राज्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रिय 

राज्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रिय झाल्याने अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी पडत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिकमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
monsoon rain active in state
monsoon rain active in state

पुणे : राज्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रिय झाल्याने अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी पडत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिकमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर मराठवाड्यातही पावसाची रिपरीप सुरूच आहे. कोकणातही पावसाला सुरुवात झाली आहे, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी पडल्या. या पावसामुळे नद्या, नाले वाहते झाले असून, धरणांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. या पावसाने पेरणी झालेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. 

धुळे जिल्ह्यातील नंदाळे बुद्रुक (ता. धुळे) येथे रविवारी (ता. २८) पहाटे साडेतीनच्या सुमारास ढगफुटीसदृश अतिवृष्टी झाली. यामुळे साप नाल्याला मोठा पूर आला व पुराचे पाणी गावात शिरले. तसेच गावातील सुमारे दीडशे एकर शेती शिवारातही पाणी शिरल्याने पिकांसह शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले. याचा ८० ते ९० शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, पावसामुळे पाच घरांची पडझड झाली. तब्बल दीड ते दोन तास झालेल्या या अतिवृष्टीमुळे गाव परिसरातील ब्रिटिशकालीन तलाव ओसंडून वाहिला.  बोरी धरणातून पाण्याचा विसर्ग  जळगाव जिल्ह्यातील बोरी धरणातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने बोरी धरण ८३ टक्के भरले. त्यामुळे धरणातून रविवारी (ता. २८) अडीचच्या सुमारास धरणाचे दोन दरवाजे ०.१५ मीटरने उघडून ९०३ क्‍युसेक पाणी नदीपात्रात सोडले आहे. धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठ्यात वाढ झाल्याने तहसीलदार अनिल गवांदे यांनी धरणस्थळी भेट दिली. बोरीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

नाशिकच्या पूर्व भागात दमदार पाऊस  नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात प्रामुख्याने नांदगाव व मालेगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याचे दिसून आले. तर येवल्याच्या पूर्व भागातही रविवारी (ता. २८) काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मालेगाव तालुक्याच्या शहर परिसरसह पूर्व भागात झोडगे व निमगाव, पश्चिम भागात कौळाणे, सायने, दाभाडी परिसरातील गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. नांदगाव तालुक्यातील शहर परिसरसह सर्वदूर जोरदार पाऊस झाला. पूर्व भागात साकोरे, मूळडोंगरी, चांदोरे, नाग्यासाक्या धरण व हिंगणवाडी परिसरात शेतांमधून पाणी साचून वाहिले. येवला तालुक्याच्या पूर्व भागात दोन पाऊस दमदार झाले आहेत. अंदरसूल मंडळात पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली. 

मराठवाड्यात पावसाची हजेरी  मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील ६८ मंडळांत सोमवारी (ता.२९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली. नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचा जोर कमी राहिला. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, हदगाव, माहूर, किनवट, हिमायतनगर, भोकर, मुखेड, लोहा या ९ तालुक्यांतील २६ मंडळामध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. अन्य तालुक्यात उघडीप होती. परभणी जिल्ह्यातील २८ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. सेलू तालुक्यातील देऊळगाव मंडळात अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यातील १४ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. 

पुणे जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात पाऊस  पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात चांगलाच जोरदार पाऊस पडत आहे. प्रामुख्याने पूर्व पट्ट्यातील शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. सोमवारी (ता.२९) सकाळी आठ वाजपर्यंत पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात जोरदार पाऊस झाला. इंदापूर येथे सर्वाधिक ८२.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पश्चिम भागातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यात पावसाचा जोर कमी आहे. उत्तरेकडील जुन्रर, आंबेगाव, खेड तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस आहे. इंदापूर, बारामती, दौड भागात जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचले असून ओढ्यांनाही पाणी वाहू लागले आहे. 

सोमवारी (ता.२९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :  कोकण : कुलाबा ३३, सांताक्रूझ ३९, मोखेडा ३५, अलिबाग ५४, माथेरान ४७, मुरुड ३०, तळा ३३, लांजा ६०, देवगड ४६, कणकवली ४५, मालवण ५३, रामेश्वर ४२, सावंतवाडी ५५, वेंगुर्ला १०२.  मध्य महाराष्ट्र : अमळनेर ५९, चोपडा ५९, गगनबावडा ५५, नांदगाव ४३, इंदापूर ८५, माण ३९, बार्शी ३४, माढा ८३, माळशिरस ६२, पंढरपूर ४०.  मराठवाडा : गंगापूर ९५, कन्नड ४८, फुलंब्री ३८, सिल्लोड ३८, आष्टी ३४, पाटोदा ३५, चाकूर ३१, देवणी ४३, रेणापूर ४०, हदगाव ४०.  विदर्भ : नांदगाव काझी २२, लाखंदूर २२, देऊळगाव राजा २१, लोणार ३०, सिंदखेडा ३१, आमगाव २०, गोरेगाव २२, मंगरूळ पीर २३, रिसोड २२, मालेगाव ३५.  कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता  राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. अरबी समुद्रासह राज्यात ढगांची दाटी झाली आहे. आज (ता. ३०) राज्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com