agriculture news in marathi, more than Fifty thousand animals floated in flood, Kolhapur, Sangli | Agrowon

पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले वाहून

राजकुमार चौगुले/अभिजित डाके
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या संसारगाड्याला आधार ठरणारे पशुधन अक्राळ-विक्राळ महापुराने वाहून नेले. संसाराबरोबर शेती तर गेलीच. परंतु, ज्या पशुधनाने शेतकऱ्यांच्या संसाराला हातभार लावला ती जनावरे असाहाय्यपणे शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत वाहून गेली. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गाय, म्हैस, बैल, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्यांसह सुमारे पन्नास हजारांवर जनावरांचा मृत्यू या महापुरात झाला आहे. मृत पावलेल्या कोंबड्यांची संख्या तब्बल ४० हजारांवर आहे. 

कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या संसारगाड्याला आधार ठरणारे पशुधन अक्राळ-विक्राळ महापुराने वाहून नेले. संसाराबरोबर शेती तर गेलीच. परंतु, ज्या पशुधनाने शेतकऱ्यांच्या संसाराला हातभार लावला ती जनावरे असाहाय्यपणे शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत वाहून गेली. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गाय, म्हैस, बैल, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्यांसह सुमारे पन्नास हजारांवर जनावरांचा मृत्यू या महापुरात झाला आहे. मृत पावलेल्या कोंबड्यांची संख्या तब्बल ४० हजारांवर आहे. 

शासकीय आकडेवारी पाहिली, दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे सुमारे दहा कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. जशी गावे मोकळी होत आहेत, तसा मृत जनावरांचा खच दिसत आहे. यामुळे अजूनही आकडेवारीत वाढच होण्याची शक्‍यता आहे. मायेने पाळलेल्या जनावरांना वाचविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत केला. परंतू अगदीच नाईलाज झाला. गावातून बाहेर पडणे अशक्‍य झाले. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी हंबरणाऱ्या जनावरांना तसेच मागे ठेवून जड अंतकरणाने शेतकऱ्यांना सुरक्षित स्थळी यावे लागले. 

जनावरे गेल्याने शेतकऱ्यांना जेवण गोड लागेनासे झाले आहे. प्राणप्रिय जनावरे वाचवू शकलो नसल्याचे दु:ख शेतकऱ्यांना झाले आहे. आर्थिक हानी झालीच, पण भावनिकही नुकसान झाले आहे. याचा फटका आता आता शेतकऱ्यांच्या संसारगाड्यावर बसलाय. दुधाच्या संकलनातही अनेक गावांत मोठी घट झाली.

बेट झालेल्या गावांत प्रचंड नुकसान
अनपेक्षितपणे विविध नद्यांचे पाणी वेगात गावात शिरले. पाणी दारात येताच शेतकऱ्यांनी पहिल्यांदा जनावरांचा विचार केला. ज्या गावात सुरक्षित जागा आहे, त्या ठिकाणी जनावरे बांधली. घराच्या इमारतीवरही जनावरे नेली. अनेकांनी एकत्रित येऊन माळरानावरील जमीन, मोठ्या शाळांच्या पटांगणांवर जनावरे बांधून ती वाचविली. पण ज्या गावांना कुठेच उंचवटा नाही. अगदी थोडीच जागा पाण्याशिवाय मोकळ्या राहिल्या आहेत. त्या गावांचा मात्र नाईलाज झाला. अनेक गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले. जिथे मनुष्यच जीव वाचविण्यासाठी झगडत होता. तिथे जनावरांना दुय्यम स्थान मिळाले. अनेकांनी नशीबावर हवाला ठेवून जनावरांचे दोर कापून त्यांना मोकळे केले. कुठे तरी मोकळी जागा मिळाली तर तिथे राहतील अशा भाबड्या आशेने गोठ्याचे दोर सुटले तरी पाण्याच्या प्रवाहाने मात्र जनावरांना वाचण्याची संधी दिली नाही. आधारासाठी धडपडत अनेक जनावरांनी जागेवरच जीव सोडला. कोल्हापुरातील चिखली, आंबेवाडी, सांगलीतील ब्रह्मनाळ, भिलवडी आदीसह शेजारील गावांत हीच स्थिती होती. पाणी ओसरल्यानंतर जनावरांचे मृतदेह पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.

एक लाखावर लिटर दूध संकलन घटले
कोल्हापूर व सांगली हे दोन्ही जिल्हे दुग्धोत्पादनात अग्रेसर मानले जातात. कोल्हापूरचे जवळ जवळ सर्व तालुके व सांगली जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील तालुक्‍यात दूध धंदा हा शेतकऱ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा शेतीपूरक उद्योग आहे. साखर कारखान्यांप्रमाणे दोन्ही जिल्ह्यातील दूध संघामार्फत दररोज जवळ जवळ तीस लाख लिटर दुधाचे संकलन विविध संघामार्फत होते. गेल्या दहा बारा दिवसांत जिल्ह्यातील पशुधनाची मोठी हानी झाली. तसेच जनावरांची व्यवस्था न झाल्याने जी सुरक्षित जनावरे आहेत तिथेही दूध संकलन झाले नाही. पूर ओसरल्यानंतर याचा परिणाम दूध संघावर दिसून येत आहे. दोन्ही जिल्ह्यात मिळून सुमारे एक लाख लिटर दुधाचे संकलन नियमित दूध संकलनापेक्षा कमी झाले आहे. ही घट आता अनेक दिवस कायम राहण्याचा अंदाज दूध संघाच्या प्रतिनिधींचा आहे.

पुरानंतरची भयानकता
दुभती जनावरे वाहून गेल्याने आता अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाहच थांबला आहे. अनेक सर्वसामान्य शेतकऱ्यांची पुराने क्रूर चेष्ठा केली आहे. घर पडले, जनावरे गेली, शेती पाण्याखाली गेली. अशी विदारक अवस्था अनेक गावांमध्ये आहे. दुधातून होणारे अर्थार्जन थांबल्याने आता खायचे काय? आणि जगायचे कसे असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे आहे. लाखाच्या जवळपास असणाऱ्या जनावरांची परत खरेदी करणे सध्या तरी शक्‍य नाही. विशेष चिकाटीने दुग्ध व्यवसाय करून पै न पै साठवून संसार उभा करणाऱ्या महिला वर्गाला या आपत्तीने नेस्तानाबूत केले आहे. पूर ओसरतोय खरा, पण त्यांनतरची जी स्थिती दिसतेय ती पुरापेक्षा भयानक असल्याचे चित्र आहे.
 

पशुधनाचे नुकसान (१५ ऑगस्टपर्यंतची स्थिती)
जिल्हे गाय म्हैस शेळ्या/मेंढ्या कुक्कुटपालन
कोल्हापूर ७५ ८६   ६० १९५३०
सांगली १५५ १६० ८३ २११४६
संदर्भ - पशुसंवर्धन विभाग

प्रतिक्रिया...
सांगली जिल्ह्यात पूरबाधित क्षेत्रातील जनावरांना आम्ही तातडीने लसीकरण सुरू केले आहे. दूषित पाण्यात राहिल्याने अनेक रोगांचा फैलाव होण्याचा संभव आहे. हे रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. संजय धकाते, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, सांगली

कोल्हापूर जिल्ह्यातील जनावरांचे महापुरात मोठे नुकसान झाले आहे. याची आकडेवारी संकलित करीत आहोत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी आम्ही तातडीने याचा अहवाल शासनाकडे पाठवून मदत तात्काळ मिळावी यासाठी पापठपुरावा करत आहोत.
संदर्भ - पशुसंवर्धन विभाग

माझी एक म्हैस आणि एक गाय पुरात वाहून गेली. सुमारे दीड लाख रुपयांचे माझे नुकसान झाले. माझा उदरनिर्वाहच यावर अवलंबून होता. शासनाने तातडीने मदत द्यावी. आमचा संसार वाचवावा.
- शिवरुद्र भूपद, ब्रह्मनाळ, जि. सांगली

गावाला महापुराचा वेडा पडला. आम्ही उंच गच्चीवर नेऊन जनावरे बांधली. अगदी अरुंद जिन्यावरूनही दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर जनावरे नेली. जनावरांचे हाल झाल्याने जनावरे अद्यापही या धक्‍यातून बाहेर पडली नाहीत. दूध देत नाहीत की चाराही व्यवस्थित खात नाहीत. यामुळे अनेक जनावरांचे दूध देणेच बंद झाले आहे.
- महावीर पाटील, हासूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

 

 


इतर बातम्या
निर्यात न करणाऱ्या कारखान्यांच्या साखर...कोल्हापूर : देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
सातारा जिल्ह्यातील ६३ हजारांवर...सातारा  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
मुख्यमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवादअमरावती : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या...कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
वाशीम जिल्ह्यात ४३७ शेतकऱ्यांचा यादीत...वाशीम  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याचा विकास गतीने...
शेतकरी कर्जमुक्तीसाठी सोलापुरात आधार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
राज्य सरकारकडून २४ हजार कोटींच्या...मुंबई  : राज्य विधिमंडळाच्या...
खासदार डॅा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य...सोलापूर  ः सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ....
कर्जमुक्तीत रत्नागिरी जिल्ह्यातील २३४...रत्नागिरी ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
नगर जिल्ह्यात मिळणार डिजिटल स्वाक्षरीचा...नगर  ः ऑनलाइन सात-बारा संगणकीकरणाच्या...
पुणे जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या...पुणे  ः जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले...
नाशिक  : चांदोरी,सोंनाबे येथे...नाशिक  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांचा...नगर  ः  सायेब, मागच्या काळात...
सांगलीच्या ५९६ शेतकऱ्यांचा...सांगली ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
भंडारा जिल्ह्यात ३५ हजार शेतकरी...भंडारा ः राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त...
टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९ पंप सुरूसांगली  ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९५०...
नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांची ८८ कोटींवर...नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांतील पंधरा...
कृषी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा...पुणे  ः कृषी विभागाच्या वतीने चौथ्या वार्षिक...
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ६८...मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री...