खाद्यतेलाबाबत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल : डॉ. नीता खांडेकर

तेलवर्गीय पीक क्षेत्र विस्तारत असून, देशाची खाद्यतेल आत्मनिर्भरतेकडे ही वाटचाल असल्याचे प्रतिपादन इंदूर येथील सोयाबीन संशोधन केंद्राच्या संचालक डॉ. नीता खांडेकर यांनी केले.
 खाद्यतेलाबाबत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल Moving towards self-sufficiency in edible oil
खाद्यतेलाबाबत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल Moving towards self-sufficiency in edible oil

नागपूर  : सोयाबीन संशोधन केंद्राने विकसित केलेले वाण, तंत्रज्ञानाचा वापर वाढीस लागला आहे. या माध्यमातून तेलवर्गीय पीक क्षेत्र विस्तारत असून, देशाची खाद्यतेल आत्मनिर्भरतेकडे ही वाटचाल असल्याचे प्रतिपादन इंदूर येथील सोयाबीन संशोधन केंद्राच्या संचालक डॉ. नीता खांडेकर यांनी  केले.  सोयाबीन संशोधन केंद्राच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम सोमवारी (ता. १३) झाला.  या वेळी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. एस. के.  झा, जोबनेर राजस्थानमधील श्री नरेंद्र कृषी महाविद्यालयाचे कुलगुरू जे. एस. संधू, आयोजन समितीचे सचिव डॉ. बी. यू. दुपारे यांची यावेळी उपस्थिती होती.  खांडेकर पुढे म्हणाल्या, ‘‘केंद्रीय कृषी मंत्रालयाने सोयाबीन संशोधन संस्थेने विकसित केलेले पंधरा वाण अधिसूचित केले आहेत. देशाच्या विविध भागात या वाणांचा उपयोग करून शेतकरी प्रति हेक्‍टरी उत्पादकता वाढ नोंदवीत आहेत. त्याकरिता संस्थेच्या सुधारित तंत्रज्ञानाचा देखील अवलंब केला जात आहे. एन. आर. सी.-३० वाण खास मध्य प्रदेश करिता विकसित करण्यात आले आहे. अशा प्रयत्नातून देशात तेलवर्गीय पिके लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. ही निश्चितच खाद्यतेलाच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भरतेकडे नेणारी वाट ठरली आहे.’’  डॉ. एस.के. झा यांनी आपल्या मार्गदर्शनात देशात सुमारे १२० लाख हेक्टरवर सोयाबीन लागवड होत असल्याची माहिती दिली. त्याकरिता ३५.६ क्विंटल प्रमाणित बियाण्याची गरज भासते. ही बियाणे गरज पूर्ण करण्यात  सोयाबीन संशोधन केंद्राचे मोठे योगदान आहे. बियाणे संशोधन आणि उपलब्धता या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने संशोधन केंद्राने सोयाबीन सीड हब हा उपक्रम हाती घेतला आहे. हा देखील मैलाचा दगड ठरेल, असा आशावाद डॉ. झा यांनी व्यक्त केला. डॉ. जे. एस. संधू म्हणाले, ‘‘या केंद्राचे पहिले संचालक डॉ.  पी. एस. भटनागर होते. त्यांच्या प्रयत्नातूनच हे केंद्र उभे राहिले. त्यानंतरच्या काळात सोयाबीन संशोधनात या केंद्राने मोठी आघाडी घेतली. यामध्ये संस्थेतील प्रत्येक कर्मचारी, शास्त्रज्ञांचे योगदान नाकारता येणार नाही. या वेळी दोन घडीपत्रिकासह डॉ.  बी. यु. दुपारे व डॉ. एस. डी. बिलोरे यांच्याद्वारे संकलित सोयाबीन उत्पादकांच्या यशोगाथा या पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले. संशोधन केंद्राच्या नव्या वेबसाइटचे लोकार्पण देखील मान्यवरांनी केले. शेतकऱ्यांचा सन्मान सोयाबीन संशोधन केंद्राच्या वर्धापन दिन कार्यक्रमात देशाचा प्रमुख पाच सोयाबीन उत्पादक राज्यातील अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला त्यामध्ये महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यातील विजय मोरे यांचा समावेश होता. त्यांनी फुले संगम टीडीएस ७२६ या वाणाचे हेक्‍टरी २५ क्विंटल उत्पादन घेतले. त्यासोबतच उमेश निगडी (कर्नाटक), सरसन अमरेंद्र रेड्डी (तेलंगाणा), मेहरबान सिंह (मध्य प्रदेश), राजेंद्र नागर (राजस्थान) यांनाही गौरविण्यात आले. आयोजन समिती सचिव डॉ.  बी. यु. दुपारे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com