‘एफआरपी’साठी सोमवारी साखर आयुक्तांबरोबर चर्चा

एकरकमी एफआरपीसाठी बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या पाचव्या दिवशी (गुरुवारी) प्रशासनाबरोबर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
Monday for FRP Discussion with Sugar Commissioner
Monday for FRP Discussion with Sugar Commissioner

कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी एफआरपीसाठी बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या पाचव्या दिवशी (गुरुवारी) प्रशासनाबरोबर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये तोडग्यासाठी साखर आयुक्तांबरोबर सोमवारी (ता. १५) बैठक घेण्याचे या वेळी ठरवण्यात आले. दरम्यान, कऱ्हाडचे नेते दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देतात. मात्र त्यांच्या भूमीत चाललेल्या आंदोलनाकडे ते पहात नाहीत हे दुर्दैवच आहे, अशी खंत बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी व्यक्त केली.  बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांची आज उपप्रादेशिक साखर संचालक संजय गोंधळी, साखर लेखा परीक्षक डी. एन. पवार, प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.  बैठकीची माहिती देताना पाटील म्हणाले, ‘‘बैठकीत आम्ही केलेल्या मागण्या अधिकाऱ्यांनी ऐकल्या मात्र जबाबदारी घेतली नाही. त्यासाठी आता साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याबरोबर सोमवारी बैठक आयोजित करण्याचे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यासाठी जबाबदार अधिकारी, साखर कारखान्यांचे अध्यक्ष किंवा कार्यकारी संचालक उपस्थित राहतील. त्यामध्ये तोडगा निघेल, अशी आशा आहे. कऱ्हाडला झालेल्या आंदोलनानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी बैठकीसाठी वेळ दिली होती. त्यामुळे एकरकमी एफआरपीसाठी आम्हाला आंदोलन करायची वेळ आणून देऊ नका, असेही आम्ही प्रशासनाला सांगितले आहे.’’  बी. जी. पाटील म्हणाले, ‘‘साखर सहसंचालकांना आम्ही विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देता आली नाहीत. शेतकऱ्यांनी हक्काचे पैसे मागायला आंदोलन करायला लागते ही शोकांतिका आहे. कारखानदारांना सळो की पळो करून सोडू.  कारखानदारांनी तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा.’’

सांगलीत ‘स्वाभिमानी’ आक्रमक सांगली ः सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्यासाठी भूमिका घेतली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. गुरुवारी (ता. ११) रात्री ऊस वाहतूक करणाऱ्या कारखान्यांचे ट्रॅक्टर पेटवले असून, एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन हिंसक वळणावर पोहोचले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी मिळावी, अशी मागणी केली आहे. या मागणीला कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी प्रतिसाद दिला. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील दत्त इंडिया आणि दालमिया या दोन कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. तर अन्य दोन कारखाने जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. १५ ते २५ वर्षे सुरू असलेले कारखाने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करत आहेत. मात्र राजारामबापू, क्रांती आणि विश्‍वास कारखाने काहीच भूमिका घ्यायला तयार नाहीत.  त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवले जात आहेत. शेतकऱ्यांचा अंत न बघता तत्काळ एकरकमी एफआरपी जाहीर करावी, अन्यथा तीव्र करावे लागेल, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे. 

आंदोलनाची धग वाढली राजारामबापू कारखान्याचे सर्वेसर्वा पालकमंत्री जयंत पाटील आहेत. क्रांती कारखान्याचे आमदार अरुण लाड तर विश्‍वास कारखान्याचे आमदार मानसिंग नाईक अध्यक्ष आहेत. राजारामबापू कारखान्याचा ट्रॅक्टर वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथे पेटविण्यात आला. क्रांती कारखान्याचा ट्रॅक्टर कडेगाव तालुक्यात बळवडी फाटा येथे गुरुवारी रात्री उशिरा पेटविण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com