मॉन्सूनचा यंदा सर्वाधिक लांबलेला मुक्काम; राज्यात अजून १५ दिवस ठिय्या

माॅन्सून
माॅन्सून

पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) अद्याप राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केलेला नाही. यंदा उशिरा आगमन झालेल्या मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्यास उशीर होणार आहे. यंदा १० ऑक्टोबर रोजी मॉन्सून राजस्थानमधून माघारी फिरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आतापर्यंतचा हा मॉन्सूनचा सर्वात उशिराने सुरू झालेल्या परतीचा प्रवास ठरणार आहे. यापूर्वी १९६१ मध्ये १ ऑक्टोबर रोजी मॉन्सून सर्वांत उशिराने राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला निघाला होता.    यंदा मॉन्सूनने आगमन, पावसाचे प्रमाण, परतीची सुरवात या सर्वच बाबतीतील विक्रम मोडले आहेत. यंदाचा मॉन्सून हंगामात २५ वर्षांनंतर सर्वाधिक ११० टक्के पडला. त्याआधी केरळमध्ये आठ दिवस उशिराने आगमन झाल्यानंतर आठ दिवस उशिराने देश व्यापला. देशातील मुक्काम सर्वसाधारण वेळेच्या जवळपास सव्वा महिने अधिक काळ लांबला असल्याचे दिसून आले आहे. दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार मॉन्सून १ सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थामधून परतीचा प्रवासाला निघतो. तर साधारणत: १ ऑक्टोबर रोजी कोकणाचा बहुतांशी भाग, मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागातून मॉन्सून परतत असतो. तर १५ ऑक्टोबरच्या आसपास मॉन्सून देशाचा निरोप घेतो. त्यानंतर दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून (ईशान्य मॉन्सून) साधारणत: १५ डिसेंबरपर्यंत पाऊस पडतो.   मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाची घोषणा करण्यासाठी सलग पाच दिवस पावसाची उघडीप असणे, हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होणे, हवेचा खालच्या थरात केंद्रभागी दाब अधिक असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती (ॲण्टी सायक्लोनिक सर्क्युलेशन) निर्माण होणे आवश्यक असते. त्यानुसार यापूर्वी १ ऑक्टोबर १९६१ मध्ये सर्वांत उशिराने माघारी फिरला होता. त्यांनतर २००७ मध्ये ३० सप्टेंबर रोजी राजस्थानातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. यंदा या दोन्ही वेळा चुकवून मॉन्सून सर्वांत उशीरा १० ऑक्टोबर रोजी मुक्काम हलविणार आहे. तर महाराष्ट्रातून १५ ते २० ऑक्टोबर या कालवधीत मॉन्सून माघारी फिरण्याचे संकेत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहेत.  मॉन्सूनची वाटचाल सुरवातीपासून अडखळत झाली. १८ मे रोजी अंदमानात पोचलेल्या मॉन्सूनचा पुढील प्रवास लांबला. देवभूमी केरळात तब्बल आठवडाभर उशिराने ८ जून रोजी मॉन्सून दाखल झाला. अरबी समुद्रात तयार झालेल्या अतितीव्र ‘वायू’ चक्रीवादळाने मॉन्सूनची वाटचाल रोखून धरली. त्यामुळे वाऱ्याचा वेग मंदावलाच, तसेच बाष्प ओढून नेल्याने पाऊसही लांबला. साधारणत: ७ जूनपर्यंत तळ कोकणात पोचणारा मॉन्सून, १९७२ नंतर प्रथमच २० जून रोजी तळकोकणात पोचला. तसेच २५ जून रोजी वाऱ्यांनी राज्य व्यापले. त्यांनतर मजल दरमजल करत दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या पाच दिवस उशिराने म्हणजेच १९ जुलै रोजी मॉन्सूनने देश व्यापला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com