महाराष्ट्रातील मॉन्सून दोन दिवस लांबणीवर

हवामान
हवामान

पुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेले ‘वायू’ चक्रीवादळ अतितीव्र झाले आहे. ताशी १५० ते १७० किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणारी ही प्रणाली ताशी ११ किलोमीटर वेगाने गुजरातकडे सरकत आहे. या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पाडणार असून, गुजरातच्या किनाऱ्याला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. या तीव्र चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) प्रवाहांवर परिणाम झाल्याने महाराष्ट्रातील मॉन्सूनचे आगमन दोन दिवस लांबणार आहे. तर वातावरणातील बाष्प ओढून घेतल्याने विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट येणार आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.    वायू चक्रीवादळ मंगळवारी ताशी १५ किलोमीटर वेगाने उत्तरेकडे सकरत होते. मात्र बुधवारी त्याचा उत्तरेकडे सकरण्याचा वेग कमी होऊन ११ किलोमीटर झाला आहे. त्यामुळे ही प्रणाली अधिक काळ समुद्रात राहणार असल्याने तीव्रता वाढत आहे. वादळामुळे ताशी १५० ते १७० किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहत असून, वाऱ्यांचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे वादळ आज (ता. १३) सकाळी गुजरातच्या पोरबंदर आणि दीवजवळ किनाऱ्याला धडकणार असून, या भागात जोरदार वाऱ्यासह २०० मिलिमीटरपर्यंत पाऊस होण्याची शक्यता असल्याने रेड अलर्ट देण्यात आला आहे. चक्रीवादळ मुंबईच्या पश्चिमेला २९० किलोमीटर समुद्रात असले तरी त्याचा कोकण किनारपट्टीवर प्रभाव जाणवत आहे. किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली आहे. समुद्रही खवळला असून, उंच लाट उसळत आहेत. दोन दिवस जोरदार वाऱ्यासह तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. वादळ उत्तरेकडे गेल्याने आजपासून उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढले. तर मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडेल. वादळाची तीव्रता अधिक असल्याने मराठवाडा, तेलंगणासह दक्षिण भारतातील बाष्प ओढून घेतले आहे. हवेतील बाष्प कमी झाल्याने मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट येणार आहे.  शुक्रवारनंतर प्रगती शक्य   राज्यात कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत (ता. १३) मॉन्सून पोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र वायू चक्रीवादळ प्रभावामुळे मॉन्सूनचा प्रवाह कमी झाला आहे. चक्रीवादळ निवळून, पुन्हा प्रवाह वाढण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे शुक्रवारनंतर (ता. १४) मॉन्सूनची प्रगती होणार असून, त्यानंतर राज्यात आगमन होण्याची शक्यता असल्याचे डॉ. कश्यपी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com