माॅन्सून गुरुवारी कोकणात, पण...

माॅन्सून गुरुवारी कोकणात, पण...
माॅन्सून गुरुवारी कोकणात, पण...

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) प्रवाह सध्या कमजोर आहेत. यातच अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे मॉन्सून वेगाने प्रगती करत १३ जूनपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल होणार आहे. मॉन्सूनच्या राज्यातील आगमनात एक दिवसाची तफावत शक्य आहे. मात्र विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मॉन्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली. अरबी समुद्रात आलेल्या कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन त्याचे वादळात रुपांतर होण्याचे संकेत आहेत. या प्रणालीच्या प्रभावामुळे मॉन्सून खेचला जाऊन तो वेगाने चाल करणार आहे. दक्षिण महाराष्ट्राला धडक दिल्यानंतर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागात मॉन्सूनची चाल शक्य आहे. मात्र कमी दाब प्रणाली उत्तरेकडे सरकरून गेल्यानंतर मॉन्सूनचे प्रवाह आणखी कमजोर होऊन राज्याच्या उर्वरित भागातील वाटचाल मंदावणार आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मॉन्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता आहे. उत्तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही मॉन्सून उशिराने दाखल होणार असल्याचे डॉ. कश्यपी यांनी सांगितले. मॉन्सून दाखल होण्यापूर्वी पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात पाऊस पडणार आहे. यातच मॉन्सून हंगामात राज्यात यंदा सर्वसामान्य पावसाचा अंदाज असली तरी, मराठवाडा आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात पाणी साठवणुकीच्या उपाययोजनांवर अधिक भर द्यावा लागणार असल्याचे डॉ. कश्यपी यांनी सांगितले. मॉन्सूनची आज प्रगती शक्य नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) शनिवारी (ता. ८) केरळ, तमिळनाडू राज्यांच्या दक्षिण भागात आगमन झाले. केरळमध्ये आठवडाभर उशिराने पोचणाऱ्या वाऱ्यांनी केरळमधील कोची तर तमिळनाडूतील मदुराईपर्यंतची मजल मारली आहे. आज (ता. १०) संपूर्ण केरळ, तमिळनाडूच्या आणखी काही भागात मॉन्सूनची प्रगती शक्य आहे. तसेच ईशान्य भारतातील राज्यांमध्ये आज मॉन्सून धडकण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत लक्षद्वीप बेटे आणि लगतच्या अरबी समुद्रात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मंगळवारपर्यंत अरबी समुद्रात अतितीव्र कमी दाब क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही प्रणाली उत्तरकडे सरकून अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत.

कोकणात उद्यापासून वाढणार जोर अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे केरळ, लक्षद्वीप, कनार्टक, कोकण, गोव्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडणार असून, सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. उद्यापासून (ता. ११) कोकणात जोरदार पावसाची शक्यता असून, किनाऱ्यावर ताशी ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज आहे, तर विदर्भात उष्ण लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com