केरळ, तमिळनाडूत मॉन्सूनची धडक

केरळ, तमिळनाडूत मॉन्सूनची धडक
केरळ, तमिळनाडूत मॉन्सूनची धडक

पुणे: संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) शनिवारी (ता. ८) केरळ, तमिळनाडू राज्याच्या दक्षिण भागात आगमन झाले. साधारणत: १ जून रोजी केरळात येणाऱ्या मॉन्सून यंदा तब्बल आठवडाभर उशिराने दाखल झाला आहे.   वाऱ्यांनी केरळमधील कोची तर तमिळनाडूतील मदुराईपर्यंतची मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. सोमवारपर्यंत (ता. १०) संपूर्ण केरळ, तमिळनाडूच्या आणखी काही भागांत मॉन्सूनची प्रगती शक्य आहे. केरळात यंदा उशिराने दाखल झालेला मॉन्सून महाराष्ट्रात येण्याची उत्सुकता वाढली आहे. बुधवारी (ता. ५) वाऱ्यांनी श्रीलंकेतील कोलंबोच्या उत्तरेकडे असलेल्या कातूनायके शहरापर्यंत टप्पा पार करून जवळपास निम्मा श्रीलंका देश, अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत वाऱ्यांनी प्रगती केली होती. त्यानंतर शनिवारी (ता. ८) मॉन्सूनने श्रीलंकेचा संपूर्ण भूभाग केरळ, तमिळनाडूचा दक्षिणेकडील भाग, लक्षद्वीप बेटे, अरबी समुद्राचा काही भागांपर्यंत मजल मारली आहे.  केरळ, लक्षद्वीप परिसरात तीन दिवसांपासून होत असलेला पाऊस, पश्चिमेकडून २० नॉट्स वेगाने वाहणारे वारे, समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत पश्चिम आणि नैर्ऋत्य दिशेकडून वाहणारे वाऱ्यांचे प्रवाह, तीन जूनपासून वातावरणात परावर्तित होत असलेला किरणोत्सर्ग आणि दक्षिण महाराष्ट्रापासून केरळ किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा या पोषक स्थितीमुळे मॉन्सून केरळात दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सोमवारपर्यंत (ता. १०) दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे आणि केरळच्या उर्वरित भागात, तमिळनाडू आणि बंगालचा उपसागर आणि मध्य अरबीसमुद्राच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्यासाठी पोषक हवामान आहे. तसेच ईशान्य भारतातील राज्यांमध्ये सोमवारपर्यंत मॉन्सून पोचणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  अरबी समुद्रात कमी दाबाचे संकेत लक्षद्वीप बेटे आणि लगतच्या अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही स्थिती पोषक ठरल्याने सोमवारपर्यंत (ता. १०) कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. उत्तरकडे सरकत जाताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर प्रभाव पडणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com