नागपूर ः रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन संस्थांकडून रंगविण्यात आले असले, तरी सं
ताज्या घडामोडी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव पुन्हा समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भात पाय पसरणे सुरू केल्याने खासदार प्रफुल्ल पटेल यांना रोखण्यासाठी पटोले अस्र काढण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
नागपूर ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव पुन्हा समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भात पाय पसरणे सुरू केल्याने खासदार प्रफुल्ल पटेल यांना रोखण्यासाठी पटोले अस्र काढण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
पटोले आक्रमक आणि महत्त्वाकांक्षी आहेत. मंत्रिपदापेक्षा पक्षसंघटनेत काम करण्याची त्यांची इच्छा आहे. प्रदेशाध्यक्ष होण्याची त्यांनी यापूर्वीच इच्छा व्यक्त केली होती. काँग्रेस-भाजप-काँग्रेस अशी राजकीय भ्रमंती त्यांनी केली होती. सार्वजनिक ठिकाणी थेट बोलून मोकळे होण्याच्या त्यांचा स्वभाव यास आड आला.
भाजपत असताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जाहीरपणे तोफ डागली होती. त्यामुळे काँग्रेसच्याच अनेक नेत्यांनी सावध पवित्रा घेतला होता. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर मृदुभाषी बाळासाहेब थोरात यांच्या नावाला पसंती दिली होती. पटोले यांना फारसे बोलता येऊ नये
म्हणून त्यांना विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आल्याचेही बोलले जाते. याकरिता महाआघाडीतील सर्वच नेत्यांनी यास एकमताने संमती दिली होती, असेही कळते.
महाघाडीची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपण मोठा भाऊ असल्याचा दावा करणे सुरू केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची संख्या निश्चित असल्याने पक्षवाढीसाठी राष्ट्रवादीला विदर्भात मोठी संधी असल्याचे जाणवू लागले आहे. याची जबाबदारी प्रफुल्ल पटेल आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोपविली आहे. पटेल यांनी राष्ट्रवादीला मोठा भाऊ संबोधून आतापासूनच वाढीव जागांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
पटेल-पटोले हे परंपरागत प्रतिस्पर्धी आहेत. मृदुभाषी पटेल यांना रोखण्यासाठी आक्रमक पटोले यांना अध्यक्ष केल्यास किमान विदर्भात तरी काँग्रेस शाबूत राहील, असा राजकीय तर्क व्यक्त केल्या जात आहे. विदर्भात काँग्रेसची पाळेमुळे अद्यापही शाबूत आहेत. राष्ट्रवादीचे अस्तित्व फक्त नेत्यांच्या मतदारसंघापुरते मर्यादित आहे. राष्ट्रवादीच्या विस्ताराकडे दुर्लक्ष करणे काँग्रेसला भविष्यात महाग पडू शकते. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात काँग्रेसची लोकप्रियता कमी होत चालली आहे.