मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत केरळात

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत (ता.१) केरळमध्ये दाखल होण्यास पोषक स्थिती असल्याचे भारतीय हवामान विभागाने गुरूवारी (ता.२८) जाहीर केले आहे.
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत केरळात
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत केरळात

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत (ता.१) केरळमध्ये दाखल होण्यास पोषक स्थिती असल्याचे भारतीय हवामान विभागाने गुरूवारी (ता.२८) जाहीर केले आहे. मॉन्सूनने अंदमान, निकोबार बेट समूहाच्या सर्व भागात मजल मारली आहे. तर अरबी समुद्रातील मालदीव आणि कोमोरीनच्या काही भागासह, श्रीलंकेच्या दक्षिण भागातही मॉन्सूनचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.  यंदा मॉन्सून सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस उशिराने म्हणजेच पाच जून रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. यात चार दिवसांची मागे पुढे तफावतही गृहीत धरण्यात आली होती. मात्र पूर्व-मध्य अरबी समुद्रात रविवारपर्यंत (ता.३१) नवीन कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे कमी दाब क्षेत्र उत्तरेकडे सरकत जाताना अधिक तीव्र होणार आहे. या प्रणालीमुळे मॉन्सून वारे खेचून आणण्यास पोषक स्थिती तयार होत असल्याने १ जून रोजी मॉन्सून केरळात दाखल होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे १७ मे रोजी मॉन्सून अंदमान, निकोबार बेटांवर दाखल झाला होता. मात्र हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर तब्बल दहा दिवस दक्षिण दक्षिण अंदमानातच मॉन्सून अडखळला. बुधवारी (ता.२७) मॉन्सूनची वाटचाल पुन्हा सुरू झाली. त्यानंतर गुरूवारी (ता.२८) दुसऱ्याच दिवशी मॉन्सूनने संपूर्ण अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात धडक दिली. तर भारताच्या दक्षिणेकडे असलेल्या मालदीव आणि कोमोरीन भागातही मॉन्सून वारे दाखल झाले आहेत. उद्यापर्यंत (ता.३०) मालदीव कोमोरीन बेटांच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. कमी दाबाचे क्षेत्र होतेय तीव्र अरबी समुद्राच्या पश्‍चिम-मध्य भागात गुरूवारी (ता.२८) हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. शनिवारपर्यंत (ता.३०) हे कमीदाब क्षेत्र अधिक तीव्र होणार आहे. रविवारपर्यंत (ता.३१) ही प्रणाली दक्षिण ओमान, आणि पूर्व येमेनच्या किनाऱ्याकडे सरकून जमिनीवर जाणार आहे. त्याचवेळी अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com