खात्यात पैसे जमा झाले, अन् लगेच परतही गेले

अजूनही याद्यांची तपासणी सुरू आहे. काही प्रतिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना पैसे वर्ग केले आहेत. सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळतील. पैसे परत गेल्याची आमच्याकडे अजून तक्रार नाही, मात्र आम्हीही चर्चा एकत आहोत. पैसे परत जाण्यात काही तांत्रिक चुका असाव्यात. आम्हीही असे किती प्रकार घडले याची बॅंकांकडून माहिती घेत आहोत. - प्रशांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी, नगर
पीएम किसान योजना
पीएम किसान योजना

पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत जमा करण्यात आलेली दोन हजार रुपयांची रक्‍कम बॅंक खात्यातून काढून घेण्यात आल्याचा धक्‍कादायक प्रकार नांदेड पाठोपाठ परभणी, हिंगोली, नागपूर, नाशिक आणि नगर जिल्ह्यांत समोर आला आहे. परभणी जिल्ह्यातील ४५ आणि हिंगोली जिल्ह्यातील ५३० शेतकऱ्यांच्या खात्यातील पैसे परत घेण्यात आले.   शेतकऱ्यांनीदेखील याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त करीत ही केवळ बनवाबनवी असल्याचा आरोप केला आहे.

केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून ही योजना अमलात आणल्याने बॅंकेच्या खात्यात पैसे जमा होताच शेतकऱ्यांना आवर्जून पैसे जमा झाल्याचे संदेश बॅंकेच्या सर्व्हर मार्फत मिळाले. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही शेतकऱ्यांचे सन्मानासह शेतीच्या गरजांसाठी पैशांचा वापर करण्याचे आवाहन करणारे संदेशही आले. त्यानुसार शेतकऱ्यांनी बॅंकेकडे धाव घेऊन पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळातच जमा झालेली रक्कम पुन्हा माधारी गेल्याचे दिसून आले. 

नॅशनल पेमेंट काॅर्पोशन कडून जिल्हा बॅंकेला परभणी जिल्ह्यतील ४५ आणि हिंगोली जिल्ह्यातील ५३० असे एकूण ५७५ शेतकऱ्यांच्या खात्यावरील प्रत्येकी २ हजार रुपये याप्रमाणे एकूण ११ लाख ५० हजार रुपये परत करण्यात यावेत असे निर्देश ई मेलव्दारे आले. त्यानुसार रक्कम परत केली असल्याचे जिल्हा बॅकेच्या सुत्रांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्‍यातील लोहारी सावंगा येथील भगवान काटोले या युवा शेतकऱ्याची दोन एकर जमीन आहे. भगवान काटोले यांच्याही खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा झाला. परंतू काही वेळातच ‘पीएम किसान इन्स्टॉलमेंट-१ फॉर २००० क्रेडिडेट टू युवर अकाउंट नंबर ५५२७ ऑन २४/२/२०१९ हॅज रिव्हर्सड ॲज इन्स्ट्रकटेड बाय अथॉरीटीज,’ असा मॅसेज त्यांना आला. हा मॅसेज वाचून भगवान काटोले यांना आश्‍चर्याचा धक्‍काच बसला. त्यांनी आपले खाते चेक केले असता त्यात कोणतीही रक्‍कम जमा झालेली नव्हती. यामुळे भगवान काटोले गोंधळून गेले. याप्रकरणी स्थानिक महसूल विभागाकडून माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगर तालुक्यातील वाळुंज येथील एका शेतकऱ्याच्या बाबत हा प्रकार घडला आहे. बॅंकेत पैसे काढण्यासाठी गेले तेव्हा ही गोष्ट समोर आली. शेवटपर्यंत पैसे माघारी जाण्याचे कारण शेतकऱ्यांना समजत नाही. प्रशासनालाही नेमक्या किती शेतकऱ्यांचे पैसे परत गेले याची माहिती नाही.

प्रतिक्रिया एक तर महिन्याला पाचशे देऊन चेष्ठा केलीय. त्यात आलेले पैसे परत जात आहेत. नांदेडमध्येही लोकांनी परत द्यायला सांगितले. म्हणजे सरकार शेतकऱ्यांचा सन्मान करतेय की अपमान हेच कळत नाही. शेतकऱ्यांची किती हेळसांड करणार हा प्रश्न आहे. - बच्चू मोढवे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना युवक आघाडी, नगर 

माझ्या खात्यात किसान सन्मान योजनेचा पहिला हप्ता जमा झाला. काही वेळातच ती रक्‍कम मागे घेण्यात आल्याचाही मॅसेज आला. त्यामुळे हा काय प्रकार आहे, हे मलाही कळाले नाही. प्रशासनाने हा गोंधळ दूर करण्याची गरज आहे.  - भगवान काटोले, शेतकरी, सावंगा, ता. नरखेड, जि. नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com