गगनबावड्यात यंदा सर्वाधिक पाऊस 

देशात यंदा परतीचा मॉन्सून अधिक काळ रेंगाळला होता. तसेच राज्यातही जून ते ऑक्टोबर या कालावधीत अनेक ठिकाणी कमी-अधिक पाऊस झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
rain gagan
rain gagan

पुणे ः देशात यंदा परतीचा मॉन्सून अधिक काळ रेंगाळला होता. तसेच राज्यातही जून ते ऑक्टोबर या कालावधीत अनेक ठिकाणी कमी-अधिक पाऊस झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. विशेषतः दुष्काळी भागात जोरदार पाऊस झाल्याने भूजलपातळीतही चांगली वाढ झाली आहे. यंदा गगनबावड्यामध्ये सर्वाधिक ६००४ मिलिमीटर पाऊस झाला. हवामान विभागाकडे या ठिकाणाची सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. 

यंदा देशात मॉन्सून एक जूनला दाखल झाला होता. जून आणि जुलैमध्ये काही वेळा पाऊस कमी अधिक स्वरूपात पाऊस पडला. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने काही प्रमाणात दडी मारली होती. मात्र दोन ऑगस्टदरम्यान उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व भाग या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. चार ऑगस्टपासून पाऊस बरसण्यास सुरूवात झाली. पाच ऑगस्ट रोजी पालघर येथे हंगामातील सर्वाधिक ४६०.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ महाबळेश्वर येथे ३२० मिलिमीटर पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळित झाले होते. त्यानंतर कमीअधिक प्रमाणात हा पाऊस पडत राहिला. 

एकंदरीत जून, जुलै महिन्यात पडलेला पाऊस आणि ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसाचा विचार केल्यास ऑगस्टमध्ये अधिक पाऊस पडला. सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी असले तरी तिसऱ्या आठवड्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात चांगला पाऊस झाल्याने धरणे भरण्यास मदत झाली होती. 

यंदा कोल्हापुरातील गगनबावडामध्ये मुसळधार पाऊस कोसळल्याचे दिसून आले. गगनबावडामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाची सरासरी ५२९२ मिलिमीटर असून तुलनेत ६००४ मिलिमीटर म्हणजेच जवळपास १०० टक्क्यांहून अधिक पाऊस पडला आहे. पावसाळ्यातील चार महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक पाऊस ५ ऑगस्ट रोजी पडला. या दिवशी ३१० मिलिमीटर एवढा पाऊस या ठिकाणी पडल्याची नोंदही हवामान विभागाकडे झाली आहे. त्यानंतर कोकण विभागात सिंधुदूर्गमधील मालवण येथे सर्वाधिक सरासरी २३२४ मिलिमीटरच्या तुलनेत ५५२० मिलिमीटरचा पाऊस पडला आहे. 

गगनबावडा येथील मागील ५० वर्षांतील पावसाचा विचार केल्यास दरवर्षी कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडतो. मात्र, अनेकवेळा शंभर टक्केपेक्षाही अधिक पाऊस पडल्याची नोंद येथे झाली आहे. यंदा सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून शंभर टक्केपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. गेल्या वर्षीही येथे चांगला पाऊस झाला होता. यंदा परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावली आहे. 

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेले गगनबावडा उंच ठिकाण आहे. हे गाव कोल्हापूर शहरापासून ५५ किलोमीटर अंतरावर आहे. येथून गगनबावडा जवळ आहे. गगनबावड्याचे वैशिष्ट्ये म्हणजे या गावातून दोन घाट आहेत. एक भुईबावडा व दुसरा करूळ घाट आहे. कोल्हापूरमधील थंड हवेचे ठिकाण म्हणूनही ते ओळखले जाते. हिरवे डोंगर, पश्चिमेकडून येणारा गार वारा आणि निखळ शांतता लाभलेला हा परिसर रमणीय आहे. येथे पाऊस देणारे वारे हे मुख्यतः अरबी समुद्रावरून येतात. अरबी समुद्रावरून येणारे वारे आधी कोकणात पोहचतात. कोकणाच्या तळभागात असलेले हे महत्त्वाचे ठिकाण आहे. जवळपास या ठिकाणाहून सह्याद्रीच्या रांगा लागतात. परंतु मॉन्सूनच्या आगमनाच्या वेळी अरबी समुद्रावरून वारे येतात तेव्हा त्यात बाप्ष अधिक असते. सह्याद्रीच्या बाजूला येणारे वारे हे कमी उंचीवरून जास्त उंचीवर जात असतात, त्यावेळी त्याची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. परिणामी वाऱ्यासोबत असलेले बाष्प पावसाच्या रूपात जमिनीवर येते. त्यामुळेच सह्याद्रीच्या खोऱ्यात मोठा पाऊस पडतो. गगनबावडा हे सह्याद्रीच्या रांगेतच येत असल्याने येथे सर्वाधिक पाऊस पडतो. 

महिनानिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) 

महिना झालेला पाऊस 
जून १५०० 
जुलै १४५७ 
ऑगस्ट २४५१ 
सप्टेंबर ५९६ 
आक्टोबर ३५७ 

या दिवशी पडला सर्वाधिक पाऊस (मिलिमीटरमध्ये) 

महिना पडलेला पाऊस 
१३ जून १७२ 
२२ जुलै ११२ 
५ ऑगस्ट ३१० 
२३ सप्टेंबर १६५

प्रतिक्रिया मॉन्सूनने येणारे वारे हे पहिल्यांदा कोल्हापुरात येतात. गगनबावडा हे कोल्हापूरच्या पश्चिमेकडील भागात व उंच ठिकाण आहे. त्यामुळे येथे जोरदार पाऊस पडतो. चालू वर्षीही येथे राज्यातील सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.  - डॉ. अनुपम कश्यपी, विभाग प्रमुख, पुणे वेधशाळा, पुणे  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com