कोकण, मध्य महाराष्ट्रात मॉन्सून सक्रिय

कोकण, मध्य महाराष्ट्रात मॉन्सून सक्रिय
कोकण, मध्य महाराष्ट्रात मॉन्सून सक्रिय

पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे; तर नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार हजेरी लावल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आज (ता. ८) कोकणात मुसळधारेचा अंदाज आहे; तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. ६) राजस्थान, पंजाब, हरियाना राज्यांचा काही भाग वगळता देश व्यापला आहे. रविवारी मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’ आहे. मंगळवारपर्यंत (ता. ९) मॉन्सून देशाच्या आणखी काही भागांत दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर रविवारी सकाळपर्यंत कायम होता. विदर्भ, मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. रविवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये माथेरान येथे सर्वाधिक २१० मिलिमीटर, घटमाथ्यावरील शिरगाव येथे २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, गुहागर तालुक्याला शनिवारी (ता.६) मुसळधार पावसाने तडाखा दिला. रात्रभर पडणाऱ्या पावसाने रविवारी काहीशी विश्रांती घेतली. जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर कमी आहे; मात्र वेगवान वारे वाहत असून, समुद्र खवळलेला आहे. वाशिष्ठी, जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागातील तालुके आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दोन दिवसांपासून जोर धरला आहे. धरणांना पाणीपुरवठा करणारे झरे, ओढेनाले, नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत रविवारी पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे सूर्याचे दर्शन झालेले नाही. शनिवारी मध्यरात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. नगर जिल्ह्याच्या पश्चिम भागातही पावसाने जोर धरला; तर कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने जोर धरल्याने पंचगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. रविवारी (ता.७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत ः हवामान विभाग) :

  • कोकण : माथेरान २१०, दोडमार्ग १४०, उल्हासनगर, वसई प्रत्येकी १३०, पेन, कर्जत प्रत्येकी १२०, अंबरनाथ, भिंवडी, पनवेल, खालापूर प्रत्येकी ११०, भिरा १००, कल्याण, मंडणगड, सधागड, शहापूर, खेड, जव्हार प्रत्येकी ९०, वाल्पोई, मुरबाड, सांताक्रूझ प्रत्येकी ८०, विक्रमगड, माणगाव, तळा, मोखेडा, कणकवली, डहाणू, रोहा प्रत्येकी ७०, ठाणे, दापोली, पोलादपूर, वाकवली, मुलदे, लांजा प्रत्येकी ६०.
  • मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर ११०, लोणावळा, इगतपुरी ९०, पौड, चंदगड प्रत्येकी ८०, आजरा, गगनबावडा, पन्हाळा, वेल्हे, तळोदा, राधानगरी प्रत्येकी ७०, हर्सुल, नंदुरबार, ओझरखेडा प्रत्येकी ६०, पाटण, शाहूवाडी, आंबेगाव प्रत्येकी ५०, गारगोटी, दिंडोरी प्रत्यकी ४०, जावळी, अक्कलकुवा, जुन्नर, नाशिक, शहादा, नवापूर, अक्रणी, खेड, वडगाव मावळ प्रत्येकी ३०.
  • मराठवाडा : सिल्लोड ४०, माहूर, भोकरदन प्रत्येकी २०, फुलांब्री, जाफराबाद, सेनगाव प्रत्येकी १०.
  • विदर्भ : आहेरी ५०, एटापल्ली, भामरागड प्रत्येकी ३०, सावळी, धानोरा, बल्लारपूर, मुलचेरा, धारणी, पातूर, गोंडापिंपरी, चामोर्शी, चिखलदरा, गडचिरोली, सिरोंचा कोर्ची प्रत्येकी २०.
  • घाटमाथा : शिरगाव २००, आंबोणे १८०, दवडी १७०, डुंगरवाडी, ताम्हिणी प्रत्येकी १५०, लोणावळा ठाकूरवाडी, वाणगाव, भिवापुरी, कोयना पोफळी प्रत्येकी ९०, वानगाव, शिरोटा प्रत्येकी ७०.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com