धाडसत्रात आढळली ३० पेक्षा जादा कीटकनाशके

धाडसत्रात आढळली ३० पेक्षा जादा कीटकनाशके
धाडसत्रात आढळली ३० पेक्षा जादा कीटकनाशके

पुणे : कृषी खात्याच्या गुणनियंत्रण विभागाने राज्यात राबवलेल्या धाडसत्रात ३० पेक्षा जादा कीटकनाशके आढळून आली आहेत. मात्र, ही कीटकनाशके बनावट आहेत की अप्रमाणित याच्या चाचण्या सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.  गुणनियंत्रण संचालक विजयकुमार इंगळे स्वतः या कारवाईत सहभागी झाले होते. कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना यातील विविध घटनाक्रमांची माहिती देण्यात आली. धाडसत्रात मिळालेली कीडनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, विद्राव्य खते याबाबत गुणनियंत्रण विभाग, प्रयोगशाळा, स्थानिक निरीक्षक यांच्या संयुक्त माहितीवर सखोल अहवाल तयार केला जात आहे. त्यानंतर पोलिसांकडे प्रकरण सोपविले जाईल, अशी माहिती गुणनियंत्रण निरीक्षकांनी दिली.  “परराज्यातील परेरा नामक व्यक्तीकडून या कीटकनाशकांची वाहतूक केली जात होती. कर्नाटकच्या बेळगाव परिसरात नियंत्रण कक्ष तयार करून महाराष्ट्राच्या विविध भागांत अप्रमाणित कीटकनाशके व विद्राव्य खतांचा पुरवठा करणारी टोळी या प्रकरणात असल्याचा संशय आहे. राज्यात राबविलेल्या धाडसत्रात दोन नव्हे; तर सात ठिकाणी संशयास्पद माल आढळून आलेला आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली.  पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली अशा तीन जिल्ह्यांमध्ये या टोळीचे धागेदोरे मिळून येत आहेत. धाडींमध्ये संशयास्पद भासलेला माल अद्यापही जप्त करण्यात आलेला नाही. ‘स्टॉप सेल’ दिलेल्या मालाची किंमत किमान साडेतीन कोटीची आहे. यात फोरेट, डायफेन्थ्युरॉन, टु-फोर-डी, डायक्लोरोव्हास तसेच इतर ३० पेक्षा जास्त मूलद्रव्ये आढळून आलेली आहेत. प्रयोगशाळांचे सविस्तर अहवाल पाहून माल जप्त केला जाणार आहे.  या घडामोडी बघता राज्यात बोगस विद्राव्य खतांची विक्री करणारे एक मोठे रॅकेटदेखील अस्तित्वात असल्याचा संशय आहे. धाडसत्रात आढळलेले विद्राव्य खत पूर्णतः बोगस आहे की अप्रमाणित आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, २०:२०:० या ग्रेडला मान्यता नसतानाही त्याचा पुरवठा केला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. बोगस विद्राव्य खतांची विक्री करणारे एकापेक्षा जास्त रॅकेट असावेत, असेही गुणनियंत्रण निरीक्षकांना वाटते आहे.  अप्रमाणित खताचा पुरवठा कराडमधून राज्याच्या काही भागांत अप्रमाणित खताचा पुरवठा कराडमधून होत असल्याचा संशय आहे. खत नियंत्रण आदेशातील तरतुदीनुसार राज्याच्या कोणत्या भागात कोणत्या ग्रेडचे खत तयार केले जाते. त्याचा पुरवठा निश्चित कोणत्या मार्गाने कोणाला होतो, आयात खते आणि स्थानिक उत्पादित खते याचा सखोल तपास करण्याची आवश्यकता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com