रेशीम अंडीपुंज निर्मिती केंद्रासाठी हालचाली गतिमान 

अंडीपुंज निर्मिती केंद्रासाठी हालचाली गतिमान 
अंडीपुंज निर्मिती केंद्रासाठी हालचाली गतिमान 

औरंगाबाद : रेशीम कोषाच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राचे अंडीपुंजाबाबतचे परावलंबित्व संपविण्यासाठी रेशीम विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. औरंगाबादेत राज्यातील दुसरे ३० लाख अंडीपुंज निर्मितीची क्षमता ठेवून असणारे केंद्र उभारण्याच्या दृष्टीने मंजूर जागेवर उभारावयाच्या केंद्राचे आवश्‍यकतेनुसार नकाशे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

राज्यातील गडहिंग्लज येथील अंडीपूज निर्मिती केंद्राची क्षमता २० लाख अंडीपुंजाची आहे. गतवर्षी प्रत्यक्षात गतवर्षी ४१ लाख अंडीपुंज लागले. त्यामुळे जवळपास २५ लाख अंडीपुंजासाठी राज्याला इतर राज्यावर अवलंबून राहावे लागले होते. ती गरज कशीबशी भागली गेली. परंतू यंदा तुती लागवडीचे वाढलेल्या क्षेत्रामुळे जवळपास ८० लाख अंडीपुंजाची मागणी झाली. प्रत्यक्षात जवळपास ६० लाख अंडीपुंज लागतील. 

त्या तुलनेत राज्यातील गडहिंग्लजच्या एकमेव अंडीपूज निर्मिती केंद्राने कितीही प्रयत्न केले तरी २५ लाख अंडीपुंज निर्मितीपलीकडे अंडीपुंज निर्मिती त्यांच्याकडून शक्‍य नाही. त्यामुळे उर्वरित जवळपास ५५ लाख अंडीपुंज निर्मितीसाठी इतरांवर अवलंबून राहण्याशिवाय राज्यातील रेशीम विभागाला पर्याय नव्हता. त्यातही अंडीपुंज निर्मितीत आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातच अंडीपुंजचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. अनेकांना अंडीपुंज न मिळाल्याने लावलेल्या तुती बागा उपटून फेकाव्या लागल्या. 

महारेशीम अभियानाला मिळणारा प्रतिसाद व नियोजन पाहता पुढील वर्षी किमान एक कोटी अंडीपुंज लागणार आहेत. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांनी अंडीपूजसह रेशीमविषयक इतर प्रश्नावर आवाज उठवत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. त्यानंतर औरंगाबादेत निर्माण प्रस्तावित असलेल्या अंडीपुंज निर्मिती केंद्राच्या निर्मितीसंदर्भातील हालचाली गतिमान झाल्या आहेत. 

औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी अंडीपुंज निर्मिती केंद्राची गरज ओळखून चिकलठाणा एमआयडीसी हद्‌दीतील २५ एकर जागा केंद्रासाठी मंजूर केली आहे. जवळपास आठ कोटी रुपये अंडीपुंज निर्मिती केंद्रासाठी निधी लागणार आहे. या केंद्रात कोल्ड स्टोरेजही असणार आहे.

रेशीम कोष निर्मितीचा वाढता विस्तार, त्यासाठी लागणारी अंडीपुंजची मागणी पाहता अंडीपुंज निर्मिती केंद्र उभारणे अत्यावश्‍यक आहे. शाश्वत उत्पादन व उत्पन्न दुप्पट करण्याची क्षमता ठेवून असलेल्या रेशीम उद्योगासाठी अंडीपुंज निर्मितीत स्वावलंबी होण्यासाठी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.  - दिलीप हाके, सहायक संचालक (रेशीम), औरंगाबाद विभाग.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com