मागणी दीड लाख, मिळणार चौदा हजार कांदाचाळी

मागणी दीड लाख, मिळणार चौदा हजार कांदाचाळी
मागणी दीड लाख, मिळणार चौदा हजार कांदाचाळी

नगर ः राज्यातील शेतकऱ्यांनी कांदाचाळीचा लाभ मिळावा यासाठी यंदा सुमारे दीड लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करून मागणी केलेली आहे. मात्र त्यातील साधारण दहा टक्केच म्हणजे १४ हजार १४३ लाभार्थ्यांनाच कांदाचाळीचा लाभ मिळणार आहे. प्रति लाभार्थी पाच टन कांदाचाळीसाठीचे अनुदान ग्राह्य धरून एकशे तेवीस कोटी ७५ लाख रुपये दिलेले आहेत. यंदाच्या वर्षी लाभातून साधारण पाऊन लाख टन साठवण क्षमता होईल. राज्यात मागील दोन वर्षांत चांगला पाऊस झाल्याने कांदा पिकांच्या लागवडीवर शेतकऱ्यांचा भर असल्याचे दिसून आले, यंदा दुष्काळी परिस्थिती आहे, कांद्याला पुरेसा दर नाही, त्यामुळे कांदा लागवडीचे नियोजन फेल गेले, अनेक शेतकऱ्यांचे कांदा रोपे वाया गेले.  असे असले तरीही पाणी उपलब्ध असलेल्या भागात कांदा लागवडीलाच प्राधान्य दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा साठवण करणे सोपे व्हावे यासाठी कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंर्तगत कांदा चाळीसाठी अर्थसाह्य दिले जाते. मागील दोन वर्षांत कांद्याचे भरमसाट उत्पादन झाले. मात्र शेतकऱ्यांकडे चाळी नसल्याने कांदा साठवणीला अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे गेल्या वर्षी अचानक कांदाचाळ बांधण्यासाठी अनुदान मिळावे, यासाठी मागणी अर्जात दुपटीने- तिपटीने वाढ झाली.  कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंर्तगत विविध योजनांसाठी दोन वर्षांपासून ऑनलाइन अर्ज घेतले जात आहेत. गेल्या वर्षी लाखभर शेतकऱ्यांनी मागणी केली होती. यंदा त्यात वाढ झाली. या वर्षी विविध योजनांसाठी सुमारे साडेतीन लाख अर्ज आले आहेत. त्यातील सुमारे दीड लाख अर्ज हे फक्त कांदाचाळीसाठी आहेत. एकट्या नगर जिल्ह्यामधून कांदाचाळीसाठी सुमारे ४५ हजार अर्ज आलेले आहेत. मात्र मागणीच्या तुलनेत गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही अल्प शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  राज्यातील यंदा १४ हजार १४३ लाभार्थ्यांना लाभ मिळणार असून, त्यात सर्वसाधारण प्रवर्गातील ११ हजार ३२५, अनुसूचित जातीचे १४५४ तर अनुसूचित जमातीचे १३६४ लाभार्थी आसतील. एका लाभार्थ्यांना पाच टनाच्या मर्यादेत अनुदान देण्याचे गृहीत धरून २८ जिल्ह्यासाठी १२३ कोटी ७५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. नगर जिल्ह्यामधील सर्वाधिक म्हणजे ३१९७ लाभार्थी असतील. मात्र शासनाच्या नियोजनानुसार ऐनवेळी बदलही होऊ शकतो असे सांगण्यात आले. जिल्हानिहाय लाभार्थी ठाणे ः १, नाशिक ः २३७०, धुळे ः ४९०, नंदुरबार ः १७४, जळगाव ः ३१०, पुणे ः ७००, नगर ः ३१९७, सोलापूर ः ५००, कोल्हापूर ः २, सातारा ः ९०, सांगली ः १६, औरंगाबाद ः १५००, जालना ः ९२०, बीड ः ११५०, लातूर ः ६००, नांदेड ः ३५, परभणी ः ३९०, हिंगोली ः ३०, उस्मानाबाद ः ६००, अमरावती ः २६, अकोला ः १००, वाशीम ः २२, यवतमाळ ः २७०, बुलडाणा ः ६१०, चंद्रपूर ः ११, भंडारा ः ५, वर्धा ः २२, गोंदिया ः २  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com