सोलापुरात शेतकऱ्यांच्या आंदोलनाने वातावरण ढवळले

सोलापुरात शेतकऱ्यांच्या आंदोलनाने वातावरण ढवळले
सोलापुरात शेतकऱ्यांच्या आंदोलनाने वातावरण ढवळले

सोलापूर : ऊसदरावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले उपोषण गुरुवारी (ता.२२) आठव्या दिवशीही सुरूच आहे. टेंभूच्या पाण्यासाठी सांगोल्यातील १४ गावांतील शेतकरी तहसील कार्यालयासमोर जनावरांसह सहा दिवस झाले ठाण मांडून आहेत, तर दुसरीकडे येत्या सोमवारी (ता.२६) मंगळवेढ्यातील ४५ गावांतील शेतकरी निव्वळ पाण्यावर अवलंबून असल्याने आम्हाला कायमस्वरूपी कोरडवाहू गावे म्हणून घोषित करा, या मागणीसाठी तहसीलवर जनावरांसह मोर्चा काढणार आहेत. या विविध आंदोलनांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील वातावरण पुरते ढवळून निघाले आहे; पण या आंदोलनाकडे प्रशासन आणि जिल्ह्यातील मंत्र्यांनी सोईस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. साहजिकच, शेतकऱ्यांतील अस्वस्थता वाढल्याची स्थिती आहे.  

यंदाच्या हंगामातील ऊसदरासाठी एफआरपी अधिक दोनशे रुपये दर जाहीर करावा आणि गतवर्षीच्या हंगामातील एफआरपीचे पैसे थकवणाऱ्या कारखान्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील लोकमंगल साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, श्रीनिवास भोसले, नवनाथ माने, मदनसिंह जाधव, बापू गायकवाड, अजित कोडक हे सहा जण आमरण उपोषणाला बसले आहेत. गुरुवारी आठ दिवस होत आले, पण अद्यापपर्यंत कोणताही शासकीय प्रतिनिधी त्यांच्याकडे फिरकला नाही, की काही ठोस आश्‍वासन मिळालेले नाहीत.

विशेष म्हणजे थेट सहकारमंत्र्यांसह पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना यापूर्वीच मागण्यांचे निवेदन देऊन संघटनेने हे उपोषण सुरू केले आहे; पण त्यांनीही यामध्ये काहीच हस्तक्षेप केला नाही. मंत्री आणि प्रशासनाच्या भूमिकेमुळे आता स्वाभिमानीचे कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरण्याच्या तयारी आहेत. त्यासाठी संघटनेचे सोलापूर विभागाचे अध्यक्ष महामूद पटेल, विजय रणदिवे, उमाशंकर पाटील आदी कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.

सांगोला तालुक्‍यातही शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र आहे. तालुक्‍यातील १४ गावांतील शेतकऱ्यांनी टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळण्यासाठी थेट तहसील कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. काहींनी उपोषण सुरू केले आहे. गेल्या सहा दिवसांपासून हे आंदोलक तहसीलसमोर ठाण मांडून आहेत. जनावरेही त्यामध्ये सहभागी असल्याने ऊन, वारा, थंडीत शेतकऱ्यांबरोबर मुक्‍या जनावरांनाही शिक्षा भोगण्याची वेळ आली आहे; पण निर्णय घेणाऱ्यांना अद्यापही पाझर फुटलेला नाही. आता तर टेंभूचे पाणी मेथवडेच्या बंधाऱ्यापर्यंत आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आंदोलन चिघळल्याची स्थिती आहे. आश्‍वासनापेक्षा प्रत्यक्ष कृती हवी आहे, असा निर्धार या शेतकऱ्यांनी केला आहे.  

मंगळवेढा तालुक्‍यातील ४५ गावांतील जी निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबन आहेत. या गावांनीही कायमस्वरूपी कोरडवाहू गावे म्हणून जाहीर करा, जनावरांना चारा उपलब्ध करून द्या, अशी मागणी करत सोमवारपासून (ता.२६) तहसील कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढून बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा या समितीचे निमंत्रक अंकुश पडवळे यांनी दिला आहे. या गावातील सर्व शेतकऱ्यांची नंदेश्‍वर येथे नुकतीच बैठक झाली. त्यात जनावरांना कवडीमोल दराने विकावे लागत असल्याचे सांगताना यंदा खरीप आणि रब्बी दोन्हीही हंगाम वाया गेले. फळबागाही आता शेवटच्या टप्प्यात आहेत. या परिस्थितीमुळे आतापर्यंत चार शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केल्याचे उदाहरण ताजे आहे, याकडेही या बैठकीत अनेकांनी लक्ष वेधले.

आंदोलनकर्ते अत्यवस्थ भंडारकवठेतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उपोषणातील सहभागी कार्यकर्ते मदनसिंह जाधव आणि श्रीनिवास भोसले हे अत्यवस्थ झाले आहेत. सांगोल्याच्या उपोषणातील दत्तात्रय टापरे व दीपक पवार यांचीही प्रकृती खालावली आहे. या उपोषणकर्त्यांनी मागण्या मान्य झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा उपचार करून घेण्यास नकार दिल्याने आंदोलन चिघळण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com