहे.

"कोरोना'च्या जागतिक साथीने आपल्याला कधी नव्हे एवढ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु योग्य प्रश्न विचारून आपल्याला पुढील वाटचाल निश्‍चित करावी लागणार आहे. "कोरोना'च्या आधी जसे होते, तसेच जग आपल्याला हवे आहे की जगाची नवी रचना करायची आहे ? हे आपल्याला आणि फक्त आपल्यालाच निश्‍चित करायचे असून, "कोरोना'नंतरचा लढा म्हणजे निव्वळ अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणे एवढाच नाही, हे ध्यानात ठेवले पाहिजे. "कोरोना'आधीच्या जगातही आपल्यापुढे मोठीच आव्हाने होती आणि ही व्यवस्था बदलली नाही तर त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, अशी भीती व्यक्त केली जात होती. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे एक दिवस पृथ्वी मानवाला वास्तव्य करण्यायोग्य राहणार नाही आणि हा दिवस जवळ येऊन ठेपला असल्याचे मानले जात होते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बेरोजगारीचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला होता. श्रीमंती काही मोजक्‍यांकडेच एकवटली होती आणि आहे. मिळकतीमधील तफावतीच्या असमतोलाने धोकादायक पातळी गाठली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याकडे केवळ हेच दशक आहे आणि यानंतर कितीही सुधारणा केल्या, तरीही त्या पृथ्वी वाचवण्यासाठी पुरेशा ठरणार नाहीत, असे सांगितले जायचे. आपल्याला पुन्हा त्याच जगाकडे जायचे आहे काय ? पर्याय आपल्या हाती आहे.

"कोरोना'ने जगातील सारे संदर्भ आणि गणिते बदलून टाकली आहेत. कधी नव्हत्या एवढ्या संधी आपल्याला अचानक उपलब्ध झाल्या आहेत. जणू संपूर्ण पाटीच कोरी झाली आहे. निवडीचे असीम स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झाले असून, कुठल्या दिशेने वाटचाल सुरू करायची हे आता सर्वस्वी आपल्या हाती आहे. रुतलेल्या अर्थचक्राला गती देण्याआधी कुठल्या प्रकारची अर्थव्यवस्था आपल्याला हवी आहे, याबाबत सगळ्यांचे एकमत व्हायला हवे. आपण जी उद्दिष्ट्ये निश्‍चित केली आहेत, ती गाठण्यासाठी अर्थव्यवस्था हे एक साधन आहे हे पक्के लक्षात ठेवायला हवे. कुण्या दैवी शक्तीने आपल्याला शिक्षा देण्यासाठी लावलेला सापळा आहे, असे आता अर्थव्यवस्थेचे वर्तन नको. ही व्यवस्था अखेर आपणच निर्माण केली आहे याचा क्षणभरही विसर पडायला नको. त्यामुळे सगळेच एकत्रितपणे आनंदी होत नाहीत, तोपर्यंत या व्यवस्थेची रचना आणि फेररचना करत राहावी लागेल. आपण उद्दिष्टांपासून भरकटत आहोत असे कुठल्याही टप्प्यावर वाटले, तर व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्या लागतील. कुठल्याही टप्प्यावर "क्षमस्व' म्हणणे हा लंगडा बचाव ठरेल.

पुढ्यात आलेली संधी कर्ब उत्सर्जन शून्यावर आणण्याचे आपले ध्येय असेल, तर त्यासाठी लागणारी सारी व्यवस्था आपल्याला उभी करावी लागेल. बेरोजगारी शून्यावर आणण्यासाठी तेच करावे लागेल. संपत्तीची समान विभागणी हवी असेल, तरीही तेच करावे लागेल. हाती असलेल्या संसाधनांच्या योग्य वापरातून हे ध्येय गाठणे शक्‍य आहे. काही करायचे ठरवले तर अशक्‍य असे काहीच नाही. नव्याने सर्व काही सुरू करण्याची सुवर्णसंधी आपल्याला "कोरोना'ने दिली आहे. "कोरोना'नंतरच्या जगाची मांडणी सामाजिक आणि पर्यावरणीय विवेकावर आधारित होणे आवश्यक आहे. याबाबत एकमताचा साधा जागतिक निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. जेथून आलो तेथे पुन्हा न जाण्याचा निर्धार त्यासाठी करावा लागेल. व्यवस्था सुरळीत करण्याच्या नावावर पुन्हा तीच वाट चोखाळणे आपल्याला परवडणार नाही. आता फेरस्थापना नको, फेरमांडणी हवी आहे.

पुन्हा मागे वळणे नाही याबाबत जागतिक पातळीवरील सहमती साह्यभूत ठरेल. ज्या जगातून आपण इथपर्यंत आलो, तेथे आत पुन्हा जायचे नाही याचा पक्का निर्धार करावा लागणार आहे. या फेरमांडणीत उद्योगांचे स्थान अनन्यसाधारण असेल. सामाजिक आणि पर्यावरणीय विवेकाला निर्णयप्रक्रियेच्या केंद्रस्थानी ठेवूनच या वाटेवर चालावे लागेल. सरकारने कुठल्याही उद्योगाला एका रुपयाचीही मदत न करण्याची हमी द्यायला हवी. सर्व पर्यायांचा विचार करून एखाद्या उद्योगातून परमोच्च असा सामाजिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या फायदा होणार असेल, तरच मदतीचा विचार व्हावा. फेरमांडणीच्या सर्व प्रयत्नांमधून सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय विवेकाची निर्मिती होईल, असाच देशाचा आणि जगाचाही प्रयत्न हवा.

सामाजिक विवेकाने युक्त अशा योजना आणि कृतीला फेरमांडणीत प्राधान्य हवे. आपत्तीच्या काळातच आपल्या सर्व योजना तयार हव्यात. कारण कठीण काळ सरल्यानंतर जुन्या कल्पना आणि जुन्याच उदाहरणांचा महापूर येऊन मदतीचा ओघ त्यांच्याकडे वळण्याचा धोका आहे. हे धोरण जोखलेले नाही, असे सांगून नव्या संकल्पनांना सुरुंग लावण्याचा प्रयत्न होईल. ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाचा सामाजिक उद्यमशीलतेच्या माध्यमातून विचार व्हावा, अशी संकल्पना मांडण्यात आली, तेव्हा त्यालाही अशा प्रकारे विरोध झाला. मात्र, पॅरिसमधील २०२४ चे ऑलिम्पिक हाच विचार मध्यवर्ती ठेवून होणार आहे. त्यामुळे चढाओढ सुरू होण्याच्या आधीच आपली तयारी व्हायला हवी. त्यासाठी ही योग्य वेळ आहे.

सर्वंकष अशा फेरमांडणी आराखड्याच्या केंद्रस्थानी सामाजिक उद्योग हा नवा प्रकार असावा, असा विचार मी मांडत आहे. सामाजिक उद्यमशीलतेचे ध्येय नफा कमावणे नसून, लोकांचे प्रश्न सोडवणे हा असेल. फेरमांडणीत जबाबदारी म्हणून अशा उद्योगांना प्रोत्साहन देणे, त्यांचा प्राधान्यक्रम ठरवणे आणि या उद्योगांसाठी पोषक असे वातावरण निर्माण करण्याची संधी सरकारला आहे. असे उद्योग ज्या क्षेत्रात यायला वेळ लागेल अशा क्षेत्रात सरकारने नियमित योजनांच्या माध्यमातून मदत करावी. सामाजिक उद्योगांच्या प्रसारासाठी सरकार वा कुणी व्यक्तीही सोशल बिझनेस व्हेंचर कॅपिटल फंड तयार करू शकेल. याला खासगी क्षेत्र, प्रतिष्ठाने, वित्तीय संस्था वा गुंतवणूक संस्था यांच्याकडून निधी मिळू शकेल. दुसरीकडे पारंपरिक कंपन्या सामाजिक कंपनीत परावर्तित होतील वा या मार्गावर वाटचाल करतील, अशी व्यवस्था सरकारला करावी लागेल. या कंपन्यांना सामाजिक उद्योगात असलेल्या कंपन्यांशी संयुक्त उपक्रम राबवता येतील. अन्य उद्योगांप्रमाणे सामाजिक उद्योगांना वित्तीय संस्थांकडून पत मिळवता येईल आणि ते स्टॉक एक्‍स्चेंजमध्ये गुंतवणूक करू शकतील, अशी व्यवस्था मध्यवर्ती बॅंकेला करावी लागेल.

सामाजिक उद्यमशीलता

सामाजिक उद्योगांमध्ये गुंतवणूक करणारे कोण असतील ? त्यांना कुठे शोधायचे ? हे गुंतवणूकदार शोधण्याची गरज नाही. ते सर्वत्र आहेत. आत्ता ते दिसत नाहीत, कारण अर्थशास्त्रावरील सध्याच्या पुस्तकांना ते दिसत नाहीत. ग्रामीण बॅंकेच्या यशानंतर सामाजिक उद्योग, सामाजिक उद्यमशीलता, विना नफा काम करणाऱ्या संस्था यावर पुस्तकांमधून थोडीफार चर्चा होऊ लागली आहे. अर्थशास्त्र हे महत्तम नफा कमावण्याचे शास्त्र राहील, तोपर्यंत सामाजिक उद्योगांवर आधारित फेरमांडणीसाठी आपल्याला त्यावर अवलंबून राहता येणार नाही. अशा सामाजिक उद्योगांचा त्यातील वाटा वाढवणे अशी रणनीती हवी. सामाजिक उद्योगांचे यश अर्थव्यवस्थेतील अशा उद्योगांची संख्या वाढल्यानंतर दिसणार आहे. तसेच उद्योजक पारंपरिक आणि सामाजिक अशा दोन्ही प्रकारच्या उद्योगांमध्ये दिसतील, तेव्हाही या उद्योगांचे यश दिसून येईल. यातून सामाजिक आणि पर्यावरणीय विवेकावर आधारित अर्थव्यवस्थेला प्रारंभ झाल्याचे संकेत मिळतील.

असे सामाजिक उद्योग, उद्योजक आणि त्यात गुंतवणूक करणाऱ्यांना सरकार जेवढे प्रोत्साहन देईल, तेवढे अधिक जण त्यात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येतील. समाजाला उपयोगी पडेल अशा उद्योगात काही करण्याची ऐतिहासिक संधी मिळणार असल्याने उद्योजकही मोठ्या संख्येने या विचाराची कास धरतील. सामाजिक उद्योगात असलेले उद्योजक हे छोट्या प्रमाणावर चांगले काम करणाऱ्यांचा गट आहे, या भ्रमात कुणी राहू नये. या जागतिक व्यवस्थेत बहुराष्ट्रीय कंपन्या, मोठे सामाजिक काम करणारी प्रतिष्ठाने, अत्यंत हुशार "सीईओ', कार्पोरेट कंपन्या, फाउंडेशन, ट्रस्ट आहेत. यांना जागतिक आणि स्थानिक स्तरावर सामाजिक उद्योग चालविण्याचा मोठा अनुभव आहे.

अशा सामाजिक उद्योगांच्या संकल्पना आणि अनुभवांना सरकारचे पाठबळ मिळू लागल्यानंतर आता ज्यांची गणना फक्त मोठा नफा कमावणाऱ्यांमध्ये होते, त्यांना या उद्योगात आपसूक यावेसे वाटेल. आपल्या प्रतिभेचा वापर समाजाच्या उपयोगासाठी होऊ शकतो असे वाटून त्यांना या क्षेत्राबाबतचे आकर्षण वाढेल.

या फेररचनेत नागरिक आणि सरकार अशी असलेली पारंपरिक विभागणी मोडून काढावी लागणार आहे. कुटुंबाचे पालनपोषण करणे आणि कर भरणे एवढीच नागरिकांची भूमिका असल्याचे मानले जाते. तर पर्यावरण, नोकऱ्या, आरोग्य सेवा, शिक्षण, पाणी आणि अन्य जबाबदाऱ्या सरकारच्या आणि काही प्रमाणात गैरशासकीय संस्थांच्या असल्याची मान्यता आहे. फेरमांडणीत याही विचाराला तिलांजली द्यावी लागेल. सामाजिक उद्योग स्थापन करून समस्या सोडविण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी नागरिकांनाही पुढे यावे लागणार आहे. एखाद्या उपक्रमाचा आकार नव्हे, तर ती राबविणाऱ्या सर्वसामान्यांची संख्या महत्त्वाची आहे. एखाद्या लहान उपक्रमाचा मोठ्या संख्येने गुणाकार केल्यास ती एखादी मोठी राष्ट्रव्यापी कृती ठरू शकते. अर्थव्यवस्था डळमळीत झाल्यामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीची समस्या हे सामाजिक उद्योग तातडीने निकाली काढू शकतात. बेरोजगारांमधून उत्तम उद्योजक तयार करण्याची संधी यात दडली आहे. मनुष्य हा जन्मजात उद्यमशील आहे, तो नोकरी मिळवण्यासाठी धडपडणारा जीव नाही हे दाखवून देण्याची ही उत्तम संधी आहे. सरकारसोबत हे सामाजिक उद्योग मजबूत अशी आरोग्य यंत्रणा उभी करू शकतात.

सामाजिक उद्योगांमध्ये गुंतवणूक करणारी कुणी एक व्यक्ती असू शकत नाही. वित्तीय संस्था, फाउंडेशन, ट्रस्ट, व्यवस्थापकीय संस्था यामार्फत अशा उद्योगांमध्ये गुंतवणूक होऊ शकते. अशा पद्धतीचे काम करण्याचा काही अनुभव या संस्थांनाही आहे. "कोरोना नंतरच्या काळात सरकारने घेतलेल्या एका योग्य निर्णयाने या क्षेत्रात कधी नव्हती एवढी वर्दळ दिसू शकते. अज्ञात अशी वाट चोखाळताना युवक, मध्यमवयीन, ज्येष्ठ यांच्या साथीने जगाची नवरचना कशी केली जाऊ शकते, हे दाखविण्याची संधी यानिमित्ताने नेतृत्वाला मिळाली आहे. अशी फेररचना करण्यात आपण अपयशी ठरलो, तर मात्र "कोरोना'मुळे होणार नाही त्यापेक्षा अधिक नुकसान होणार आहे. कोरोनाच्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी आपण आपल्या घरात लपून बसू शकतो. पण आपण दिवसागणिक उग्र होत जाणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक केली नाही, तर निसर्ग आणि जगभरातील संतप्त जमावाच्या समूहांपासून आपली सुटका नाही.

( लेखक बांगला देशातील ग्रामीण बॅंक चळवळीचे प्रवर्तक आणि ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com