हिवरेबाजारमध्ये ‘ग्रामविकासाचे स्मारक’

राज्याला आणि देशात लोकसहभागातून ग्रामविकासातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार येथे पोपटराव पवार यांच्या संकल्पनेतून ‘ग्रामविकासाची संकल्पना विषद करणारे आदर्श स्मारक उभारले जात आहे.
'Monument of Rural Development' in Hivrebazar
'Monument of Rural Development' in Hivrebazar

नगर ः राज्याला आणि देशात लोकसहभागातून ग्रामविकासातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार येथे पोपटराव पवार यांच्या संकल्पनेतून ‘ग्रामविकासाची संकल्पना विषद करणारे आदर्श स्मारक उभारले जात आहे.  गावांत प्रवेश करतानाच हे देखणे स्मारक नजरेस पडेल आणि सर्वांत पहिल्यांदा ते येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे स्वागतही करेल. या स्मारकाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. राज्यात पहिल्यांदाच ग्रामविकासाची संकल्पना सांगणारे, असे स्मारक उभारले जात आहे. आदर्श गाव हिवरेबाजारने पोपटराव पवार यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग तीस-बत्तीस वर्षांच्या लोकसहभागातील श्रमातून आणि अथक प्रयत्नातून जलसंधारणासह इतर सामाजिक कामांत देशात नावलौकीक मिळवला. दुष्काळी परिसर असलेल्या हिवरेबाजारमध्ये लोकसहभागातून झालेल्या जलसंधारण कामांमुळे पाणीपातळी कशी वाढते हे देशाला दाखवून दिले. या शिवाय, चराई बंदी, कुऱ्हाड बंदी, नशा बंदी, वृक्षतोड बंदी यासह अन्य उपक्रम राबवत गावाच्या एकोप्याचा सलग तीस वर्षे आदर्श निर्माण केला आहे. देशभरातील लाखो लोकांनी हिवरेबाजारला भेट दिली. हिवरेबाजार गावांला लोकसहभागातून झालेल्या कामांचा सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडून गौरव झाला आणि नुकताच पोपटराव पवार यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन राष्ट्रपतींनी गौरव केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हिवरेबाजारच्या ग्रामविकासाचे कौतुक केले. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही हिवरे बाजार, राळेगणसिद्धीला भेट दिली. 

असे असेल ‘ग्रामविकास स्मारक’ हिवरेबाजार गावकऱ्यांनी केलेल्या कामाचे प्रतीक म्हणून येथे आता वेशीवर ‘ग्रामविकासाचे स्मारक’ उभारले जात आहे. गड, किल्ल्याचे प्रवेशद्वार असते, त्या धर्तीवर हे स्मारक असेल. जगाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी ग्रामविकास पहिल्यांदा सांगितला. म्हणून बाल शिवाजी आणि माता जिजाऊ, त्या सोबतच खेड्याकडे चलाचा संदेश देणारे महात्मा गांधी व अन्य ग्रामविकासाची संकल्पना राज्यासाठी, देशासाठी मांडणाऱ्या महनीय व्यक्तीचे शिल्प करण्याचा विचार आहे. आतील एका बाजूला ग्रामदैवताचे मंदिर व दुसऱ्या बाजूला वाचनालय (ज्ञानमंदिर) असेल. सध्या स्मारकांचे काम चालू असून, त्यात अजून काय संकल्पना मांडावी या बाबत गांवकऱ्यांत सातत्याने चर्चा होत आहे. गावांत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचे पहिल्यांदा हे स्मारक स्वागत करेल. 

प्रतिक्रिया

लोकसहभागातून तयार होणाऱ्या ग्रामविकासाएवढी ताकद दुसऱ्या कशात नाही. आम्ही गावकऱ्यांनी तीस-पस्तीस वर्षांपासून श्रमातून आणि एकीच्या बळावर हिवरे बाजारची वेगळी ओळख निर्माण करू शकलो. येथे येणाऱ्या प्रत्यके नागरिकांना ग्रामविकासाबाबत अस्था निर्माण व्हावी आणि गावाने केलेल्या कामाचे प्रतीक म्हणून हे स्मारक उभारत आहोत. -पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्श गाव योजना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com